मारुती चितमपल्ली : निसर्गालाच घर मानणारा सच्चा निसर्गप्रेमी

वाढदिवस विशेष; चितमपल्ली आहेत सोलापुरात स्थायिक

Spread the love

मारुती चितमपल्ली हे दीर्घकाळ वणात रमले. त्यांनी वनातील झाडं, त्यांची पानं, बहर, फळं, फुलं, पशू-पक्षी एवढंच नाही तर किडे, अळ्या, मुंग्या याविषयी मूलभूत लेखन, संशोधन केलं. उतारवयात तन्मयतेनं मत्स्य या विषयांवर महा शब्दकोश तयार केला. हे काम यापूर्वी मराठीत झालेलं नाही. ना ती कविता होता, ना ललित, ना कथा की कादंबरी. बरं, जे काही चितमपल्ली यांनी सिद्ध केलेलं आहे, ते संशोधकीय थाटाचं बोजड नाही. मराठी साहित्याला विलोभनीय चकवा देणारी ती एक अभिव्यक्ती आहे. आज पक्षीतज्ञ मारुती चितमपल्ली यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त हे संकलन.

थिंक टँक न्यूज नेटवर्क : डॉ. नाना हालंगडे
सुप्रसिध्द पक्षीतज्ञ आणि वृक्ष अभ्यासक, लेखक, मारुती चितमपल्ली यांचा आज (जन्म – ५ नोव्हेंबर १९३२ (सोलापूर) वाढदिवस. मारुती चितमपल्ली हे निसर्ग आणि वन्यजीवन या विषयातले तज्ज्ञ वनाधिकारी आणि त्या विषयांवर अत्यंत रसाळ लेखन करणारे लोकप्रिय लेखक आहेत. तेलुगू कुटुंबात जन्म होऊनही त्यांचं शिक्षण मराठीत झालं. बालपण मराठी, गुजराती वस्तीत गेलं. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी सोलापूरच्या टी.एम्. पोरे विद्यालयात प्राथमिक तर नॉर्थकोर्ट टेक्निकल स्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. नंतर त्यांनी सोलापूरच्या दयानंद कॉलेज मध्ये प्रवेश घेतला व तेथून ते इंटरमीजिएट सायन्स परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांना इंटरमीजिएट सायन्स पात्रतेनुसार सदर्न फॉरेस्ट रेंजर्स कॉलेज, कोईमतूर येथे वनक्षेत्रपाल पदवीसाठी प्रवेश मिळाला.

जीवनपट
१९५८–६० या कालावधीत त्यांनी वनक्षेत्रपाल पदवीचे शिक्षण पूर्ण केले. सातारा जिल्ह्यातील ढेबेवाडी येथील वनविभागापासून त्यांच्या नोकरीस सुरुवात झाली. त्यानंतर त्यांनी महाबळेश्वर, वडगाव (मावळ), नांदेड, इस्लामपूर, अहमदनगर वन विभागातील बोटा, अकोला तालुक्यातील राजूर, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांच्या सरहद्दीवर असलेल्या नवेगावबांध, पनवेल आणि पुणे इत्यादी ठिकाणच्या वन विभागा मध्ये कामे केली. त्यांनी नांदेड येथील यज्ञेश्वरशास्त्री कस्तुरे, पुण्यातील देवळेशास्त्री, पनवेल येथील पं.गजाननशास्त्री जोशी, परशुरामशास्त्री भातखंडे आणि वैद्य वि.पु. धामणकरशास्त्री यांच्याकडे परंपरागत पद्धतीने संस्कृत साहित्याचे अध्ययन केले. तसेच त्यांनी जर्मन आणि रशियन या भाषांचे अध्ययन केले.

शासनाच्या वन विभागात महत्त्वाच्या पदांवर कार्य
महाराष्ट्र शासनाच्या वन विभागात अनेक महत्त्वाच्या पदांवर त्यांनी कार्य केले. निवृत्तीच्या वेळी ते मेळघाट व्याघ्र प्रकल्पात उपसंचालक पदावर होते. त्यांनी कर्नाळा पक्षी अभयारण्य, नवेगाव राष्ट्रीय उद्यान, नागझिरा अभयारण्य आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्प यांच्या विकासात भरीव कामगिरी केली. पक्षीतज्ञ म्हणून त्यांची ख्याती झाली. त्यांनी वन्यजीवन व्यवस्थापन, वने, वन्यप्राणी आणि पक्षीजगता विषयी उल्लेखनीय संशोधन केले, तसेच अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांत सहभागी होऊन निबंधवाचन केले.

