भय इथले संपत नाही
विशेष संपादकीय
कोरानाच्या दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात अभूतपूर्व स्थिती निर्माण झाली आहे. आरोग्याचा सर्वात मोठा प्रश्न सर्वांसमोर उभा ठाकला आहे. दररोज कितीतरी कोरोना बाधित रुग्ण जगाचा निरोप घेताहेत. धडधाकट आप्तस्वकीयांना श्रद्धांजली वाहण्याची वेळ आलीय. कुठे रेमडेसिविरअभावी, तर कुठे ऑक्सिजनअभावी रुग्ण दगावताहेत. यावर काय लिहावं? काय बोलावं? सभोवतालची परिस्थिती पाहून शब्दही थिजले आहेत.
भाजपची सत्ता नाही म्हणून महाराष्ट्राला केंद्राकडून पुरेश्या सुविधा मिळत नाहीत? महाराष्ट्र सरकारचे प्रयत्न कमी पडताहेत? लोकं गाफिलपणे वागताहेत? की आणखी काही? याची उत्तरे काहीही असोत. कोण कमी पडतंय हा वादातीत मुद्दा बाजूला ठेवून जे घडतंय ते भयावह आहे, हे मात्र स्वीकारावेच लागणार आहे. नुकतीच नाशकात घडलेली घटना मन सुन्न करणारी आहे. विविध माध्यमातून याचा वृत्तांत आपण वाचलाच असेल. काय चूक होती हो त्या रुग्णांची? नाशकात मृतांचा आकडा मोठा होता म्हणून ही घटना “हार्डन्यूज” बनली. पण, हरेक जिल्ह्यात कुठेना कुठे रेमडेसिविर लसीअभावी, तर कुठे ऑक्सिजनअभावी रुग्ण दगावताहेत. मरणारी प्रत्येक व्यक्ती महत्त्वाची नाही का? आपण काय विचार करताय? अहो, जो देश महासत्तेकडे आगेकूच करू पाहतोय त्या देशात रुग्णांना बेड मिळू नये? रेमडेसिविरअभावी, ऑक्सिजनअभावी जीव सोडावा? काय ही शोकांतिका आहे. हा मुद्दा झाला सिस्टीमचा.
आज जे काही घडतंय त्याला केवळ सरकार किंवा सिस्टिमच जबाबदार आहे? कदापीही नाही. या परिस्थितीला जेवढी सिस्टीम जबाबदार आहे तेवढेच आपणही जबाबदार आहोत. निवडणुकांच्या सभांना नेत्यांनी बोलावले. कारण त्यांना गर्दी आणि मते हवीत. हा त्यांचा भाग झाला. कोरोनाच्या उद्रेकात ज्यांनी सभा आयोजिल्या ते तर मारेकरी आहेतच, पण जे सभेला गेले आणि कोरोना स्प्रेडर बनले त्यांच्याइतके मूर्ख कोणीच नाहीत. पश्चिम बंगाल असो वा पंढरपूर. याचा व्हायरस स्प्रेडींग इम्पॅक्ट आता दिसू लागलाय. कुंभमेळ्याने तर हद्दच केली. साक्षात देवस्वरूप (?) महाराजच कोरोना बाधित झाले. काहीजण दवाखान्यात दाखल व्हावे लागेल म्हणून पळून गेले. काय चाललंय नेमकं?
आपण आपला विवेक हरवून बसलोय. भाजी मार्केटमध्ये गर्दी, दुकानात गर्दी, रस्त्यावर गर्दी, लग्नात गर्दी, अगदी गावाच्या किंवा शहराच्या चौकात गर्दी. सार्वजनिक ठिकाणची जिवंत माणसांची दिसणारी गर्दी स्मशानातील प्रेतांच्या गर्दीत कशी रुपांतरीत झाली ते कळलेच नाही. ही परिस्थिती आपणच ओढवून घेतलीय. लोकसंख्येच्या प्रमाणात आपली आरोग्यसेवा पुरेशी नाही हे माहित असतानाही आपण “अनलॉक”च्या धुंदीत हे मरण ओढवून घेतलेय. “फक्त पहिल्या लाटेपुरताच मी असेन’’ असा काय कोरोनाने करार केला होता काय? कोरोनाचे हे संकट कधी हद्दपार होईल तेव्हा होईल.. कोरोना जोपर्यंत अस्तिवात आहे, जोपर्यंत त्याचा बिमोड होत नाही तोवर हे मरण असंच आपल्या आजूबाजूला घोंगावत राहणार आहे. मास्क, सुरक्षित अंतर, सॅनिटायझर ही पूर्वखबरदारी जितकी महत्वाची आहे तितकेच आपण आपल्यात विवेकबुद्धी प्रज्वलित करणे महत्वाचे आहे.
लक्षात ठेवा. आपण जिवंत राहिलो तर जग जिंकलो.. नाहीतर हे अभागी, अकाली मरण आ वासून उभा आहे. या जगव्यापी संकटात आपल्या नातेवाईकांना, मित्रांना धीर देवूया.. शक्य तेवढा मानसिक, आर्थिक आधार देवूया. “भय इथले संपत नाही” हा शब्द खोटा ठरवून कोरोनामुक्त, भयमुक्त, निरोगी आणि विवेकी आयुष्याचा मार्ग मुक्रर करूया.. एवढेच आपल्या हातात आहे..
– डॉ. बाळासाहेब मागाडे