भदंत नागार्जुन सुरई ससाई : शांतीचा संदेश पोहोचवणारा धम्मदूत
डॉ. घपेश ढवळे यांची स्पेशल स्टोरी
बुद्धांच्या विचारांनी प्रेरीत होऊन अवघ्या तारुण्यात शांती आणि धम्माच्या शोधासाठी जपानवरून आपल्या सर्व सुख, शांतीचा त्याग करून बुद्धांच्या विचारांना जगभर पोहोचवण्याची प्रेरणा घेऊन भारतात आलेले आदरणीय भदंत नागार्जुन सुरई ससाई यांनी आज वयाच्या 87 व्या वर्षात पदार्पण केलंय. त्यांनी बौद्ध धम्मासाठी भारताला दिलेली सेवा आणि धम्माच्या कटिबद्धतेसाठी केलेले प्रयत्न, बुद्धांचे विचार देशातील कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी केलेली देशाची परिक्रमा आपण कधीच विसरू शकणार नाही.
त्यांनी १९६० काकाशिमा प्रीफेक्चरीत काओओ-जी (निचेरन-स्कूल) येथे शालेय प्रशिक्षण पूर्ण केले. १९६५ थायलंडमध्ये भिक्खू प्रशिक्षण पूर्ण करून १९६६ मध्ये भन्तेजी भारतात आले आणि निशिदत्सू फुजी यांना भेटले. फुजींनी त्यांना राजगीरमधील शांती पॅगोडाच्या बांधकामासाठी (पीस पॅगोडा) मदत केली. तथापि, फूजीसह ते बाहेर पडले. परंतु त्यांनी सांगितले की परतीच्या प्रवासात त्यांना एक स्वप्न पडले व त्यात नागार्जुनसारखी आकृती दिसली आणि म्हणाली, “नागपूरला जा.” भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई १९६७ मध्ये नागपुरात आले. जपान व्यतिरिक्त मराठी किंवा कुठलीच भाषा बरोबर येत नसल्यामुळे नागपुरातही त्यांना खूप संघर्ष करावा लागला. त्यातच त्यांनी नागपुरमध्ये १९५६ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा दीक्षा सोहळ्यात मुख्य भूमिका वठविणारे वामनराव गोडबोले यांची त्यांनी भेट घेतली.
त्यांनी गोडबोलेंच्या घरी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची छायाचित्रे पाहिली. तेव्हा त्यांना जाणवले की, डॉ.आंबेडकरांसारखे तेजस्वी पुरुष आपल्याला स्वप्नात दिसले आहेत. सुरुवातीला, नागपूरच्या रहिवाशांना सुरई ससाई अतिशय विचित्र वाटले होते. त्यानंतर ससाईंनी “जय भीम” हे शब्द उच्चारून विहारांची निर्मिती करून लोकांना एकत्र करण्यास सुरुवात केली.
आनंदनगर येथील कोठारी भवनात त्यांनी बरेच दिवस काढले. यानंतर त्यांनी इंदोरा येथे वास्तव्य सुरू केले. इंदोरा येथे भव्य विहार उभारले. यानंतर मनसर, रामटेक येथे भव्य दिव्य बुद्धविहाराची निर्मिती केली.
विदर्भ ही बुद्धांची भूमी आहे, म्हणून येथे उत्खनन करावे यासाठी पुढाकार घेतला. १९९२ मनसर अवशेषांचे खोदकाम करण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. निवेदने, विविध लोकांच्या भेटीगाठी आणि मनसरवरील विविध लेख, संदर्भ ग्रंथ यांच्या आधारावर त्यांनी सरकारकडून खोदकाम करण्याची परवानगी घेतली. त्यामुळे आज मानसर टेकड्यावर जे काही बुद्धांचे अस्तित्व आणि बौद्धकालीन वस्तू पहायला मिळतात त्यांचे सर्व श्रेय भदंत सुरेई ससाई यांना जाते.
१९९२ बौद्धगयेतील महाबोधी विहार मुक्त करण्यासाठी ‘संघर्ष’ केला. उरगेन संघरक्षित यांनी सुरू केलेला महाबोधी महाविहार मुक्तीचा लढा त्यांनी पुढे सुरू ठेवला. काही विशिष्ट वर्चस्ववादी लोकांच्या नियंत्रणातून बिहारचे महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाची धुरा त्यांनी आपल्या खांद्यावर घेऊन आजही त्या मुक्तिलढा यासाठी ते वयाच्या 87व्या वर्षीही प्रयत्नशील आहेत .
महाबोधी विहार मुक्त करण्याच्या मोहिमेतील प्रमुख नेत्यांपैकी ते एक आहेत. यासाठी पहिली सभा इंदोऱ्यात घेतली होती. या सभेमध्ये नागपूरच्या खूप लोकांचा सहभाग होता आणि प्रतिसादही भरभरून मिळाला त्यामुळे आज महाबोधी महाविहाराचा प्रश्न मार्गी लागण्याच्या वाटेवर आहे. पण त्यासाठी मागील चाळीस वर्षापासू भंन्तेजी अहोरात्र प्रयत्न करत आहेत.
२४ सप्टेंबर १९९२ रोजी देशभर धम्मरथ काढला. या धम्म रथाच्या माध्यमातून भंन्तेजींनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा विचारातील समतावादी बौद्धमय भारत बनविण्यासाठी देशभर प्रयत्न केले. या धम्मरथाला पूर्ण देशभरात खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्याचीच प्रचिती आज भंते नागार्जुन सुरई ससाई यांनी सुरू केलेला धम्मविचारांचा वारसा त्यांचे धम्म अनुयायी पूर्ण करताना दिसतात.