संस्था आणि समित्यांमध्ये सक्रीय सहभाग
चितमपल्ली यांचा अनेक संस्था आणि समित्या मध्ये सक्रीय सहभाग होता. त्यांनी डॉ. सलीम अली वन्यप्राणी संस्था हिचे संस्थापक सचिव म्हणून काम पाहिले. ते राज्य वन्यजीवन संरक्षण सल्लागार समिती आणि औरंगाबादच्या मराठी अभ्यासक्रम मंडळाचे सभासद होते. याचप्रमाणे त्यांनी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या संचालकपदाचे काम पाहिले. त्यांनी पक्षी जाय दिगंतरा, जंगलाचं देणं, रानवाटा, शब्दांचं धन, रातवा, मृगपक्षिशास्त्र (संस्कृत मराठी अनुवाद), घरट्यापलीकडे, पाखरमाया, निसर्गवाचन, सुवर्णगरुड, आपल्या भारतातील साप (इंग्रजी मराठी अनुवाद), पक्षिकोश, आनंददायी बगळे, निळावंती, केशराचा पाऊस इत्यादी पुस्तके आणि चकवा चांदणं हे आत्मचरित्र त्यांनी लिहिले.

अनेक पुरस्कारांनी सन्मानित
चितमपल्ली यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. त्यांना जंगलाचं देणं, रानवाटा व रातवा या त्यांच्या साहित्यासाठी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने पुरस्कार दिले. त्यांना १९९१ मध्ये विदर्भ साहित्य संघ पुरस्कार मिळाला. रानवाटासाठी त्यांना १९९१ मध्ये सोलापूरचा भैरूरतन दमाणी पुरस्कार आणि मृण्मयी साहित्य पुरस्कार असे दोन पुरस्कार मिळाले. इचलकरंजी येथील फाय फाउंडेशन प्रतिष्ठानाकडून त्यांना १९९१ च्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. साहित्य सेवेच्या सन्मानार्थ १९९९ मध्ये विदर्भ साहित्य संघ, नागपूर यांच्याकडून ‘साहित्य वाचस्पती’ हा पुरस्कार प्राप्त झाला.

पक्षी आणि निसर्गा विषयी पस्तीस वर्षे निरक्षण करून चितमपल्ली यांनी अनेक पुस्तके लिहिली. मराठी विश्वाला एक नवे परिमाण प्राप्त करून दिल्याबद्दल अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशन आणि मराठी विज्ञान महासंघ यांच्याकडून १९९६ मध्ये चितमपल्ली यांचा सन्मान करण्यात आला. १९९८ मध्ये विदर्भ साहित्य संघाचे सन्माननीय पद त्यांना मिळाले. औदुंबर येथील ५७ व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद चितमपल्ली यांना जानेवारी २००० मध्ये मिळाले. तसेच विदर्भ संमेलन आणि उमरखेडच्या ५१ व्या अधिवेशनाचे अध्यक्षपद त्यांना २००० मध्ये मिळाले.

७९ व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद
सोलापूर येथे जानेवारी २००६ मध्ये भरलेल्या ७९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. चितमपल्ली यांचे माध्यमिक, उच्च माध्यमिक, तसेच विद्यापीठीय पाठ्यपुस्तकांतून लेखन प्रसिद्ध झाले आहे. नागपूर विद्यापीठाच्या एम.ए. (मराठी) च्या अभ्यासक्रमात ‘पक्षी जाय दिगंतरा’ तसेच अमरावती विद्यापीठाच्या पदविकेसाठी ‘जंगलाचं देणं’ या पुस्तकांचा समावेश करण्यात आला.

विपूल लेखन
मराठी ललित लेखनातून अरण्यवाचन, अरण्यविद्या, अरण्ये आणि अरण्यानुभव यांवर प्रकाश टाकून त्यांनी स्वत:चे वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण केले. आनंददायी बगळे, चैत्रपालवी, घरट्यापलीकडे, जंगलाचं देणं, जंगलाची दुनिया, केशराचा पाऊस, निळावंती, पाखरमाया, पक्षी जाय दिगंतरा, रानवाटा, रातवा, सुवर्णगरुड, चकवाचांदण, निसर्गवाचन, पक्षीकोश, मृगपक्षीशास्त्र, शब्दांचं धन, नवेगावबांधचे दिवस, आपल्या भारतातील साप अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत.
(संदर्भ : विकिपीडिया, विविध वृत्तपत्रांतील लेख)

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका