
थिंक टँक / नाना हालंगडे
बहीण आणि भावाच्या नात्यातील गोडवा वृद्धिंगत करणारा, नात्याची वीण घट्ट करणारा सण म्हणून भाऊबीज साजरी केली जाते. या दिवसाला यमद्वितीया असेही देखील म्हणतात. हिंदीत या सणास भाईदूज असे म्हटले जाते. पश्चिम बंगालमध्ये भाई फोंटा या नावाने हा उत्सव साजरा केला जातो. हरियाणा, गुजरात, महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांमध्ये भाऊबीजेचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. नेपाळमध्ये देखील हा दिवस भाईतिहार म्हणून साजरा केला जातो. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते.
अशी साजरी करतात भाऊबीज
कार्तिक शुद्ध द्वितीया या दिवशी भावाने बहिणीकडे जावे. बहिणीने शुभ मुहूर्त बघून भावाला ओवाळावे. ओवळताना भावाचे मुख पूर्वेकडे असावे. ओवळ्यानंतर यमाच्या नावाने चौमुखी दिवा लावून उबंरठ्याबाहेर ठेवावे. बहिणीने भावाच्या आवडीचे पदार्थ तयार करावे. जेवणात तांदळाचा पदार्थ अवश्य असावा. भावाने ओवाळणी म्हणून बहिणीला भेटवस्तू द्यायला हवी.
या दिवशी देशातील काही ठिकाणी चित्रगुप्ताच्या मंदिरात जाऊन दौत-टाकाची आणि चित्रगुप्ताचे पूजन केले जाते. या दिवशी यमराजाने आपली बहीण यमुनेच्या घरी जाऊन तिला वस्त्रे, अलंकार इत्यादी वस्तू देऊन तिच्या घरी भोजन केले म्हणून या दिवसाला यमद्वितीया असेही म्हणतात. या दिवशी यमुना नदीत स्नान करणे अत्यंत पवित्र मानले जाते.
या दिवशी यम आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवावयास गेला व नरकात पिचत पडलेल्या जीवांना त्या दिवसापुरते मोकळे केले. म्हणून या दिवशी भावाने बहिणीकडे जावे आणि बहिणीने भावाला ओवाळावे. बहीण-भावाच्या प्रेमाचा हा अत्यंत मंगल दिवस ‘भाऊबीज’ म्हणून साजरा केला जातो. एखाद्या स्त्रीला भाऊ नसेल तर तिने कोणाही परपुरुषाला भाऊ मानून ओवाळावे.
ते शक्य नसल्यास चंद्राला भाऊ मानून ओवाळण्याची पद्धत आहे. आपल्या भावाला अपमृत्यू येऊ नये, तो चिरंजीव राहावा, अशी बहीण प्रार्थना करते. अपमृत्यु येऊ नये म्हणून धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी आणि यमद्वितीयेस मृत्यूची देवता यमधर्म याचे पूजन करून त्याच्या चौदा नावांनी तर्पण करण्यास सांगितले आहे.
कार्तिक शुद्ध द्वितीया म्हणजेच यमद्वितीयेलाच भाऊबीज म्हटले जाते. या दिवशी भाऊ बहिणीकडे हक्काने जातो. प्रेमाने जातो, औक्षण केल्यावर तिला प्रेमाने भेटवस्तू देतो. मान्यता आहे की, या दिवशी बहिणीच्या घरी भोजन केल्याने भावाचे आयुष्य वाढते.
धर्म ग्रंथांप्रमाणे, कार्तिक शुक्ल व्दितीयाच्या दिवशी यमुनाने आपला भाऊ यमला आपल्या घरी बोलवुन सत्कार करुन जेवू घातले. यामुळे या सणाला यम व्दितीया या नावाने देखील ओळखले जाते. तेव्हा यमराजने प्रसन्न होऊन यमुनेला वर दिला कि जो मनुष्य या दिवशी यमुनेत स्नान करुन यमाचे पूजन करेल, त्याला मृत्यूनंतर यमलोकात जावे लागणार नाही. सूर्याची पुत्री यमुना सर्व कष्टांचे निवारण करणारी देवी स्वरुप आहे.
त्यांचे भाऊ मृत्युचे देवता यमराज आहे. यम व्दितीयाच्या दिवशी यमुना नदीत स्नान करुन आणि तेथेच यमुना आणि यमराजची पूजा करण्याचे मोठे माहात्म मानले आहे. या दिवशी बहिण आपल्या भावाला टिळक लावून त्याच्या दिर्घायुष्यासाठी यमराजकडे प्रार्थना करते. स्किंद पुराणात लिहिले आहे की, या दिवशी यमराजला प्रसन्न करणा-यांना मनाप्रमाणे फळ मिळते. धन-धान्य, यश आणि दिर्घायुष्य प्राप्त होते.