भाऊबीज : बहीण-भावाच्या प्रेमाचे प्रतिक
थिंक टँक न्यूज नेटवर्क : डॉ. नाना हालंगडे
दिवाळीमधील शेवटचा आणि सर्वात सण म्हणजे ‘भाऊबीज’ होय. भाऊबीज हा सण भाऊ-बहिणीच्या प्रेमाचं प्रतीक आहे. या दिवशी प्रत्येक बहीण आपल्या भाऊरायाला ओवाळते. त्याच्या दीर्घायुष्यासाठी आणि आनंदी आयुष्यासाठी देवाजवळ प्रार्थना करते. भाऊ आपल्या लाडक्या बहिणीला भेटवस्तू देतो.
रक्षाबंधनाप्रमाणेच हा सण बहिण-भाऊ यांचे एकमेकांप्रती असलेला स्नेह व्यक्त करण्याचा दिवस आहे. पौराणिक कथेनुसार भावाच्या दीर्घायुष्यासाठी या दिवशी यमराजाची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे.
हिंदू धर्मात रक्षाबंधनाप्रमाणे भाऊबीजलाही विशेष महत्त्व आहे. या दिवशी बहिणी आपल्या भावाला टिळा लावतात आणि भावाच्या दीर्घायुष्यासाठी व उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना करतात. भावाला टिळा लावण्यासाठी प्रथम पूजेचे ताट फळे, फुले, दिवे, अक्षत, मिठाई, सुपारी इत्यादींनी सजवावे. यानंतर तुपाचा दिवा लावल्यानंतर भावाची आरती करा आणि शुभ मुहूर्त पाहून टिळा लावा.
टिळा लावल्यानंतर भावाला पान, मिठाई वगैरे खाऊ घाला.टिळा आणि आरतीनंतर भावाने आपल्या बहिणीचे रक्षण करण्याची प्रतिज्ञा घ्यावी आणि तिला भेटवस्तू द्यावी. पौराणिक कथेनुसार बहिणी भाऊबीजच्या निमित्ताने आपल्या भावाला टिळा लावतात तेव्हा भावाच्या आयुष्यावर येणारे सर्व संकट नष्ट होतात आणि त्याला त्याच्या आयुष्यात सुख आणि समृद्धी प्राप्त होते. या दिवशी बहिणीच्या घरी भोजन केल्याने विशेष फळ मिळते.