बाळशास्त्री जांभेकर : आद्य संपादक, समाजसुधारक आणि प्राध्यापक
मराठी पत्रकार दिनानिमित्त विशेष लेख
संकलन (नाना हालंगडे)
मूळ लेख : डॉ.राजू पाटोदकर (जिल्हा माहिती अधिकारी)
विश्वविख्यात माध्यमतज्ज्ञ ए.ए. बेर्जर यांनी म्हटले आहे की, वृत्तपत्रांचा इतिहास हा जनतेचा आणि चळवळींचा इतिहास असतो. वृत्तपत्रे सामाजिकीकरणाच्या प्रक्रियेला गती देतात. त्याद्वारे लोकांना सामाजिक संकेत, कार्यात्मक भूमिका आणि मूल्य याबाबतचे शिक्षण दिले जाते आणि याच विचारधारानुसार जवळपास 183 वर्षापूर्वी म्हणजे 6 जानेवारी 1832 रोजी आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी ‘दर्पण’ हे वृत्तपत्र सुरू करून मराठीतील आद्यसंपादक होण्याचा बहुमान मिळविला. त्यांची आठवण म्हणून आपण ६ जानेवारी रोजी दर्पण दिन साजरा करतो. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या महान कार्याची महती सांगणारा हा लेख.
अर्थातच 1832 चा काळ इंग्रजांच्या अधिपत्याचा काळ होता आणि या काळात समाजास प्रबोधनाची मोठी गरज होती. इंग्रजांच्या हातात आपले राष्ट्र असताना आपल्या मनात राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करुन परिस्थितीची जाणीव करुन देण्यासाठी एखादे वृत्तपत्र असावे असे बाळशास्त्रींना वाटले. त्यामुळे इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषेत ‘दर्पण’ या पाक्षिकाची सुरूवात मुंबई येथे करुन मराठी वृत्तपत्र इतिहासाची ज्योत पेटविली. भाऊ महाजन यांच्या सहकार्याने मराठी तर स्वत: बाळशास्त्री इंग्रजी मजकुराची बाजू ‘दर्पण’ साठी सांभाळत. त्यामुळे ‘दर्पण’ तील मजकुराचा दर्जा उच्च स्वरुपाचा होता.
त्याकाळी सुरु झालेल्या मुद्रणालयाचा यथार्थ उपयोग त्यांनी करुन घेतला आणि समाजप्रबोधनासाठी दर्पणची ठिणगी तेवत ठेवली. 25 जून 1840 साली दर्पणचा शेवटचा अंक प्रकाशित झाला. दर्पणच्या माध्यमातून त्यांनी शिक्षण व मनोरंजन यांचा समन्वय साधला. दर्पण हे मासिक इंग्रजी विद्येचा मराठी सार सांगणारे ठरले.
जस्टीस ऑफ पीस
केवळ वृत्तपत्रांद्वारे शैक्षणिक कार्य त्यांनी केले. वृत्तपत्रांसारखे माध्यम आणि त्याची बिकट वाट हे गणित बाळशास्त्रींनी चांगलेच जमविले. केवळ लोककल्याण आणि लोकशिक्षण असाच उदात्त हेतू नजरेसमोर ठेऊन ‘दर्पण’ प्रकाशित केले. याची साक्ष म्हणजे ‘दर्पण’ मध्ये एकही जाहिरात त्यांनी छापली नाही. अगदी स्वत:चे पैसे टाकून जवळपास आठ वर्षे लोकांसाठी वृत्तपत्र त्याकाळी सुरु ठेवले. यावरुनच आचार्य बाळशास्त्री जांभेकरांचा वृत्तपत्र सुरू करण्यामागील हेतू स्पष्ट होतो. तत्कालीन गव्हर्नर जेम्स कार्नाक यांनी जस्टीस ऑफ पीस असा किताब देऊन बाळशास्त्रींचा गौरव केला.
खडतर प्रवास
वडील गंगाधरशास्त्री हे पंडित तर आई सगुणाबाई धार्मिक आणि धर्मपारायणवादी. त्यांचाच वारसा बाळशास्त्रींना मिळाला. कोकणांतील पोंभुर्ले या गावी जन्म आणि तद्नंतर मुंबईतील वास्तव्य, शिक्षण, शिक्षणातील अडीअडचणी, त्यावर केलेली मात. दर्पण दिनदर्शिकेचे प्रकाशन व्यावसायिक अडचणी असा खडतर प्रवास बाळशास्त्री यांनी केला. 1824 च्या सुमारास पोंभुर्ले सोडून बाळशास्त्री मुंबईत आले. त्यांच्या भगिनीचे म्हणजे लाडूबाईचे यजमान रामशास्त्री जानवेकर हे (दी बॉम्बे नेटिव्ह स्कूल सोसायटी) शाळेचे तपासनीस होते. त्यांच्याकडे बाळशास्त्रींची निवास व्यवस्था झाली.
इंग्रजी भाषेचा सखोल अभ्यास करुन विविध विषयांचे ज्ञान मिळवून त्याचा उपयोग आपल्या समाजाला कसा होईल याकडे त्यांचा ओढा होता. अगदी वयाच्या अकराव्या वर्षी संस्कृतचे शिक्षण पूर्ण करुन जांभेकरांनी मुंबई गाठली होती. इंग्रजीचे ज्ञान आत्मसात केले. तत्कालीन प्रमुख 8 भाषा व अनेक शास्त्रात ते पारंगत होते.
ग्रंथसंपदा आणि सन्मान
1834 साली भारतातील पहिले प्रोफेसर म्हणजे प्राध्यापक होण्याचा बहुमान बाळशास्त्रींना मिळाला आणि 1845 साली ते राज्याच्या शिक्षण विभागाचे संचालक झाले. बाळशास्त्रींनी विविध विषयांवर ग्रंथ लिहिले. यात प्रामुख्याने भूगोल, इतिहास, भौतिकशास्त्र, गणित, खगोलविद्या, मानसशास्त्र आदी विषयांचा समावेश आहे. सोप्या आणि साध्या मराठी भाषेत सर्वांना समजतील, असे हे ग्रंथ आहेत. याच बरोबर त्यांनी बालव्याकरण, भूगोलविद्या, सारसंग्रह आणि नीतीकथा हे चार ग्रंथ लिहिले आहेत.
एलिफिन्स्टनकृत हिंदुस्थानांच्या आधारे त्यांनी इतिहास रचला. हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास हा ग्रंथ 1851 साली त्यांच्या निधनानंतर प्रसिद्ध झाला.
आचार्य बाळशास्त्री जांभेकरांबद्दल न्यायमूर्ती ना.ग.चंदावरकर यांनी म्हटले आहे की, “बाळशास्त्री अव्वल इंग्रजी अंमलातील एक थोर विद्वान तसेच ज्ञानाच्या विविध क्षेत्रात लिलया संचार करणारे पंडित होते.” न्यायमूर्तींचे उपरोक्त विधान बाळशास्त्रींच्या शैक्षणिक कार्याचे संक्षिप्त वर्णन आहे.
आचार्य अत्रे यांनी बाळशास्त्री जांभेकरांबद्दल खूपच महत्त्वपूर्ण अशी टिपणी केली आहे. ते लिहितात की, बाळशास्त्री जांभेकर हे बोलके नव्हे तर कर्ते सुधारक होते. केवळ प्राध्यापक म्हणून अध्ययनच न करता बाळशास्त्रींनी आपल्या दर्पण मधून सामाजिक सुधारणेवर भर दिला. दादाभाई नौरोजी हे आचार्य बाळशास्त्रींचे विद्यार्थी होते.
बाळशास्त्री जांभेकर हे आद्य मराठी पत्रकार आणि आद्य समाजसुधारक होते. त्यांच्यासोबत त्यांना आद्य प्राध्यापक संबोधिले जाते. त्यांचे हे महान कार्य पुढील कित्येक पिढ्यांसाठी दीपस्तंभासारखे मार्गदर्शक ठरत आहे. हे आजच्या माध्यम क्रांती संदर्भात अभ्यासले असता सहजतेने लक्षात येऊ शकते.
– डॉ.राजू पाटोदकर
(जिल्हा माहिती अधिकारी, रायगड-अलिबाग)
स्त्रोत : महान्यूज
देशात हजारो निर्घृण हत्या, श्रद्धा-आफताब प्रकरणाचीच का चर्चा?