भूल देण्याच्या कामात असते जोखीम

आज जागतिक भूलतज्ज्ञ दिन

Spread the love

सांगोला/ डॉ.नाना हालंगडे
१६ ऑक्टोबर १८४६ रोजी विल्यम मोर्टन नावाच्या दंतचिकित्सकाने अमेरिकेतील बोस्टन येथे ‘ईथर’चा वापर करून, सर्वप्रथम भूलचे प्रात्यक्षिक केले होते. त्या काळी शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णांना प्रचंड वेदना होत असत, पण या प्रात्यक्षिकादरम्यान रुग्णाला वेदना झाल्या नाहीत. संपूर्ण शस्त्रक्रिया निर्वेध पार पडली. या प्रसंगाने वैद्यकीय विश्वात प्रचंड खळबळ उडवून दिली.

भूलतंत्राची प्रचंड उपयुक्तता लक्षात घेऊन अनेक प्रतिभावंत डॉक्टर्सनी भूलशास्त्रावर संशोधन सुरू केले आणि या शास्त्राची झपाटय़ाने प्रगती होऊ लागली. भुलीकरिता नवनवीन तसेच अधिकाधिक सुरक्षित औषधांचा व भूलतंत्राचा शोध सुरू झाला. जसजशी भूल सुरक्षित होत गेली तसतसे अधिक गुंतागुंतीच्या आणि दीर्घ काळ चालणाऱ्या शस्त्रक्रिया करणे शक्य झाले. म्हणून दरवर्षी १६ ऑक्टोबरला जागतिक अॅनेस्थेशिया दिन साजरा केला जातो.

शस्त्रक्रियेदरम्यान एवढी महत्त्वाची भूमिका पार पाडणारे भूलशास्त्र व ते देणारा भूलतज्ज्ञ सर्वसामान्यांसाठी अपरिचितच राहिले आहेत. भुलीबद्दल अनेक गैरसमज आहेत. रुग्णांना ऑपरेशन साठी लागणारा वेळ लक्षात घेऊन मोजून मापून भुलीचा डोस दिला जातो. पण जर ऑपरेशन लांबले तर मग काय पुन्हा इंजेक्शन देता का? असे अनेक प्रश्न पेशंटच्या आणि नातेवाइकांच्या मनात असतात. भूल दिल्यानंतर भूलतज्ज्ञ पेशंटला सोडून कुठेही जात नाहीत.

ऑपरेशनच्या वेळी भुलीचे प्रमाण गरजेनुसार कमी किंवा जास्त करतात आणि योग्य प्रमाणात ग्लुकोज अथवा सलाइन शिरेतून देतात. ऑपरेशन व भुलीमुळे पेशंटच्या शरीरात अनेक बदल घडत असतात. या सर्व बदलांवर सतत लक्ष ठेवणे आणि त्यांच्यावर औषधोपचार किंवा इतर इलाज करून नियंत्रण ठेवणे हे भूलतज्ज्ञांचे महत्त्वाचे काम असते. सरते शेवटी भूल उतरवावी लागते.

थोडक्यात काय, तर योग्य भूल योग्य प्रमाणात देणे आणि ऑपरेशन संपल्यानंतर भूल उतरवून पेशंटला सुरक्षितपणे भुलीतून बाहेर काढणे, हे सगळे अतिशय जोखमीचे काम असते.

भूल देणारी व्यक्ती बालरोगतज्ज्ञ, कार्डिओलॉजिस्ट, स्त्रीरोगतज्ज्ञ यांच्या सारखीच भूलतज्ज्ञ डॉक्टर असते. ही व्यक्ती सर्जन प्रमाणेच एमबीबीएस नंतर अनेस्थेशिया या विषयामध्ये एमडी किंवा डीए किंवा डीएनबी अशी पदव्युत्तर शिक्षण घेतलेली असते, किंबहुना कायद्याने ती तशी असावीच लागते.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका