बाबासाहेबांनी ब्राह्मणांना नव्हे ब्राह्मण्यवादाला विरोध केला : ना. रामदास आठवले
भुसावळ येथे रिपाइंचे जोरदार शक्ती प्रदर्शन
थिंक टँक / विशेष प्रतिनिधी
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी ब्राह्मणांना नाही तर ब्राह्मण्यवादाला विरोध केला. हिंदू धर्मात सुधारणा व्हावी ही त्यांची इच्छा होती. हिंदू धर्मातील विषमता, जातीभेद, चातुर्वर्णव्यवस्थेला डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी विरोध केला होता, असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केले.
भुसावाळ येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर मैदानात रिपब्लिकन पक्षाचा 66 वा वर्धापन दिननिमित्त आयोजित जाहीर सभेत ना.रामदास आठवले बोलत होते. डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्षाच्या 66 व्या वर्धापन दिना निमित्त भुसावळ मध्ये राज्यभरातील हजारो रिपब्लिकन कार्यकर्ते उपस्थित राहिल्याने संपूर्ण भुसावळ निळ्या झेंड्याने आणि गर्दीने फुलून गेले होते.
यावेळी रिपाइं चे राज्य उपाध्यक्ष रमेश मकासरे आणि जळगाव जिल्हा अध्यक्ष राजू सूर्यवंशी यांनी रिपाइं वर्धापन सोहळ्याच उत्कृष्ट आयोजन केले होते.
यावेळी रिपाइं कार्यकर्त्यांनी सभेला प्रचंड गर्दी केल्याने मैदान तुडुंब भरले होते.विचारमंचावर भाजपचे नेते आणि ग्रामविकास क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
रिपाइं चे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष राजाभाऊ सरवदे, राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, राज्य कार्याध्यक्ष बाबुराव कदम, राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष राजा कापसे, आनंद खरात; विवेक कांबळे, विजय वाकचौरे, युवक आघाडी महाराष्ट्र अध्यक्ष पप्पु कागदे, महिला आघाडी राज्य अध्यक्ष चंद्रकांताताई सोनकांबळ, उपाध्यक्ष संगीता आठवले, राज्य सचिव संघमित्राताई गायकवाड, जगदीश गायकवाड; सिद्धार्थ कासारे, दयाळ बहादूर, राजेंद्र खरात, ब्रह्मानंद चव्हाण, श्रीकांत भालेराव, प्रकाश लोंढे, डॉ. विजय मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे विचार देशाला जोडणारे असून संपूर्ण जगातील मानवजातीला समता बंधुता शिकविणारे प्रेरणादायी विचार आहेत.जगाला सर्वात आधी लोकशाही चा बहुजन हिताय बहुजन सुखाय चा विचार बौद्ध धम्माने शिकविला आहे. समतेच्या तत्वाचे उगमस्थान बौद्ध धम्म आहे. त्यामुळे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दिक्षा स्वतः घेतली आणि आपल्या लाखो अनुयायांना दिली असे ना.रामदास आठवले यावेळी म्हणाले.
भारत जोडो यात्रा काढणाऱ्या राहुल गांधींच्या काँग्रेसला 75 वर्षांत भारत जोडो का आठवले नाही? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे भारत आधीपासून एकसंघ आहे आणि एकसंघ राहील. राहुल गांधींची यात्रा ही भारत जोडो पेक्षा तोडोची वाटत आहे त्यांनी भारत जोडो ऐवजी काँग्रेस जोडो यात्रा काढली पाहिजे. असा टोला ना.रामदास आठवले यांनी काँग्रेस ला लगावला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी संविधानाला नतमस्तक होतात. संविधानानुसार देश चालवितात .डॉ बाबासाहेब आंबेडकरांना मानतात त्यामुळे रिपाइं मोदींच्या सोबत आहे असे ना.रामदास आठवले म्हणाले.
रिपब्लिकन पक्ष सर्व जाती धर्मीयांना सोबत घेऊन देशभर संघटन वाढवित आहे.राज्यात भाजप-शिंदे गट आणि रिपाइंचे सरकार असून या सत्तेत रिपाइंला एक मंत्री पद ; महामंडळे, विधान परिषद सदस्यत्व देऊन सत्तेत वाटा दिला पाहिजे याचा पुनरुच्चार ना.रामदास आठवले यांनी केला.
यावेळी रिपाइंच्या महिला आघाडी राष्ट्रीय सरचिटणीस आशाताई लांडगे, परशुराम वाडेकर, ऍड. आयुब शेख, सुमित वजाळे, श्रीधर साळवे, महेंद्र निळे, संदीप देवरे, अनिल अडकमोल, संजय डोळसे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.