ब. मो. पुरंदरेंच्या पंढरपुरातील माफीनाम्याची गोष्ट
संभाजी ब्रिगेडचा घेतला होता धसका
थिंक टँक न्यूज नेटवर्क डेस्क
ब. मो. ऊर्फ बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनानंतर त्यांच्या जाण्याने सोशल मीडियावर ‘शोकसागर’ उसळला आहे. शिवजयंतीच्या वादाचे “मूळ” गेल्याची भावना त्यांच्या चाहत्यांमध्ये आहे. ब. मो. ऊर्फ बाबासाहेब पुरंदरे यांच्यासारख्या पहाडी व्यक्तिमत्त्वास वाकवून माफीनामा लिहून घेण्याचा पराक्रम पंढरपुरातील एका कार्यकर्त्याने केला होता. त्याचीही यानिमित्ताने उजळणी झाल्यास ब. मो. यांच्या आत्म्यास चिरशांती लाभेल.
पंढरपुरात लिहून दिला होता माफीनामा
ब. मो. ऊर्फ बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवजयंती ही तारखेनुसार की तिथीनुसार करायची याबाबत वाद घालून ठेवला होता. त्याचे दृश्य परिणाम आजही शिवजयंती साजरी करण्याच्या मतभेदातून स्पष्टपणे दिसून येतात. ब. मो. ऊर्फ बाबासाहेब पुरंदरे यांना यातून नेमका कोणता आनंद मिळाला हे माहीत नाही. यातून येवढे मात्र नक्की झाले की, बहुजनांचे राजे शिवाजी महाराजांची जयंती एकाच महिन्यात दोनवेळा साजरी होऊ लागली. ही गोष्ट निश्चितच शरमेची आहे. या कारस्थानाचे खरे सुत्रधार म्हणूनही ब. मो. ऊर्फ बाबासाहेब पुरंदरे यांना श्रेय जाते.

पंढरपूरवाल्यांनी कसे वाकवले?
शिवजयंतीचा घोळ घालूनही ब. मो. ऊर्फ बाबासाहेब पुरंदरे यांनी कोणताही खुलासा केला नव्हता. उलट त्यांना चळवळीतील कोण्या शांत, संयमी कार्यकर्त्याने शांततामय मार्गाने प्रश्न विचारल्यास ते अजून घोळ घालून ठेवत. त्यामुळे करायचे काय हा प्रश्न होता. संभाजी ब्रिगेडचा त्या काळात झंझावात होता. ब. मो. ऊर्फ बाबासाहेब पुरंदरे हे एका कार्यक्रमानिमित्त पंढरपुरात दाखल झाले. कार्यक्रम सुरू झाला. संभाजी ब्रिगेडची धडाडती तोफ असलेले अमरजित पाटील हे काही कार्यकर्त्यांसमवेत कार्यक्रमस्थळी दाखल झाले. त्यांनी ब. मो. ऊर्फ बाबासाहेब पुरंदरे यांना त्यांच्या स्टाईलने जाब विचारला. त्यांचे आक्रमक रूप पाहून उपस्थितांची तंतरली. आपली आता काही धडगत नाही हे पूज्य ब. मो. यांनी जाणिले आणि ते काही क्षणात शरण गेले.
परिस्थितीनुसार बचावात्मक पवित्रा घेण्याशिवाय ब. मो. ऊर्फ पूज्य बाबासाहेब पुरंदरे यांना दुसरा पर्याय उरला नाही. पहाडासाखा शाहीर वाकला आणि माफीनामा लिहून दिला. हा माफीनामा (जो आम्ही या मजकुराच्या तळाशी पोस्ट केला आहे.) महाराष्ट्राच्या इतिहासात सत्याचा पुरावा म्हणून चिरकाल स्मरणात राहील.