ताजे अपडेटथिंक टँक स्पेशलविज्ञान/तंत्रज्ञानशेतीवाडी
Trending

भीमा कोरेगाव : पाचशे महारांच्या विजयाची शौर्यगाथा

Spread the love

पेशवाईच्या काळात अस्पृश्यतेचे पालन मोठ्या प्रमाणावर होत होते. महार, मांग व इतर अस्पृश्यांना अत्यंत हीन वागणूक दिली जात असे, याला विरोध म्हणून महार सैनिक आत्मसन्मासाठी ब्रिटिशांच्या बाजूने पेशवे व मराठ्यांविरूद्ध लढले आणि विजयी झाले.

थिंक टँक / नाना हालंगडे
कोरेगाव भीमाची लढाई ही महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यामधील कोरेगाव भीमा या गावात भीमा नदीच्या काठावर झालेली एक ऐतिहासिक लढाई आहे. ही लढाई १ जानेवारी, इ.स. १८१८ रोजी इंग्रजांच्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी व पेशव्यांच्या पेशवा सैन्य यांच्यात झाली होती. इंग्रजांकडून या तुकडीत ५०० महार होते. त्यांनी ब्रिटिशांच्या बाजूने कणखर लढत देवून पेशवाईची पगडी खाली खेचली.

ब्रिटिशांच्या बाजूने एकूण ८३४ सैनिक होते, ज्यांचे नेतृत्व सेनापती कॅप्टन फ्रान्सिस एफ. स्टॉंटन करीत होता. इंग्रजांच्या सैनिकांत ‘बॉम्बे नेटिव लाइट इन्फेंट्री तुकडी’चे सुमारे ५०० महार जातीचे सैनिक होते, काही युरोपियन व इतर काही सैनिक होते. तर मराठ्यांच्या बाजूने २८,००० सैनिक होते, ज्यांचे नेतृत्व सेनापती पेशवा बाजीराव दुसरा करीत होता. मराठ्यांच्या सैनिकांत मराठा, अरब व गोसाई या सैनिकांचा समावेश होता.

पेशवाईच्या काळात अस्पृश्यतेचे पालन मोठ्या प्रमाणावर होत होते. महार, मांग व इतर अस्पृश्यांना अत्यंत हीन वागणूक दिली जात असे, याला विरोध म्हणून महार सैनिक आत्मसन्मासाठी ब्रिटिशांच्या बाजूने पेशवे व मराठ्यांविरूद्ध लढले आणि विजयी झाले.

१८०० च्या दशकांत पुण्याचे पेशवे, ग्वाल्हेर संस्थानाचे शिंदे, इंदूरचे होळकर, बडोद्याचे गायकवाड आणि नागपूरचे भोसले असे अनेक तुकड्यांत मराठा साम्राज्य विभागलेले होते, त्यापैकी ग्वाल्हेर, इंदूर, बडोदा व नागपूर हे मराठा साम्राज्याचे गट ब्रिटिश साम्राज्यात सामील झालेली होती. या युद्धात पराभूत होऊन पेशवाई व पेशवा सैन्याचा अस्त झाला.

कोरेगाव भिमाच्या युद्धानंतर ब्रिटिशांनी शूर महार सैनिकांच्या स्मरणार्थ भीमा नदीच्या काठी ७५ फूट उंच विजयस्तंभ उभारून त्यावर २० शहीद व ३ जखमी महार सैनिकांची नावे कोरलेली असून स्तंभावर लिहिले आहे — ‘One of the Triumphs of the British Army of the Earth’.

महार सैनिकांच्या सन्मानार्थ येथील विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी दरवर्षी १ जानेवारी रोजी महाराष्ट्रासह देशभरातून बौद्ध (विशेषतः पूर्वाश्रमीचे महार), अन्य दलित, शीख व इतर जातीचे लोकही लाखोंच्या संख्येने येत असतात. बुद्धमूर्ती व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा समोर ठेवून बुद्धवंदना घेऊन शहीद सैनिकांच्या जयस्तंभाला मानवंदना दिली जाते.

