मल्टीपर्पज इनडोअर हॉलसाठी साडेचार कोटींचा निधी मंजूर
खेलो इंडिया; सोलापूर विद्यापीठात खेळाडूंसाठी सुविधा
सोलापूर, दि.27- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठासाठी भारत सरकारच्या खेलो इंडिया विभागाकडून जागतिक दर्जाचा मल्टीपर्पज इनडोअर हॉल निर्माण करण्याकरिता साडेचार कोटी रुपये निधी मंजूर झाल्याची माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली.
गेल्या दीड वर्षांपूर्वी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून केंद्र सरकारकडे खेळाडूंसाठी मल्टीपर्पज हॉल आणि स्विमिंग टॅंककरिता प्रस्ताव सादर करण्यात आला होता. राज्य शासनाची परवानगी घेऊन सदरचा प्रस्ताव केंद्र शासनाच्या क्रीडा विभागाकडे देण्यात आला होता. खेलो इंडिया अभियानातून हा प्रस्ताव केंद्र शासनाने मंजूर केलेला आहे.
विद्यापीठाच्या 482 एकर परिसरात विद्यार्थी खेळाडूंसाठी हा मल्टीपर्पज हॉल उभारला जाणार आहे. गेल्या दीड वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर हा प्रस्ताव शासनाने मंजूर केला आहे. सोमवारी निधी मंजुरीचे पत्र विद्यापीठ प्रशासनाला प्राप्त झाले आहे. क्रीडा विभागाचे संचालक डॉ. एस. के. पवार यांनी प्रस्ताव तयार केला होता. सोलापूरचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामीजी यांनीदेखील प्रस्ताव मंजुरीसाठी प्रयत्न केले आहेत, त्यांचेही यासाठी मोठे सहकार्य लाभल्याचे कुलगुरु डॉ. फडणवीस यांनी सांगितले.
या मल्टीपर्पज हॉलमध्ये बॅडमिंटन, बास्केटबॉल, बॉक्सिंग, हँडबॉल, जुदो, कबड्डी, हॉलीबॉल, टेबल टेनिस यासह विविध प्रकारचे 15 खेळ खेळता येणार आहे. जागतिक दर्जाचे अगदी सुसज्ज असे मल्टीपर्पज हॉल उभारण्यात येणार असल्याचे क्रीडा संचालक डॉ. एस. के. पवार यांनी सांगितले.
सोलापूरच्या विद्यार्थी खेळाडूंसाठी खूप चांगले हॉल उपलब्ध होणार आहे. याचा फायदा निश्चितच येथील विद्यार्थी खेळाडूंच्या उज्ज्वल करिअरसाठी होणार असल्याचे कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी सांगितले. यासाठी विद्यापीठाच्या अधिकार मंडळाचे सर्व सदस्य, अधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचेही सहकार्य लाभले आहे.
(स्त्रोत : राहुल वंजारी-विद्यापीठ जनसंपर्क अधिकारी)