मास कम्युनिकेशन विभागात लघुपट व वृत्तकथा निर्मिती कार्यशाळा उत्साहात
सामाजिक शास्त्रे संकुलाचा अभिनव उपक्रम
सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील सामाजिक शास्त्रे संकुलातील मास कम्युनिकेशन विभागात दिनांक 26 ऑक्टोबर 2020 रोजी लघुपट व वृत्तकथा निर्मिती यासंदर्भात ऑनलाईन कार्यशाळा उत्साहात पार पडली.
विद्यार्थ्यांना लघुपट आणि वृत्तकथा संकल्पना कळाव्या तसेच यासाठीचे तांत्रिक ज्ञान त्यांना मिळावे या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करणात आले होते.
प्रारंभी विभागाचे प्रमुख डॉ. रवींद्र चिंचोलकर यांनी या कार्यशाळेमागची भूमिका विशद केली. पहिल्या सत्रात ‘लघुपट आणि वृत्तकथा संकल्पना’ या विषयावर डॉ. चिंचोलकर यांनी मार्गदर्शन केले. दुस-या सत्रात डॉ. अंबादास भासके यांनी ‘आशयाची निवड’ या विषयावर मांडणी केली.
तिस-या सत्रात कु. तेजस्विनी कांबळे यांनी ‘संहिता आणि व्हाईस ओव्हर’बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. डॉ. बाळासाहेब मागाडे व श्री.ऋषिकेश मंडलिक यांनी चौथ्या सत्रात मोबाईलद्वारे चित्रिकरण व संपादन याबाबत सविस्तर मार्गदर्शन करीत प्रात्यक्षिके सादर केली. श्री. शहाजी कांबळे यांनी ‘लघुपट निर्मिती प्रक्रिया’ समजावून सांगतिली.
दिवसभर चार सत्रात ही कार्यशाळा झाली. संहिता लेखन, विषय व आशयाची निवड, माेबाईलद्वारे व्हिडिओ शूटिंग कसे करावे, मोबाईलअॅपद्वारे एडिटिंग, व्हाईस रेकाॅर्डिंग, व्हिज्युअल इफेक्टस्, क्रोमा प्रोसेस, प्रकाशयोजना, कॅमेराचे विविध अँगल्स आदी मुद्द्यांबाबत सर्व सहभागी शिक्षकांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेत ‘पाईपर’ हा ऑस्कर पुरस्कारप्राप्त लघुपट दाखविण्यात आला. मास कम्युनिकेशन व बॅचलर ऑफ व्होकेशनल जर्नालिझमचे सर्व विद्यार्थी या कार्यशाळेस उपस्थित होते. ही कार्यशाळा गुगल मिट द्वारे ऑनलाईन पद्धतीने झाली.