भोपसेवाडीचा म्हैसाळ योजनेत समावेश करा
ग्रामसभेत एकमताने ठराव
थिंक टँक / नाना हालंगडे
सांगोला तालुक्यातील भोपसेवाडी या ग्रामपंचायतीने या गावाचा समावेश म्हैसाळ उपसा सिंचन योजनेमध्ये करून शेतीला पाणी मिळण्यासंदर्भात ठराव एकमताने पारित करण्यात आला. या ठरावामुळे आगामी काळात पाण्यासाठी हे गाव संघर्ष करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सांगोला तालुक्यातील भोपसेवाडी या ग्रामपंचायतीची सर्वसाधारण ग्रामसभा ग्रामपंचायत कार्यालय भोपसेवाडी येथे झाली. ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी महेश बंडगर यांची एकमताने निवड करण्यात आली. सभेची प्रस्तावना ग्रामसेवक पांडुरंग बुरुंगले यांनी केली. सुरुवातीस मागील सभेचे प्रोसिडिंग वाचून कायम करण्यात आले.
आमचा गाव आमचा विकास सन 2023-24 या आराखड्यावर चर्चा करण्यात आली. यानंतर म्हैसाळ उपसा सिंचन योजनेमध्ये भोपसेवाडी गावाचा समावेश होऊन, शेतीला पाणी मिळण्यासंदर्भात ठराव एकमताने पारित करण्यात आला.
यावेळी भोपसेवाडी, तरंगेवाडी, आगलावेवाडी व जवळा पूर्व भाग म्हैसाळ पाणीपुरवठा संघर्ष समितीचे अध्यक्ष श्रीपती वगरे सर यांनी केलेल्या प्रयत्नाची माहिती सभेस दिली. अध्यक्ष स्थानावरून बोलताना महेश बंडगर (अध्यक्ष पुरोगामी युवक संघटना सोनंद गण) यांनी भोपसेवाडी गावाचा म्हैसाळ पाणीपुरवठा योजनेमध्ये समावेश होऊन शेतीला पाणी मिळालेच पाहिजे अशा प्रकारचा ठराव मांडला. यावर विचार विनिमय होऊन हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.
त्याचबरोबर पुरोगामी युवक संघटना राज्याचे अध्यक्ष डॉ.भाई बाबासाहेब देशमुख यांच्या माध्यमातून शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील साहेब यांच्याकडे येणाऱ्या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये हा प्रश्न मांडून गावाचा समावेश म्हैसाळ उपसा सिंचन प्रकल्पामध्ये करून घेण्याचे ठरले.
या सभेस भोपसेवाडीचे माजी सरपंच सुनीलदत्त कोरे यांनी मार्गदर्शन केले. गाव विकासामध्ये लोकांचा सहभाग महत्त्वाचा असून लोकांनी ग्रामपंचायत कामकाजामध्ये सहकार्य करावे. अधिकाराबरोबर जबाबदारी पार पाडाव्यात असे सांगितले.
यावेळी जवळा विकास सोसायटीचे व्हाईस चेअरमन दाजी यमगर यांनीही मार्गदर्शन केले. याप्रसंगी शाखा अभियंता म्हैशाळ कालवा उपविभाग सांगोला क्रमांक एकचे जगधने, आरोग्यवर्धिनी जवळा वैद्यकीय अधिकारी डॉ.ज्योती साळे, पशुधन विकास अधिकारी जवळा डॉ. यशवंत हुबाले यांनी मार्गदर्शन केले.
या सभेमध्ये गावातील विविध अडीअडचणी वरती चर्चा करण्यात आली. नवीन विकासकामे सूचविण्यात आली. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात ही ग्रामसभा संपन्न झाली.
या सभेस सरपंच रंजना श्रीपती वगरे, उपसरपंच सोपान भगवान बंडगर, ग्रामपंचायत सदस्य सुरेश दादा कोरे, भारत आगलावे, चंद्रकांत नरळे, सारिका मळगे, रखमाबाई गावडे, अनिता आगलावे, ग्रामसेवक पांडुरंग बुरुंगले, कर्मचारी सावंता माळी, वसंत कोरे, पोपट आगलावे, डाटा ऑपरेटर वंदना यमगर यांच्याबरोबर ज्येष्ठ नागरिक, युवक ,महिला भगिनी, मोठ्या संख्येने उपस्थित होते.