भर किर्तनात ताजोद्दिन महाराजांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
नंदुरबार : किर्तनाचा फड रंगला असतानाच भर किर्तनात स्टेजवरच हृदयविकाराच्या झटक्याने एका किर्तनकाराचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना नंदूरबार जवळील जामोद या गावी घडली आहे.
किर्तनकार ताजोद्दिन महाराज शेख यांचे किर्तन नंदूरबार जवळील जामोद या गावी किर्तन आयोजिले होते. किर्तनसेवा चालू असताना व मुखात हरिनामाचा गजर चालू असताना छातीत दुखत असल्याने किर्तनकार ताजोद्दिन महाराज शेख खाली बसले. थोड्या वेळातच त्रास वाढल्याने ते एका वारकरी संप्रदायातील व्यक्तीच्या मांडीवर झोपून गेले.
तुका म्हणे येथे भजन प्रमाण ||
काय थोरपण जाळावेते प्रमाण||
किर्तनकार ताजोद्दिन महाराज शेख हे कीर्तनामध्ये वरील अभंगाचे निरुपण करूत असतानाच त्यांच्या छातीत अचानक दुखू लागले. किर्तन चालू असताना ते खाली बसले. स्टेजवरील सहकाऱ्याच्या मांडीवर डोके टेकवून थोडावेळ तसेच पडून राहिले. तिथेच त्यांनी आपले प्राण सोडले. त्या किर्तनाचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे.
कीर्तन चालू असताना भजन करताना मरण येणे हे साधूत्वाचे फार मोठे लक्षण आहे असे बोलले जाते. ताजोद्दीन महाराज हे मुस्लिम समाजातील असताना देखील त्यांनी सांप्रदायाची पताका खांद्यावर घेऊन समाज प्रबोधन केले.
शिवचरित्रावर गाढा अभ्यास
ताजोद्दीन महाराज यांचा शिवचरित्रावर गाढा अभ्यास होता, त्यांनी आपल्या किर्तनातून शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरीत्रावर नेहमीच प्रकाश टाकला.
त्यांच्यावर जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील बोधलपुरी येथे दुपारी साडेबारा वाजता अंत्यसंस्कार होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.