इ.स. १८००च्या दशकांत मराठा साम्राज्य अनेक तुकड्यांत विभागलेले होते. त्यात पुण्याचे पेशवे, ग्वाल्हेर संस्थानाचे शिंदे, इंदूरचे होळकर, बडोद्याचे गायकवाड आणि नागपूरचे भोसले असे तुकड्यांमुळे कमकुवत साम्राज्य होते. ब्रिटिश साम्राज्याने ग्वाल्हेर, इंदूर, बडोदा व नागपूर यांच्या प्रमुखांशी शांतता करार वा तह करून त्या त्या संस्थानांचा भाग आपल्या राज्याला जोडला होता.

१३ जून इ.स. १८१७ रोजी पेशवे आणि गायकवाड घराण्यात महसुलावरून वाद झाला त्यात बाजीराव पेशवे यांनी ब्रिटिशांची मध्यस्थी घेतली. व बडोदा संस्थानाचा मोठा भाग पेशवाईत समाविष्ट केला. परंतु यासाठी ब्रिटिशांची मध्यस्थी घेतल्यामुळे अप्रत्यक्षपणे तो भाग ब्रिटिशांनी आपल्या राज्यास जोडला. यामुळे मराठा साम्राज्य ब्रिटिश अधीनस्त झाले आणि पेशवे केवळ नामधारी उरले. अल्पावधीतच पेशव्यांनी ब्रिटिशांना नमवण्याचा प्रयत्न खडकीची लढाईत केला. परंतु ब्रिटिशांनी तेथेही पेशव्याचा पराभव केला. ही लढाई ५ नोव्हेंबर इ.स. १८१७ रोजी झाली होती.

त्यानंतर पेशवे यांनी तेथून सातारा येथे पळ काढला आणि ब्रिटिशांनी पूर्णपणे पुण्यावर ताबा मिळवला. पुणे हे चार्लस बार्टन बर व कर्नल जनरल स्मिथ यांच्या नेतृत्वाखाली होते. आणि ते पेशव्यांचा पाठलाग करत होते. दरम्यान कर्नल स्मिथ याला भिती वाटत होती की पेशवा तेथूनही निसटून कोकणात जातील व तेथे राज्य करतील, म्हणून त्याने कर्नल बर याला कोकणात आणखी कुमक पाठवण्यास सांगितली. आणि एक जास्तीची कुमक पुण्याजवळील शिरूर येथे ठेवण्यास सांगितली.

दरम्यान पेशवे कर्नल स्मिथचा पाठलाग चुकवून निसटून जाण्यात यशस्वी झाले परंतु दक्षिणेकडून कर्नल थेओफिलस प्रिझलर सैन्यासह तयार होताच, ते पाहून पेशव्यांनी मार्ग बदलला आणि पूर्वेकडे चालत नाशिकच्या वायव्य भागातून पुढे सरकले आणि कर्नल स्मिथ त्यांच्यावर हल्ला करेल या भीतीने ते पुन्हा पुण्याकडे वळले. डिसेंबर इ.स. १८१७ च्या अखेरीस कर्नल बरला बातमी समजली की पेशवे पुण्यावर चालून येत आहेत तेव्हा त्याने शिरूर येथील सैन्याला मदतीसाठी तयार राहण्यास सांगितले ते सैन्य पुढे सरसावले आणि त्यांची लढाई कोरेगाव भिमा या गावात झाली.

