सावरकरांना ‘भारतरत्न’ दिलेले त्यांना स्वतःलाच आवडले नसते. कारण, आजचा ‘भारत’च सावरकरांना अमान्य होता. त्यांच्या कल्पनेतील भारत हे ‘हिंदूराष्ट्र’ होते. आजचे असे धर्मनिरपेक्ष; समता आणि बंधुतेच्या अधिष्ठानावरील राष्ट्रराज्य सावरकरांना नको होते. ‘शाळा आणि महाविद्यालयांत लष्करी शिक्षण सक्तीचे करा. सर्व हिंदूंना सक्तीचे सैनिकी शिक्षण द्या. आणि, हे हिंदूंचे राष्ट्र जगात सिद्ध करा’, अशी मांडणी करणा-या सावरकरांना हा ‘भारत’ कसा मान्य असेल?
‘वांशिक आणि धार्मिक आधारावरच देश उभा राहू शकतो’, असे बॅरिस्टर विनायक दामोदर सावरकरांचे मत होते. आणि, तीच त्यांची मूलभूत अडचण होती.
नाहीतर, त्यांच्या पराक्रमी प्रतिभेविषयी नितांत आदरच वाटावा, असे व्यक्तिमत्त्व सावरकरांचे होते.
खुद्द गांधीदेखील सावरकरांना १९२७ मध्ये भेटले. सावरकर तेव्हा नुकतेच म्हणजे, १९२४ मध्ये अंदमानमधील भयंकर तुरुंगवासातून सुटले होते. गांधींना सावरकरांविषयी, त्यांच्या त्यागाविषयी आत्मीयता होती. खरे तर, सावरकर हे गांधींपेक्षा वीस वर्षांनी धाकटे. पण, १९२७ मध्ये रत्नागिरीला गेल्यावर तेथील भाषणात गांधी म्हणाले, ‘टिळकांचे जन्मग्राम ही रत्नागिरीची ओळख आहे. त्यामुळे रत्नागिरीला तीर्थक्षेत्राचे महत्त्व प्राप्त झाले आहे. आणि, रत्नागिरी हे वीर सावरकरांचेही वास्तव्यस्थान आहे.’ खरे तर गांधी आणि सावरकर इंग्लंडमध्ये भेटले होते. दोघांमध्ये मतभेद होतेच. पण, गांधी त्या भाषणात म्हणतात, “मतभेदांनी आमच्या स्नेहात कोणतीही उणीव आणली नाही. मतभिन्नता असली म्हणजे आम्ही शत्रू आहोत, असे कोणी मानू नये.’
रत्नागिरीत असताना गांधींनी आपल्या घरी यावे म्हणून सावरकरांनी स्वतःहून चिठ्ठी पाठवली. गांधी गेलेही. त्या भेटीत ही मतभिन्नता अधोरेखितच झाली.
सावरकर खरे तर प्रतिभावंत लेखक. अंदमानच्या तुरूंगातही सावरकरांची प्रतिभा ओसरली नाही. तिथे कारागृहाच्या भिंतींवर कविता लिहून ठेवणारे सावरकर. मराठी भाषेला कित्येक शब्द सावरकरांनी दिले. कविता, नाटक, कादंबरी, वैचारिक साहित्य, आत्मकथा असे साहित्याचे अनेकविध फॉर्म सावरकरांनी हाताळले. मात्र, तरीही सावरकरांचे असे कसे झाले?
देश कोणत्या पायावर उभा राहावा, याविषयीच त्यांचे आकलन अत्यंत संकुचित होते. गांधी आणि सावरकरांची जी एकमेव भेट झाली, त्या भेटीतही गांधी म्हणाले, “मी सनातन हिंदू आहे.” पण, इतर सर्व धर्मांविषयी गांधींच्या मनात तोच आदर होता. धर्म ही प्रत्येकाची खासगी गोष्ट आहे आणि धर्म निवडीचे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे, अशी गांधींची धारणा होती.
‘जे पिढ्यानपिढ्या मुस्लिम वा ख्रिश्चन आहेत, त्यांना हिंदू करणे मला मान्य नाही. हिंदू धर्म मला प्रिय आहे. मी हिंदू आहे. पण इतरांनाही ‘हिंदू’ व्हायला सांगणे मला आवडणारे नाही. ‘स्वधर्मे निधनं श्रेयः’, असे हिंदू धर्म सांगतो. ज्याला वाटेल, त्याने त्या धर्मात राहावे, असे माझा धर्मच सांगतो!’ असे गांधी सावरकरांना त्या भेटीत म्हणाले होते. सावरकर बदलतील, अशी आशा गांधींना असावी. पण, तसे घडले नाही.
सावरकर आपली भूमिका पुढे नेत अधिकच कडवे होत गेले. ‘हिंदुस्थानात हिंदू हे राष्ट्र आहेत आणि इतर लोक या अल्पसंख्य जमाती आहेत’, अशी भूमिका सावरकरांची होती. सावरकरांच्या मताप्रमाणे ‘आसिंधु सिंधुपर्यंता यस्य भारतभूमिका। पितृभूः पुण्यभूश्चैव स वै हिंदुरिति स्मृतः॥’ अर्थात, जो मनुष्य या भरतभूला आपली पितृभूमी आणि पुण्यभूमी मानतो, तो हिंदू होय. (अर्थात, ‘गाय हा उपयुक्त पशू आहे’, असे म्हणणारे सावरकर आजच्या ‘हिंदुत्ववाद्यां’नाही झेपत नाहीत, हेही तेवढेच खरे!)
सावरकरांना इटलीच्या फॅसिझमने आणि जर्मनीच्या हिटलरने झपाटून टाकले होते. छत्रपती शिवाजी महाराजांविषयीचे त्यांचे आकलन तर अतिशय विपर्यस्त होते.
भारत हे ‘हिंदूराष्ट्र’ असायला हवे, अशी त्यांची राष्ट्रवादाची मांडणी होती. त्यामुळे गांधी, नेहरू आणि आंबेडकर यांनी उभा केलेला भारत त्यांना अमान्य होता आणि संविधानच त्यांनी “त्या अर्थाने” नाकारलेले होते. आजचा ‘भारत’ घडत असताना, त्या प्रक्रियेत सावरकर कुठेच नसणे त्यामुळे स्वाभाविक होते.
सावरकर हे प्रतिभावंत खरेच, पण आजचा ‘भारत’च ज्यांना अमान्य होता, त्यांना ‘भारतरत्न’ कसे देणार?
– संजय आवटे (लेखक हे वरिष्ठ पत्रकार आहेत)