नागपूर दीक्षाभूमी येथील ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती’चे अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी म्हटले की, “दीक्षाभूमी जागतिक भूमी आहे. तिचे पावित्र्य जगात आहे. बाबासाहेबांच्या स्वप्नातील धम्म संस्कार केंद्र तयार करण्याच्या दिशेने प्रयत्न केले जातील. यासाठी मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत धम्म आणि त्यांच्या विचारांशी एकनिष्ठ राहीन. कुठलीच तडजोड करणार नाही.” हे त्यांचे शब्द म्हणजे त्यांच्यावर असलेला बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा प्रभाव म्हणावा लागेल.
हैदराबाद येथील हुसेनसागर तलावात बुद्धाची मूर्ती मिळाली असता आंध्रप्रदेश सरकारकडून होत असलेली दिरंगाई यासाठी भंन्तेजींनी नागपूरवरून हैदराबाद येथे जाऊन आपल्या हजारो धम्म बांधवासोबत शांती आंदोलन करून आंध्र प्रदेश सरकारला हुसेनसागर तलावात मूर्ती स्थापन करण्यास बाध्य केले. आज हैदराबाद येथील हुसेनसागर तलावात भव्यदिव्य तथागत भगवान गौतम बुद्धाची मूर्ती दिसते त्यातून भंन्तेजींची धम्मासाठी असलेली कटिबद्धता समर्पण आणि एकनिष्ठता दिसून येते.
१९८६ साली बौद्ध मंडळ, नागपूर यांच्याकडून त्यांचा सत्कार झाला. आजपर्यंत विविध देशाच्या आंतरराष्ट्रीय पुरस्काराने भंन्तेजींना सन्मानित करण्यात आलेय. महाराष्ट्र सरकारचा अत्यंत मानाचा आणि प्रतिष्ठेचा असलेल्या नागभूषण पुरस्कार हा 2004 मध्ये त्यांना देण्यात आला. हजारो पुरस्कार भंन्तेजींना मिळाले. भंन्तेजींनी बुद्धांच्या विचारांची सांगड घालून विविध पुस्तके लिहिली आहेत. लॉकडाऊनच्या काळात सतत एक वर्षापर्यंत भंन्तेजींच्या मार्गदर्शनात गरिबांना मोफत जेवण दिलं जात होतं. सोबतच राशन किट वाटली जात होती. जेव्हा केंद्र सरकारने रेल्वे गाड्या सुरू केल्या तेव्हा इंदोरा बुद्धविहार मधून रेल्वेत जाणाऱ्या सगळ्या प्रवाशांना मोफत जेवणाचे पॉकिट दिलं जात होतं. त्यात भंन्तेजी स्वतः जातीने लक्ष द्यायचे आणि स्वतः उपस्थित राहून सर्वांना मार्गदर्शन करायचे. देशातील गरीब विद्यार्थ्यांना नागपुरात शिकता यावं म्हणून भंन्तेजींनी इंदोरामध्ये नालंदा वस्तीगृहाची निर्मिती केली. त्यामध्ये देशातील विविध राज्यांच्या 40 मुली आज मोफत शिक्षण घेतात. सोबतच विद्यार्थ्यांसाठी एक आणि विद्यार्थ्यांनीसाठी एक लायब्ररीही सुरू केली त्यामध्ये शहरातील विविध भागातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात. दरवर्षी 30 ऑगस्टला दिवसानिमित्त समाजात उत्कृष्ट काम करणाऱ्या लोकांचा सत्कार केला जातो. सर्व नियोजन करणारे अमित गडपायले आणि इंदोरा बुद्धविहाराची टीम कौतुकास पात्र आहे.
मागील दोन वर्षापासून लॉक डाऊनमुळे भंन्तेजी यांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम होऊ शकला नाही. मात्र, या कार्यक्रमानिमित्त गरजू विद्यार्थी आणि गरिबांना होणारी मदत बंद झालेली नाही.
२००९ मध्ये भदंत नागार्जुन सुरई ससाई यांनी जपानमध्ये ४४ वर्षांनंतर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भारतीय बुद्धांचे विविध तत्वज्ञान, बुद्धांच्या विचारातील समता, बंधुता, प्रेम, त्याग, माया, वात्सल्य, आणि जगण्याचा तत्वज्ञान, बाबासाहेबांचे राष्ट्रप्रेम याबाबतची सर्व मांडणी त्यांनी जपानला जाऊन आपल्या भाषणांतून केली. एखाद्या व्यक्तीचे एखाद्या देशावर, त्या देशातील एखाद्या विचारवंताच्या विचारावर आणि धर्मावर असलेली प्रेमनिष्ठा आणि धर्माबद्दल असलेलं आत्मसमर्पण त्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले.
पूर्वीच्या आपल्याच देशात जाऊन भारतातील बौद्ध आणि बाबासाहेबांचे विचार तेथील लोकांना पटवून देण्यासाठी मनाचा मोठेपणा हवा असतो. भदंत नागार्जुन सुरई ससाई हे समतेच्या विचारांनी प्रेरित होऊन बुद्धाच्या विचाराचे धम्मदूत झालेत.