भोपसेवाडीत खिलारगायीचे डोहाळ जेवण
पीएसआय शंकर वसमळे यांचे पशुप्रेम
सांगोला/ डॉ.नाना हालंगडे
सांगोल्यात खिलार संगोपन केंद्र आहे. याच केंद्राद्वारे आजही चांगल्या प्रकारे संवर्धन आणि खिलार किती महत्त्वाचे आहे, याचे महत्त्व पाठवून दिले जात आहे. अशातच सांगोला तालुक्यातील भोपसेवाडी येथील वसमळे बंधूंनी शेतीबरोबर वडीलांच्या स्मृती जपत शेती व पशुपालन व्यवसाय जतन करून ठेवला आहे. यातील एक बंधू शेतकरी तर दोघेजण पोलीस सेवेत. यातील भोळ्या शंकराने तर आई- वडीलांच्या स्मृती जपित जणू कुटुंबीयांचा उद्धरच केला आहे.आज रविवार दुपारी तीन वर्षाच्या खिलार गायीचे डोहाळ जेवण घालीत आश्चर्याचा धक्का दिला. आपले पशुप्रेम दाखवून दिले.
मौजे भोपसेवाडी येथे वसमळे कुटुंबीयांच्या वतीने बानू व गौरी या खिलार गाईंच्या डोहाळ जेवणाचा कार्यक्रम घेण्यात आला. वसमळे कुटुंबीयांकडून कार्यक्रमाची जोरदार तयारी करण्यात आली .गाईंना झुल, शेंब्या ,कंडे गोंडे ,हार ,साडी चोळी घालून सजवण्यात आले.
प्रारंभी ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. याप्रसंगी भोपसेवाडी च्या सरपंच सौ रंजना वगरे यांच्यासह सौ संगीता वसमळे ,शीला वसमळे, सुवर्णा शिवाजी वसमळे, सुनंदा वसमळे ,स्वाती वसमळे ,हेमलता कोरे, सुमन कोरे यांच्यासह शेकडो महिलांनी बानु व गौरी या गाईंची पूजा विधिवत केली.
पुरणपोळीचा नैवेद्य भरवण्यात आला. स्वप्निल शंकर वसमळे व ओम मधुकर वसमळे या दोघा बंधूंनी आपले कॉलेजचे शिक्षण करत करत बानू व गौरी या गाईंचा सांभाळ केला आहे. यामुळे शेतकरी सहकारी सूतकरणीचे माजी संचालक दत्तात्रय कोरे तात्या यांनी या दोघांचे कौतुक केले.
पुरोगामी युवक संघटनेचे नेते महेश बंडगर यांनी आपल्या संस्कृतीमध्ये देशी गायीचे अनन्यसाधारण महत्त्व असून देशी गायीच्या दुधाचे गोमुत्राचे व शेणाचे महत्व सांगून शेतकऱ्यांसाठी देशी गाय किती महत्त्वाचीआहे हे पटवून दिले, व देशी गायीची संख्या वाढवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याचे आव्हान केले.
याप्रसंगी स्वप्निल शंकर वसमळे यांनी मनोगत व्यक्त केले. विशेष म्हणजे या दोन्ही गाई मायलेकी आहेत. दोघींनाही सातवा महिना सुरू आहे. वसमळे कुटुंबीयांनी हा आगळावेगळा कार्यक्रम घेऊन देशी खिलार गाईच्या संगोपनासाठी प्रयत्न झाले पाहिजे असे सांगितले.
सदर प्रसंगी फिट इंडिया मिशन अंतर्गत बॉडी चेकअप व आहार मार्गदर्शन करण्यात आले. हे मार्गदर्शन आरोग्य सल्लागार केशव गोसावी, सर ,शिवाजी शिंदे सर ,सुरज अवसेकर ,सौ राजश्री भोसले मॅडम यांनी केले.
सौ संगीता वसमळे यांनी सर्वांनी चांगले जीवन जगावे आयुष्यभर मेडिकल फ्री जीवन जगावे व गावातील सर्व लोकांना आरोग्य संपन्न बनवण्यासाठी प्रयत्न करणार आहे असे सांगितले. याप्रसंगी दत्तात्रय कोरे तात्या, जीएस कोरे ,सर मायाप्पा यमगर, श्रीपती वगरे सर ,ग्रामपंचायत सदस्य सुरज कोरे ,रामभाऊ कोळेकर ,भारत आगलावे ,संतोष कोरे ,संजय टकले, महादेव वसमळे अर्जुन माळी राजाराम मोहिते असंख्य महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली .