भटक्या विमुक्त जमाती संघटनेचे सुवर्ण महोत्सवी अधिवेशन नागपुरात
शरद पवार, यशवंत मनोहर यांची उपस्थिती
यवतमाळ : प्रतिनिधी
भटक्या विमुक्त जमाती संघटनेचे सुवर्ण महोत्सवी अधिवेशन नागपूर येथे दिनांक ८ आक्टोबर रोजी संपन्न होणार असून देशाचे माजी कृषी मंत्री शरदचंद्र पवार हे अधिवेशनाला प्रामुख्याने उपस्थित राहणार असल्याची माहिती संघटनेचे विदर्भ प्रदेशाध्यक्ष प्रशांत वंजारे यांनी दिली.
१९७२ साली स्थापन झालेल्या भटक्या विमुक्त जमाती संघटनेचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. भटक्या विमुक्तांच्या न्याय्य हक्कांसाठी सदर संघटना कार्यरत आहे. आंदोलनाची विविध मार्ग अवलंबून संघटनेने अनेक लढे लढले आणि यशस्वी केले आहे. हजारो एकर जमीन भटक्या विमुक्तांना मिळवून देण्यात या संघटनेचा मोठा वाटा आहे.
नागपुरातील सुरेश भट सभागृहात संपन्न होणाऱ्या या अधिवेशनात विविध विषयांवर चर्चा होणार आहे. विविध ठराव शासनापुढे मांडले जाणार आहेत. भटके विमुक्त ज्या ठिकाणी राहत आहेत त्या जागा आणि कसत असलेल्या गायरान जमीनी शासनाने तात्काळ त्यांच्या नावावर करून द्याव्यात या प्रमुख मागणीसह विविध मागण्या आणि विषय अधिवेशनाच्या निमित्ताने उपस्थितांसमोर ठेवण्यात येणार आहे.
सुप्रसिद्ध आंबेडकरी विचारवंत यशवंत मनोहर हे या अधिवेशनाचे अध्यक्षस्थान भुषविणार असून कोल्हापूरचे शाहु महाराज, बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम, भटक्या विमुक्त जमाती संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष लक्ष्मण माने हे मार्गदर्शन करणार आहेत. या अधिवेशनाला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून अधिवेशन यशस्वी करण्याचे आवाहन प्रशांत वंजारे यांनी केले आहे.
नागपूर भटक्या विमुक्त जमातींच्या चळवळीचा आरंभ स्वातन्त्रपूर्व कालखंडामध्ये झाला असला तरी तो गुन्हेगार जमातीच्या मुक्तीचा संघर्ष होता. या चळवळीचे नेतृत्व आदरणीय भिमराव गुरुजी, दादासाहेब मोपरे , विठठलराव गायकवाड , तिपन्ना गायकवाड, बोधक नगरकर गुरुजी, नागनाथ गुरुजी, सदोबा जाधव परशुराम जाधव, हैदर शेख, सिद्राम नंदुरकर, चंद्रसेन जाधव, तुकाराम बुवा श्रीरंग गायकवाड, लोहार, सिदू इत्यादीच्या यांच्या नेतृत्वाखाली संघर्ष झाला व १ ९ ५२ साली तीन तारांच्या कम्पाउंडमधून हा समाज मुक्त झाला.
१९७२ साली महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या काळामध्ये साथी दौलतराव भोसले यांचे नेतृत्वाखाली मंबई येथे मोठा मोर्चा काढण्यात आला . या मोर्चानंतर आदरणीय नाईक साहेबांनी या समाजामधील पहिला आमदार दौलतराव भोसले यांना विधान परिषदेमध्ये नेमले. १९ ७२ ते १९८२ आमदार दौलतराव भोसले यांनी नेतृत्व केले. १९८० ला ‘उपरा’ लक्ष्मण माने यांचे आत्मचरित्र आले. १९८३ ला पिपरी येथे पहिले अधिवेशन झाले. या अधिवेशनामध्ये दौलतराव भोसले अध्यक्ष आणि लक्ष्मण माने कार्याध्यक्ष झाले.
उपराच्या यशानंतर या समाजाच्या जागृतीची लाठ सूरू झाली. वयोमानानुसार मुंबई येथील अधिवेशनात लक्ष्मण माने यांची अध्यक्षपदी निवड करणेत आली. १९८३ ते आजतागायात लक्ष्मण माने या संघटनेचे नेतृत्व करीत आहेत. लक्ष्मण गायकवाड, मोतीराज राठोड , दादासो , मोरे , वैजनाथ कळसे गुलाब वाघमोडे इत्यादी साहित्यीकांच्या पहिल्या पिढीने मोठी मुसंडी मारली. मराठी साहित्य विश्व मराठी वाचक , मराठी मध्यम वर्ग खडबडून जागा झाला . आणि या चळवळीला गती आली. वर्तमान पत्र प्रसार माध्यमे यांनी फार मोलाची मोठी मदत केली. हजारो मेळावे, परिषेदा , रस्ता रोखो जेलभरो , जागा जमिनी यासाठीचे लढे तुरूंगवास या समाजातील हजारो कार्यकर्त्यांनी भोगले व हाजारो एकर गायरान जमिनीवर अतिक्रमणे केली. त्या जागा व जमिनी आज या समाजाच्या वहिवाटीखाली आहेत.
या सर्व कामात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष या भटक्या विमुक्तांना आधार देणारे आधारवड म्हणून यशवंतराव चव्हाण साहेबांच्यानंतर शरद पवार साहेबांनी मोठे योगदान दिले. त्यांना ८ ऑक्टो . २०२२ रोजी ‘ लोकशाही समाजवादाची राखण करणारा जाणता राजा हा किताब कोल्हापूर संस्थानचे अधिपती श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते या किताबाचे वितरण होणार आहे. हा सुवर्णमहोत्सव आपल्या सर्वांच्या आनंदाचा दिवस आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज व भटके विमुक्त यांचे मायलेकराचे नाते आहे. या कार्यक्रमाला शाहू महाराज येत आहेत. याचा आम्हाला विशेष आनंद आहे. बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष थोर विचारवंत वामन मेश्राम या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित रहाणार आहेत. तर या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्रातील थोर विचारवंत व्यासंगी विद्वान व आंबेडकरवादी चळवळीचे ज्यांनी वैचारीक नेतृत्व केले ते कवीवर्य डॉ . यशवंत मनोहर या कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवून कार्यक्रमाची शोभा वाढविणार आहेत.
अधिवेशनापुढील विषय
१. भटके विमुक्त ज्या ठिकाणी रहात आहेत त्या जागा व कसत असलेल्या गायराणी जमिनी शासनानी तात्काळ त्यांच्या नावे करुन दयाव्यात.
२.खासबाब म्हणून भटक्या विमुक्त जमातीच्या टक्केवारीप्रमाणे त्यांचे रिक्त जागा तात्काळ भरण्यात याव्यात . इतरांचे नियम त्यांना लागू करू नयेत.
३. या समाजातील नागरिकांना जातीचे सर्टिफिकेट मिळणेकामी सन १९६१ सालचा पुरावा मागण्यात येवू नये. स्थळपहाणी करून त्यांना जातीची प्रमाणपत्रे देण्यात यावीत.
४. जात पडताळणी समिती ही गैरलागू असून ती तात्काळ बरखास्त करण्यात यावी. व जिल्हाधिकारांनी खास अधिकाऱ्यांची नेमणूक करून भटक्या विमुक्तांना जात पडताळणी प्रमाणपत्र त्वरीत देण्यात यावे.
५. या समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची व्यवस्था , विशेषता आश्रमशाळेची व्यवस्था , शासकीय आश्रमशाळेप्रमाणे १०० टक्के अनुदान देवून व्यवस्था करणेत यावी.
६. भटक्या विमुक्त समाजातील विदयार्थाना शिष्यवृत्ती तात्काळ देणेत यावी म्हणजे त्यांचे महाविदयालयीन जीवन सुरळीत होईल . त्यांच्या शिक्षणाचा सर्व खर्च राज्य व केंद्र सरकारने करावा.
७. विदर्भामधील धिवर व भोई समाजाला स्थानीक तलाव त्यांना भाडेपटटयाने देणेत यावेत , मासेमारीचे आधुनिक तंत्रज्ञान , मस्त्यबीज , मस्त्यखादय माशांचे संगोपन यासाठी प्रशिक्षण देणेत यावे. व सर्व प्रकारची आर्थिक मदत करुन धिवर समाजाला तात्काळ उभे करावे. महिला व बालकांना अधिवासी प्रमाणे खावटी मदत द्यावी. या समाजातील विधवांचे प्रमाण भयावय आहे. हे लक्षात घेवून माजी खासदार जतीराम बर्वे यांच्या नावाने मस्त्यो विकास व संशोधन संस्था भंडारा जिल्हयामध्ये सूरु करणेत यावी व सर्व मच्छीमारांना सरकारने संरक्षण द्यावे.
८. देशभरातून बंजारा समाज मोठयासंख्येने यवतमाळ जिल्हयातील पोहरादेवी या ठिकाणी जमत असतो . संतसेवालाल महाराज हे महापुरूष संत घाडगे बाबा , संत तुकडोजी महाराज , संत कैकाडी महाराज यांच्या सारखे मोठे संत होते . राज्य शासनाने यांची कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही . या भटक्या विमुक्त समाजाला संत सेवालाल महाराजाच्या नावाने पोहरादेवी येथे संत सेवालाल महाराज शासकीय वैदयकीय महाविदयालय तात्काळ सुरू करणेत यावे.
९. महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री मा.स. तथा दादासो कन्मवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते . हे महाराष्ट्रातील राज्यकर्ते व जनता विसरले आहेत. त्यांची साधी जयंती सुध्दा सरकार करत नाही. किंवा विधीमंडळात साधा फोटोही लावला नाही. ते बेलदार या भटक्या जमातीमध्ये जन्माला आले म्हणूनची तर उपेक्षा नाही. ते मध्य प्रांततही मंत्री होते व या समाजाचे तोला मोलाचे नेते होते. त्यांच्यावर फार मोठा अन्याय झाला आहे. त्याचा खेद आम्ही व्यक्त करतो आणि त्यांच्यानावाने त्यांच्या जिल्हयामध्ये भटक्या विमुक्त जमातीचा व अधिवाशी जमातींचे स्वतंत्र विदयापीठ स्थापन करणेत यावे व त्यांची स्मृती जतन करणेत यावी.
१०. नाथपंथाचा संबंध भटक्या विमुक्ताशी फार आहे. यांच्या सर्व यात्रा नाथाच्या नावाने भरतात. मध्ययुगीन कालखंडामध्ये बौध्द धम्माच्या तंत्रयान या पंथातून नाथसंप्रादायाचा जन्म झाला असावा. असा जानकारांचा मतप्रवाह आहे.
हे सारे नाथपंथीय आहेत. हे सारे बौद्ध अनुयायी आहेत. याचे अनेक दाखले इतिहासाच्या पाना पानावर आहे. परंतु यांचा सगन पध्दतीने अभ्यास झालेला नाही. डॉ . बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विदयापीठाला स्वतंत्र अध्ययान सुरू करावे अशी मागणी ही सभा करीत आहे. या स्वरूपाच्या अनेक मागण्या व ठराव या सुवर्णमहोत्सवी अधिवेशनात करावयाच्या आहेत आपल्या भोजनाची व निवासाची व्यवस्था संघटना व संघटनातील कार्यकर्ते व इतर सहकारी करीत आहेत. सर्वांनी या आनंदोत्सावात सहभागी कायचे आहेत . शिस्तीने गेली ५० वर्ष ही चळवळ आपण यशस्वीपणे चालविली आहे . तिला गालबोट लागेल असे कोणतेही कृत्य करावायाचे नाही . सोबत संघटनचे कार्यकर्ते आहेत . सर्वांनी शक्यतो रेल्वेचा प्रवास करावायाचा आहे . दिनांक ६ ऑक्टोबर रोजी तिकट बुकींग करावयाचे आहेत . सुरक्षित जायाचे आहे व सुरक्षित यायचे आहे . गेली ५० वर्षात ज्यांनी ज्यांनी या चळवळीत योगदान दिले त्या सर्वांचा ‘ गौरव ‘ सन्मान पत्र देवून आपण करणार आहोत . आपले काही सहकारी हयात नसतील तर त्यांचा मरोणोत्तर पुरस्कार त्यांच्या वारसदारांना देणेत येणार आहे . ज्यांनी ज्यांनी योगदान दिले त्या सर्वांच्या प्रति आपण कृतज्ञता व्यक्त करीत आहे . प्रवासात वृध्दाची काळजी घ्यावाची आहे . व त्यांना घरी पोहोचविणे पर्यंत कार्यकत्यांनी काम करवयाचे आहे . आपण या सारे या ! आपण चला । सारे चालु लागतील आम्ही आपल्या स्वागतास सज्ज आहोत.
स्थळः कवीवर्य सुरेशभट नाटयगृह , नागपूर . वेळ : सकाळी ११ ते रात्री ८
पाहा खास व्हिडिओ