बेकायदा व अनाधिकृत अतिक्रमणा विरोधात आजपासून सांगोला नगरपरिषदेसमोर उपोषण
संजय शिंदे व मोहसीन मुलाणी यांची पत्रकारांना माहिती
सांगोला/प्रतिनिधीः
वारंवार नगरपरिषद प्रशासनाला अनाधिकृत अतिक्रमणावर कारवाई करण्यासाठी तक्रारी अर्ज व कागदपत्रांची पूर्तता करून देखील नगरपरिषद प्रशासन मात्र तक्रारधारकाऐवजी अतिक्रमणधारकाचीच बाजू धरीत अनाधिकृत अतिक्रमणावर कारवाई करण्यासाठी चालढकलपणा व टोलवाटोलवीची उत्तरे देत असल्यामुळे नगरपरिषद प्रशासनाकडे वारंवार तक्रारी अर्जाची दाद मागून देखील कसलीही कारवाई होताना दिसत नसल्यामुळे लोकशाहीचा मार्ग अवलंबत अर्जदार संजय शिंदे व मोहसीन मुलाणी यांचे नगरपरिषदेसमोर आजपासून बेमुदत आमरण उपोषण असणार आहे.
सांगोला शहरातील नगरपालिका प्रशासन किती बेजबादारपणे वागत असल्याचे चित्र आता सांगोला शहरातील नागरीकांच्या समोर येवू लागलेला आहे. शहरामध्ये अनाधिकृत बांधकामे, अतिक्रमण वाढू नये वाढले तर त्यावर कारवाई करणे ही नगरपालिका प्रशासनाची मुख्य भूमिका असून देखील नगरपालिकेच्या नाकावर टिच्चून काहीजण अनाधिकृतपणे विनापरवाना बांधकामे, अतिक्रमणे करीत असतानादेखील नगरपालिका प्रशासन मात्र गांधारीची भूमिकेत असल्याचे दिसून येत आहे. तर त्याच ठिकाणी गोरगरीब, कष्टकरी आपले पोट भरण्यासाठी काही प्रमाणात तात्पुरत्या स्वरूपाचे जरी अतिक्रमण केलेले दिसले तर नगरपालिका प्रशासन मात्र लगेचच अॅक्शन मोड मध्ये येत त्या गरीबाला आपले अतिक्रमण स्वताहून काढण्यासाठीही वेळ देवू करीत नाही. त्याचे अतिक्रमण जमिनदोस्त होईपर्यंत प्रशासन कंबर कसून काम करते. मात्र त्याच ठिकाणी जर धनदांडगे आपली जागा सोडून इतरांच्या जागेमध्ये अनाधिकृतपणे अतिक्रमण करीत असले तर सांगोला नगरपरिषदेचा त्याला खुलेआम पाठिंबा दिसून येतो. जर कोणी त्याबाबत तक्रार केली तर, त्याला अनाधिकृत अतिक्रमण का केले? त्याबाबत बोलण्याचीही त्याला संधी दिली जाते.
एवढे होवूनदेखील अतिक्रमणधारकाकडून केलेल्या अनाधिकृत अतिक्रमणाबाबत कसलीही कागदपत्रांची पूर्तता त्याने नगरपरिषदेला केली नाही तरी अनाधिकृत अतिक्रमणाबाबत फक्त वारंवार तक्रार येत असल्याच्या कारणामुळे अतिक्रमणधारकाला त्याला आपल्या सोयीनुसार ते काढण्याची मुभा दिली जाते. सांगोला नगरपरिषद प्रशासनाकडून गोरगरीबांना एक न्याय तर इतरांना दुसरा न्याय या दुटप्पी भूमिकेमुळे शहरातील नागरीकांतून प्रशासनाविरोधात नाराजीचा सूर दिसू लागला आहे.