ब्रेकिंग न्यूज, आबासाहेबांच्या प्रकृतीत सुधारणा, कार्यकर्त्यांनी जागून काढली रात्र
भाई गणपतराव देशमुखांच्या प्रकृतीचे ताजे अपडेट
सोलापूर (विशेष प्रतिनिधी) : सांगोला तालुक्याचे माजी आमदार तथा शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉ. गणपतराव देशमुख यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. आबासाहेबांचे नातू डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी ‘थिंक टँक लाईव्ह’शी सकाळी ६ वाजता बोलताना ही दिलासादायक माहिती दिली आहे.
मागील ५१ वर्षे सांगोल्याच्या बालेकिल्ल्यात विजयश्रीचा झेंडा रोवणारे आबासाहेब प्रकृती अस्वास्थ्यावर मात करून पुन्हा बरे होतील, या अपेक्षा प्रज्वलित झाल्या आहेत.
याबाबत आबासाहेबांचे नातू डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्याशी ‘थिंक टँक लाईव्ह’ प्रतिनिधीचे बुधवारी सकाळी सहा वाजता संभाषण झाले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार भाई गणपतराव देशमुख यांच्यावर प्रकृतीवर रुग्णालयातील वैद्यकीय पथक सजगपणे लक्ष ठेवून आहे. मंगळवारी व्हेंटीलेटर काढण्यात आले. रात्रभर बायपॅप मशीनद्वारे त्यांची श्वसनक्रिया सुरु आहे. त्यांच्या हृदयाचे ठोके, श्वसनक्रिया, रक्तातील प्राणवायूचे प्रमाण नॉर्मल बनत चालले आहे. उपचारांना ते हळूहळू चांगला प्रतिसाद देत आहेत. असे असले तरी त्यांची प्रकृती अद्याप धोक्याबाहेर नाही. जि.प. सदस्य सचिन देशमुख, लेबर फेडरेशनचे चेअरमन बाबा कारंडे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सोलापूरात तळ ठोकून आहेत.
• शेकाप सरचिटणीस जयंत पाटील थोड्याच वेळात सोलापूरात
शेकापचे सरचिटणीस तथा भाई जयंत पाटील थोड्याच वेळात सोलापूरात दाखल होत आहेत. सोबत माजी आमदार तथा शेकापचे नेते धैर्यशील पाटील हेही येत आहेत. मंगळवारी रात्री पालकमंत्री दत्तात्रय भरणे, माजी मंत्री मिनाक्षीताई पाटील, राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष माजी आम. दीपकआबा साळुंखे-पाटील यांच्यासह राज्यभरातील, जिल्ह्यातील विविध पक्षाच्या नेतेमंडळींनी आबासाहेबांच्या प्रकृतीबाबत विचारपूस केली आहे.
• मंगळवारी आबासाहेबांच्या प्रकृतीबाबत चुकीच्या पोस्ट व्हायरल होत होत्या. त्यामुळे चिंतेत अधीकच भर पडत होती. तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी या काळजीपोटी रात्र जागून काढली आहे.
माजी आ. गणपतराव देशमुख यांना मानणारा हजारो कार्यकर्त्यांचा वर्ग सांगोला तालुक्यात गणपतराव तथा आबासाहेबांना मानणा-या तिन पिढ्या सांगोल्यात आहेत.
• गावागावांत चिंतेचे वातावरण
आबासाहेबांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी, ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी तालुक्यातील गावागावांत कार्यकर्ते घोळका करून जमल्याचे चित्र आहे. अनेकजण एेकमेकांना फोनकॉल करून विचारपूस करताना दिसत आहेत.
अश्विनी रुग्णालयाबाहेर गर्दी
सोलापूरातील अश्विनी रुग्णालयात आबासाहेबांवर उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती नाजूक बनल्याचे समजताच असंख्य कार्यकर्ते सोलापूरात आल्याचे दिसून येत आहे. रुग्णालय परिसरात गर्दी करण्यास अटकाव करण्यात आला असला तरी शेकडो कार्यकर्ते सोलापूरात तळ ठोकून आहेत.
(आबासाहेबांच्या प्रकृतीबाबतचे ताजे अपडेट ‘थिंक टँक लाईव्ह’वर देत आहोत.)