
सांगोला/नाना हालंगडे
शेतकरी कामगार पक्ष हा गोरगरीब जनतेचे नेतृत्व करणारा पक्ष आहे. भाई गणपतराव देशमुख यांनी त्यांच्या संपूर्ण राजकीय आयुष्यात सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम केले. भाई डॉ. बाबासाहेब देशमुख हे आबासाहेबांप्रमाणे सुसंस्कृत, विकासाची भूमिका घेऊन, गोरगरिबांसाठी झटत आहेत. त्यांच्या सारखा तरुण तडफदार नेता विधानसभेत जाणे ही तालुक्याच्या दृष्टीने काळाची गरज आहे. शेकापचे बहाद्दर कार्यकर्ते हे काम फत्ते करतील, असा विश्वास शेकापचे ज्येष्ठ नेते बाबा कारंडे यांनी व्यक्त केला.
शेकाप व पुरोगामी युवक संघटना सांगोला यांच्या संयुक्त विद्यमाने बुरुंगेवाडी, भोपसेवाडी, आगलावेवाडी, तरंगेवाडी व जवळा येथे पुरोगामी युवक संघटना नामफलकाच्या उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व ठिकाणच्या कार्यक्रमास शेकापचे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.
जवळा गावात सायंकाळी ४ वाजता जंगी सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आम. भाई संपतराव पवार – पाटील उपस्थित होते. उद्घाटक म्हणून भाई डॉ. बाबासाहेब देशमुख (अध्यक्ष, पुरोगामी युवक संघटना, महाराष्ट्र राज्य) हे उपस्थित होते. यावेळी शेकापचे ज्येष्ठ नेते बाबा कारंडे, माजी सभापती बाळासाहेब काटकर, माजी उपसभापती संतोष देवकते, आनंदा यमगर, मायप्पा यमगर, डॉ. किसन माने, विनायक कुलकर्णी, मधुकर गोरड, शेकापचे चिटणीस दादाशेठ बाबर, समाधान काशीद, राजू गावडे, श्रीपती वगरे, महेश बंडगर यांच्यासह शेकापची अनेक ज्येष्ठ नेते मंडळी यावेळी उपस्थित होते.
बाबा कारंडे पुढे म्हणाले की, सध्या तालुक्याची अवस्था पाहता तालुका मागे फेकला जात आहे. येत्या निवडणुकीत जनताच योग्य भूमिका घेईल. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कार्यकर्त्यांनी कामाला लागावे.
यावेळी डॉ. बाबासाहेब देशमुख म्हणाले की, भाई गणपतराव देशमुख यांच्या विचारानुसार आम्ही काम करत आहोत. देशमुख कुटुंबीयांमध्ये एकी आहे. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. जनता आणि पक्ष ठरवेल तो विधानसभेचा उमेदवार असेल. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शेतकरी कामगार पक्ष स्वतंत्रपणे लढवेल. कार्यकर्त्यांनी नेटाने कामाला लागावे. जमलेली गर्दी हे माझं कर्तुत्व नसून बाबासाहेबांची पुण्याई आहे. आबासाहेबांचा विचाराचा व कार्याचा वसा पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी तुमची व माझी आहे.
काम करत असताना माझी काही चूक झाली किंवा युवकांच्या हातून काही चूक झाली तर ज्येष्ठांना आमचा कान पकडण्याचा अधिकार आहे. युवकांना मी विनंती करणार आहे. कोणत्याही प्रकारचा निर्णय घेत असताना जुन्या वडीलधारी ज्येष्ठांचे मार्गदर्शन व सल्ला घेत चला. पुरोगामी युवक संघटनेचे जे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत. येणाऱ्या काळामध्ये शासनाच्या विविध योजना गोरगरीब कष्टकरी जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम करावं. त्यासाठी मी आपणास मदत करेन. भविष्यातील सर्व निवडणुकांमध्ये शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा अभिमानाने फडकेल याची जबाबदारी तुमची व माजी आहे. आणि ते आपण कराल अशी अपेक्षा आहे.
यावेळी शेकापचे ज्येष्ठ नेते माजी आम. भाई संपतराव पवार – पाटील यांनी खणखणीत भाषणे केले.
जवळ्यात जोरदार शक्तीप्रदर्शन
शेकाप कार्यकर्त्यांकडून जवळा गावात जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात ही जंगी सभा आयोजित करून शेकापने लक्ष वेधले आहे.
डॉ. बाबासाहेब देशमुख यांचे जंगी स्वागत
जवळा गावात डॉ. बाबासाहेब देशमुख यांचे वाजत गाजत जंगी स्वागत करण्यात आले. जवळा गावात त्यांचे आगमन होताच हलग्या, संबळच्या कडकडाटात वाजत गाजत स्वागत करण्यात आले. फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.
विविध गावांत शाखांचे उद्घाटन
बुरुंगेवाडी, भोपसेवाडी, आगलावेवाडी, तरंगेवाडी व जवळा येथे पुरोगामी युवक संघटना नामफलकाचे उद्घाटन करण्यात आले. बुरुंगेवाडी येथे सकाळी ११.३० वाजता, आगलावेवाडी येथे दुपारी १२.३० वाजता, भोपसेवाडी येथे दुपारी दीड वाजता, तरंगेवाडी येथे दुपारी अडीच वाजता, जवळा येथे दुपारी ३:३० वाजता पुरोगामी युवक संघटना नामफलकाचे उद्घाटन करण्यात आले.
जवळा येथे जंगी सभा
जवळा गावात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेची जोरदार तयारी करण्यात आली होती. आजूबाजूच्या गावातील हजारो कार्यकर्ते जवळा गावात या सभेसाठी उपस्थित होते.
राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात एन्ट्री
जवळा गाव तसेच आजूबाजूचा परिसर हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. माजी आमदार दीपकआबा साळुंखे – पाटील यांचे या भागात मोठे वर्चस्व आहे. यापूर्वी शेतकरी कामगार पक्षाच्या फारशा सभा किंवा कार्यक्रम या भागात दिसले नाहीत. भाई गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर शेतकरी कामगार पक्षाकडून जवळा आणि परिसरातील गावांमध्ये लोकसंपर्क वाढविण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.