मराठा सैन्य
मराठ्यांचे २८,००० सैन्य होते, ज्यातील २०,००० घोडदळ, ८००० पायदळ सतत तैनात असे. कंपनी सरकाराच्या सैन्यांनी हल्ला करू नये यासाठी प्रत्येकी ६०० सैनिकांच्या तीन तुकड्या तैनात असत. या सैनिकांत अरब, गोसावी व मराठा जातीचे सैनिक असत. हे सैन्य पहिल्या फळीत हल्ला करण्यासाठी अरब सैन्याचा वापर करीत असे. तसेच त्यासाठी भाडोत्री सैनिक व त्यांचे वारस यांचाही सैन्यात वापर केला जात असे. सैन्यात घोडदळ आणि तोफखाना असे दोन विभाग ठेवलेले असत. लढाईचे नेतृत्व बापू गोखले, अप्पा देसाई आणि त्रिंबक डेंगळे ह्यांनी केले होते. पैकी त्रिंबकजी डेंगळे हे कोरेगाव लढाईत प्रत्यक्ष सहभागी होते. तर अन्य जवळच्या फूलसेहर (आत्ताचे फुलगाव) येथे होते.

ब्रिटिशांचे सैन्य
ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीचे ८३४ सैनिक होते. दुसऱ्या बटालियन (बॉम्बे नेटिव्ह आर्मी तुकडी क्र १०२) मधील महार जातीचे सुमारे ५०० सैनिक होते. या तुकडीचे नेतृत्व कॅप्टन फ्रान्सिस स्टॉंटन यांनी केले. अन्य अधिकाऱ्यांमध्ये लेप्टनंट आणि अड्जुटंट पिटसन, लेफ्टनंट जॉन्स, असिस्टंट सार्जंट विंजेट हे होते. लेफ्टनंट स्वान्सटन नेतृत्व करीत असलेले सुमारे ३०० सैनिकांचे घोडदळ होते. २४ युरोपियन आणि ४ तोफा चालवणारे स्थानिक मद्रासी गोलंदाज व सहा पावडर तोफा होत्या. यांचे नेतृत्व लेफ्टनंट चिसलोम (Chisholm) करत होते. याचबरोबर साहाय्यक सार्जंट वायली (वायल्डे) यांचा तोफाखान्यात समावेश होता. महारांचे नेतृत्व रतननाक, जाननाक व भकनाक हे तिघांनी केले.

पेशवा दुसरा बाजीराव नासिककडे न जाता ओझरचा घाट उतरून जुन्नर खेडावरून ता. ३० डिसेंबर रोजी चाकण येथे येऊन पोहचला, अशी बातमी स्मिथ यास कळली. पूर्वी कोंकणांतून मुंबईकडून इंग्रज फौज येत होती तिला गाठावे किंवा पुण्यावर येऊन ते शहर एकदम हस्तगत करावे असा बाजीरावाचा बेत असल्याचे स्मिथ यास दिसून आले, दोन्ही गोष्टी इंग्रजांस बिकटच होत्या.

पुण्यास इंग्रजांचा बंदोबस्त अगदींच तात्पुरता होता. त्याने आपल्या मदतीस शिरूरहून जास्त फौज बोलावली होती, त्यावरून कॅ. स्टॉंटन थोडे इंग्रज सैन्य बरोबर घेऊन ता. ३१ डिसेंबर इ,स. १८१७ रोजी रात्री ८ वाजता शिरूरहून निघा, तो दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता कोरेगांवजवळ येऊन उतरला. तेथील टेकडीवरून त्याला पेशव्याची प्रचंड फौज भीमा नदीच्या काठीं दिसली. स्टॉंटनची बातमी बापू गोखल्यास होतीच. घोडनदीहून वरील इंग्रज फौज पुण्यास येत होती तिची बाजीरावाशीं अकस्मात गाठ पडली. बापू गोखल्यास श्रीमंतानी आज्ञा केली, की आज लढाई करून आम्हास पुढे जाण्यास मार्ग करून द्यावा. गावास लहानशी तटबंदी होती तेथे इंग्रज आश्रयार्थ गेले. त्यावर दुसऱ्या बाजूने मराठ्यांनी तोफांचा मारा सुरू केला. जागा अडचणीची असल्यामुळे तोफा बंद करून मराठ्यांकडील अरबांनी व पायदळांनी इंग्रजांवर चालून घेतले. तेव्हा संगिनीचे व तरवारीचेच युद्ध झाले.

