मागण्या पूर्ण झाल्या नाही तर उग्र आंदोलन : डॉ. बाबासाहेब देशमुख
शेकापचे आंदोलन तूर्त स्थगित
थिंक टँक / नाना हालंगडे
सांगोला तालुक्यात शेकापची सत्ता असलेल्या ग्रामपंचायतींची विकासकामे राजकीय दबावापोटी प्रलंबित ठेवण्यात आली आहेत. विकासकामात मुद्दामहून खोडा घातला जात आहे. याचा तीव्र निषेध करून प्रशासनाला जाब विचारण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाकडून बुधवारी सोलापूर येथे बेमुदत उपोषणाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झाले. मात्र जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या अतिरिक्त आयुक्तांनी लेखी आश्वासन देऊन मागण्या मान्य केल्या. त्यामुळे उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले. येत्या काही दिवसांत मागण्या या मागण्या पूर्ण न झाल्यास पुन्हा जिल्हा परिषदेवर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शेकापचे युवा नेते तथा पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी दिला.
या आंदोलनात सहभागी होण्यासाठी शेकापचे शेकडो कार्यकर्ते वाहनाने सोलापुरला दाखल झाले होते. तत्पूर्वी सांगोला शहरात भव्य रॅली काढण्यात आली. या आंदोलनाचे नेतृत्व डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी केले.
यावेळी शेकापचे युवा नेते तथा पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. बाबासाहेब देशमुख, चंद्रकांत देशमुख, बाबा कारंडे, संगम धांडोरे,सुरेश माळी,ॲड.गव्हाणे, बाळासाहेब काटकर,ॲड.विशालदीप बाबर, प्रा.किसन माने, संतोष देवकते, ॲड. ढाळे,बाळासाहेब बनसोडे, दादा जगताप, घेरडीच्या सरपंच सुरेखा पुकळे,शशिकला बाबर, मधुकर बाबर,यांच्यासह शेकापचे शेकडो कार्यकर्ते,युवकवर्ग यावेळी मोठ्या संख्येनी उपस्थित होता.
डॉ. बाबासाहेब देशमुख म्हणाले की, शेकापची सत्ता असलेल्या ग्रामपंचायतींची विकासकामे मुद्दाम रोखली जात आहेत. यासाठी आम्ही या आंदोलनाचे आयोजन केले होते. जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या अतिरिक्त आयुक्तांनी लेखी आश्वासन देऊन मागण्या मान्य केल्या आहेत. त्यामुळे उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. येत्या काही दिवसांत मागण्या या मागण्या पूर्ण न झाल्यास पुन्हा जिल्हा परिषदेवर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
निघाली जंगी रॅली
शेकापचे स्वर्गीय नेते भाई गणपतराव देशमुख यांच्या निवासस्थानापासून सकाळी 9 वाजता सांगोला शहरात जंगी रॅली काढून सर्व वाहने सोलापूरकडे रवाना झाली. मंगळवेढामार्गे ही वाहने सोलापुरात पोहोचली.
सांगोल्याहून किमान एक हजार कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. शेकापचा लाल बावटा घेवून, लाल टीशर्ट, लाल उपरणे घेवून हा भव्य बेमुदत उपोषणाचा मोर्चा निघाला.
सोलापूर जिल्हा परिषदेसमोर सकाळी 11 वाजता या बेमुदत उपोषणाला सुरुवात झाली. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा दिल्या.
आबासाहेबांच्या पश्चात आंदोलन
शेकापचे स्वर्गीय नेते भाई गणपतराव देशमुख यांनी त्यांच्या हयातीत सांगोला, सोलापूरसह राज्यात विविध ठिकाणी, विविध प्रश्नांवर सातत्याने तीव्र आंदोलने केली होती. त्यांच्या आंदोलनाची दखल सरकार, प्रशासनाकडून घेण्यात येत होती. त्यांच्या आंदोलनात हजारो कार्यकर्ते सहभागी होत असत.
