मंडल अधिकाऱ्यानं खाल्ली माती, लाखाची लाच घेताना सापडला
थिंक टँक / नाना हालंगडे
लाच स्वीकारणे आणि ती पचविणे ही प्रशासनाला लागलेली कीड आहे. दररोज कुठे ना कुठे लाच घेतलीच जाते. त्यातील मोजकीच प्रकरणे उघडकीस येतात. असेच एक प्रकरण पंढरपूर येथे उघडकीस आले आहे. पंढरपूर तहसील कार्यालयामधील मंडल अधिकाऱ्याने माती खाल्ली आहे.
एक लाख रुपयांची लाच घेताना पंढरपूर तहसीलमधील मंडळ अधिकारी रणजीत मोरे रंगेहाथ सापडला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पंढरपूर तहसील कार्यालयमधील मंडल अधिकारी रणजीत मारुती मोरे हा एक लाख रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांना सापडला. खाजगी इसम शरद रामचंद्र मोरे याच्या माध्यमातून एक लाख रुपये लाचेची मागणी रणजीत मारुती मोरे याने तक्रारदार यांच्याकडे केली होती.
तक्रारदाराचा मुरूम उत्खननासाठी वापरला जाणारा जेसीबी व टिपर ट्रक यांच्यावर कुठलीही कायदेशीर कारवाई न करता गुन्हा दाखल न करता रणजित मारुती मोरे याने एक लाख रुपये रकमेची लाचेची मागणी तक्रारदार यांच्याकडे केली.
खाजगी इसम शरद रामचंद्र मोरे याच्या माध्यमातून एक लाख रुपयांची रक्कम लाचेच्या स्वरूपात स्वीकारताना रणजीत मारुती मोरे व शरद रामचंद्र मोरे हे दोघे लाच लुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांच्या सापळ्यात रंगेहाथ अडकले.
याप्रकरणी या दोघांवर भ्रष्टाचार कायदा कलम ७/७ अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधीक्षक अमोल तांबे व सुरज गुरव उपाधीक्षक एसीबी पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक, पोलीस अंमलदार सोनवणे, प्रमोद पकाले, अनुप घाडगे, स्वप्निल सत्रके, पोलीस चालक शाम सुरवसे, कार्यालय सोलापूर यांनी ही कारवाई केली.
माती खाण्यात पटाईत
मंडल अधिकारी मोरे हा माती आणि मुरूम खाण्यात पटाईत असल्याची चर्चा या कारवाईनंतर रंगली आहे. त्याने पदभार घेतल्यानंतर अनेक ठिकाणची माती अशा पद्धतीने खाल्ली आहे. अनेकदा माती खाऊन ती पचवून ढेकर दिल्याने त्याचे धाडस वाढत गेले. आज झालेल्या या कारवाईत त्याने ही माती खाण्यापोटी तब्बल एक लाख रुपये लाच स्वीकारली आणि तो अलगदपणे लाच लचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला.
त्याने आजपर्यंत केलेल्या विविध कारवायांची चौकशी करावी, त्याने कोणाकोणाकडून पैसे खाल्ले याचीही चौकशी करावी, अशी मागणी होताना दिसत आहे.
हेही वाचा
विद्यार्थीसंख्या वाढली; पण गुणवत्ता ढासळली, ‘असर’ सर्वेक्षणातून पुढे आले सत्य