कोरेगाव भिमाच्या युद्धानंतर ब्रिटिशांनी शूर महार सैनिकांच्या स्मरणार्थ भीमा नदीच्या काठी ७५ फूट उंच विजयस्तंभ उभारून त्यावर २० शहीद व ३ जखमी महार सैनिकांची नावे कोरलेली असून स्तंभावर लिहिले आहे — ‘One of the Triumphs of the British Army of the Earth’.

दोन्ही बाजूंचे भरपूर नुकसान झाले. रात्री ९ वाजेपर्यंत लढाई चालून मराठ्यांचे सैन्य आपल्या छावणीकडे परत आलें. सकाळी इंग्रजांच्या सैनिकांनी पाहिले तर मराठा सैन्य निघून गेल्याचे दिसले. इंग्रजांचे २७५ मारले गेले तर १७५ जखमी झाले, त्यापैकी बहुतेक होतकरूच होते. मराठ्यांचे सुमारे ५००-६०० लोक पडले. बाजीराव तर अगोदरच जेजुरीच्या वाटेने साताऱ्याकडे निघाला होता. पाठीमागून जनरल स्मिथ येत असतां त्यास ओझरच्या घाटात त्रिंबकजी डेंगळ्याच्या रामोशांनी इतके सतावून सोडले की ता. २ जानेवारी इ.स. १८१८ रोजी जेमतेम तो चाकणला येऊन पोचला. त्याच दिवशी कॅ. स्टॉंटन हा जखमी झालेले लोक व उरलेली फौज बरोबर घेऊन परत शिरूरच्या छावणीत गेला.

हेन्री टी प्रिंसेप यांनी लिहिलेल्या ‘हिस्टरी ऑफ द पॉलटिकल अँड मिलिट्री ट्रान्जॅक्शन्स इन इंडिया’ पुस्तकात या लढाईचा संदर्भ आहे. महार समाजातल्या माणसांचा समावेश असलेल्या ईस्ट इंडिया तुकडीच्या धाडसाचे वर्णन या पुस्तकात आहे.

शहिद व जखमी महार
कोरेगांवच्या युद्धात २० महार सैनिक आणि ५ अधिकारी शहीद झाले. शहीद झालेल्या महारांची नावे, त्यांच्या सन्मानार्थ बनवल्या गेलेल्या स्मारकावर अंकित आहे. जे या प्रकारे आहे –

गोपनाक मोठेनाक
शमनाक येशनाक
भागनाक हरनाक
अबनाक काननाक
गननाक बालनाक
बालनाक घोंड़नाक
रूपनाक लखनाक
बीटनाक रामनाक
बटिनाक धाननाक
राजनाक गणनाक
बापनाक हबनाक
रेनाक जाननाक
सजनाक यसनाक
गणनाक धरमनाक
देवनाक अनाक
गोपालनाक बालनाक
हरनाक हरिनाक
जेठनाक दीनाक
गननाक लखनाक
या लढाईत महारांचे नेत्रत्व करणाऱ्यांची नावे खालिल आहेत –

रतननाक
जाननाक
भकनाक
या युद्धात जख्मी झालेल्या महार योद्धांची नावे खालिल प्रमाणे आहे –

जाननाक
हरिनाक
भीकनाक
रतननाक
धननाक
(संदर्भ : विकिपीडिया)


हेही वाचा

कोरेगाव भीमा ही दंतकथा?

ठकुबाई ते कियारा, दगडोजीराव ते रिहान.. काळानुसार बदलली नावे

केंद्रीय यंत्रणांच्या अब्रुची लक्तरे वेशीवर

वारकरी संप्रदायाचे वाटोळे कोणी केले?

 

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका