भाषा ही केवळ धर्म-जातीपुरती मर्यादित नसते : डॉ. राजशेखर शिंदे
विद्यापीठातील भाषा व वाड्:मय संकुलातर्फे 'कौमी एकता सप्ताह' निमित्त 'भाषिक सुसंवाद दिन'
सोलापूर (विशेष प्रतिनिधी)
भाषेद्वारे भावनांची तार छेडली जाते. भाषेमुळे भावना आणि विचार झिरपत असतात. भाषा ही धर्म, जात आणि प्रदेशनिष्ठ नसते. ती आपल्या जीवनशैलीशी निगडित असते, असे प्रतिपादन प्रा. डॉ. राजशेखर शिंदे यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील भाषा व वाड्:मय संकुलाच्यावतीने ‘कौमी एकता सप्ताह’ निमित्ताने ‘भाषिक सुसंवाद दिन’ साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. ‘भाषा आणि सामाजिकसौख्य’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाषा व वाड् मय संकुलाचे संचालक डॉ. प्रभाकर कोळेकर होते.
इंग्रजांनी आपली भाषा अवगत केल्यामुळे भारतावर दीर्घकाळ राज्य केले. आपल्या भाषेत बोलल्यामुळे आपुलकी, जवळीकता निर्माण होते. राज्य करण्यासाठी समाजमन ओळखणे गरजेचे असते. त्या त्या प्रदेशातील भाषेतून बोलल्यामुळे लोक आकर्षित होत असतात, असेही डॉ. शिंदे यांनी सांगितले.
कार्यक्रमातील दुसरे वक्ते सरफराज अहमद यांनी ‘राष्ट्रीय एकात्मता आणि भाषांची भूमिका’ या विषयावर आपले विचार मांडले. दखनी भाषेत कुतुबशाही घराण्याचे योगदान महत्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कुली कुतुब शाह यांनी शोकगीते, प्रेमगीते लिहिली. त्याचबरोबर काव्य संमेलने भरवली. इब्राहिम आदिलशहा यांनी सरस्वती मातेची आरती लिहून आशीर्वाद मागितला आहे. हिंदु कवींनी उर्दूमध्ये केलेले काव्य आणि गझल लेखन लक्षात घेण्यासारखे आहे. बाबरचा ‘बाबरनामा’ हा ग्रंथ भाषिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे. अकबराने अब्दुल कादर बदायुनीकडून रामायण, सिंहासनबत्तिशी तसेच संस्कृत ग्रंथाचे अनुवाद करून घेतले आहेत, असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि भाषा व वाड्:मय संकुलाचे संचालक डॉ. कोळेकर यांनी आज राष्ट्रीय एकात्मता निर्माण होण्यासाठी सांस्कृतिक समन्वयाची गरज असल्याचे सांगितले. तसेच राष्ट्रीय संस्कृती निर्माण होईल असे संशोधन होणे गरजेचे असल्याचे सांगितले. त्यासाठी ‘ कौमी एकता सप्ताह’ साजरा होणे महत्त्वाचे असल्याचे स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक सागर सुरवसे यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार श्रुती देवळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संकुलातील शिक्षकांनी परिश्रम घेतले.