भाई गणपतराव देशमुख यांचे पहाडी आवाजातील भाषण कार्यकर्त्यांच्या अंगावर रोमांच उभे करीत असे. कार्यकर्ते कानात जीव आणून त्यांचे भाषण ऐकत असत. भाई गणपतराव देशमुख यांचे निधन झाल्यानंतर सोलापूर शहरात शेकापचे प्रथमच आंदोलन झाले. विशेष म्हणजे भाई गणपतराव देशमुख यांची हुबेहूब प्रतिरूप असलेले त्यांचे नातू, अभ्यासू युवा नेते डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. कार्यकर्त्यांत उत्साह होता.
विकासकामांना खोडा
सांगोला तालुक्यात अनेक गावांतील ग्रामपंचायतीवर शेतकरी कामगार पक्षाची सत्ता आहे. मात्र या ग्रामपंचायतींना निधी देताना किंवा कामे मंजूर करताना दूजाभाव केला जातो. सरकारी अधिकारी हे राजकीय दबावापोटी हे कृत्य करतात असा शेकापचा आरोप आहे. याबाबत शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांनी सोलापूर येथे जिल्हा परिषद अधिकाऱ्यांची भेट घेऊन ही व्यथा मांडली होती. याची तातडीने दाखल न घेतल्यास शेतकरी कामगार पक्षाकडून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र सुस्त प्रशासनाने कोणतीच दाखल घेतल्याचे दिसत नाही. परिणामी सोलापूर तेथे बेमुदत आंदोलन करण्यात करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
अनेक कामे रखडली
सांगोला तालुक्यात समाजकल्याण विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, पाणीपुरवठा विभाग, जलजीवन आदी विभागांमध्ये अनेक ग्रामपंचायतींची अडवणूक केली जाते असा शेकापचा आरोप आहे. याबत शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांनी सोलापूर येथे दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन जलजीवन मिशनमध्ये झालेल्या गैरप्रकारांची पोलखोल केली होती.
सध्या सोलापूर जिल्ह्यामध्ये जलजीवन मिशनच्या माध्यमतून सुमारे एक हजार कोटी रुपयांची कामे होत आहेत. या कामांची मंजूरी करण्याच्या प्रक्रियेत नियमांना हरताळ फासून कामे मंजूर करण्यात आली आहेत. यात सुमारे शंभर कोटी रुपयांचा गैरप्रकार झाल्याचा आरोप सांगोला तालुक्यातील शेकापच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केला होता. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाबा कारंडे, संगम धांडोरे, गजेंद्र कोळेकर, माजी सभापती बाळासाहेब काटकर, समाधान पाटील यांनी याबाबत पत्रकार परिषदेत जलजीवन मिशनमधील गैरप्रकाराची माहिती दिली होती.
सांगोला तालुक्यामध्ये लक्ष्मी नगर , कटफळ , वाटंबरे , वाणीचिंचोळे , मांजरी , धायटी , एकतपुर , आचकदाणी या गावांमध्ये जलजीवन मिशन योजनेची कामे न करता बिले अदा करून गैरप्रकार केला आहे , असा आरोप असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
सांगोला तालुक्यात काम न करताच आतापर्यंत चार कोटी रुपयांचे बीलही ठेकेदारांना वितरीत करण्यात आले असल्याचे यावेळी सांगण्यात आले. जलजीवन मिशनच्या कामात दहा टक्के लोकवर्गणी भरण्याची अट आहे. मात्र लोकवर्गणी भरलेली नसतानाही ठेकेदारांना कामे मंजूर करण्यात आली आहे. सर्वात कमी दराने निवीदा दाखल असतानाही जास्त दराने निवीदा दाखल करणाऱ्या ठेकेदारास काम मंजूर करण्यात आल्याचेही यावेळी सांगण्यात आले. याबाबत तक्रार करुनही प्रशासनाकडून दखल घेण्यात येत नसल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
नियमात तरतूद नसतानाही जीओ टॅगींगची अट कामासाठी घालण्यात आली. निवीदा दाखल होताना या स्पर्धा होवू देण्यात आली नाही. पाईप न आणताच ८५ टक्के बीले वितरीत करण्यात आल्याचाही आरोप यावेळी करण्यात आला.
सांगोला तालुक्यातील लक्ष्मी नगर, कटफळ , वाटंबरे , वाणीचिंचोळे , मांजरी , घायटी एकतपूर , आचकदाणी या गावात काम न करताच खोटे बील काढण्यात आल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
अशा विविध प्रश्नांवर लक्ष वेधण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाकडून या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.