बापू-आबांचा जलवा, लाल बावटाही तोऱ्यात
वाचा सणसणीत राजकीय विश्लेषण
सांगोला / नाना हालंगडे
राजकीयदृष्ट्या नेहमी चर्चेत असलेल्या सांगोला तालुक्यातील सहाही ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आमचीच सरशी झाली असा सूर राजकीय पक्षांकडून आळविण्यात येवू लागला आहे. तालुक्यातील एकूण सहा ग्रामपंचायतींपैकी शेकापने दोन ग्रामपंचायतींवर झेंडा रोवला आहे. तर दुसरीकडे माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील आणि विद्यमान आमदार शहाजीबापू पाटील यांच्या गटाने ३ ग्रामपंचायती जिंकल्याचे सांगण्यात येत आहे. अशा एकूण पाच ग्रामपंचायतीचे चित्र स्पष्ट आहे. मात्र, बलवडी या गावातील पॅनलचा मात्र सस्पेन्स आहे. या गावातील विजयी पॅनलचे प्रमुख हे काही वर्षांपूर्वी शहाजीबापूंच्या गटात होते, नंतर त्यांनी शेकापक्ष जॉईन केला. सध्या ते कोणाच्या बाजूने आहेत याचे चित्र स्पष्ट नाही.
सांगोला तालुक्यात नुकत्याच 6 गावांच्या निवडणुका संपन्न झाल्या. यामध्ये शेकापने तब्बल 62 जागांपैकी 36 जागा जिंकत आपले वर्चस्व अबाधित ठेवले आहे. यात दोन गावचे सरपंच पद तर दोन गावाचे उपसरपंचपदी आमचाच माणूस विराजमान होणार असल्याचा दावा पुरोगामी युवक संघटनेचे राज्य अध्यक्ष तथा शेतकरी कामगार पक्षाचे नेते डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी केला आहे.
सांगोला तालुक्यातील अनकढाळ ग्रामपंचायतीच्या 9 जागा, चिंचोली ग्रामपंचायतीच्या 11 जागांवर शेकापने घवघवीत यश मिळवत आपला गट अबाधित राखला आहे.
येथे दोन्हीही पदावर शेकापचे सरपंच, उपसरपंच विराजमान होणार आहेत. येथील 19 जागा आलेल्या आहेत. चिणके ग्रामपंचायत निवडणुकीत 5 जागा आणि उपसरपंच पद हे शेकापकडे राहणार आहे. पाचेगाव ग्रामपंचायतीच्या 3 जागा शेकापने जिंकल्या असून, येथेही उपसरपंच आमचाच होणार आहे, असे डॉ. देशमुख यांचे मत आहे.
शिवणे ग्रामपंचायतीत 4 जागेवर शेकाप तर बलवडीतही 4 जागा शेकापने जिंकल्या आहेत. येथे पक्षात दुफळी निर्माण झाल्याने थोडी अडचण आली. पण विजय शिंदे हे आमचेच आहेत. यांची जागा धरली तर येथेही सरपंच आमचाच होणार आहे, असा दावा डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी केला आहे.
सांगोला तालुक्यात भाई गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर शेकापच्या स्थानिक नेत्यांकडून सर्वच सत्तास्थाने टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. नुकत्याच झालेल्या सोसायटीच्या निवडणुकीतही 55 सोसायट्या ह्या आमच्याच आहेत. तर अन्य बऱ्याच ग्रामपंचायती शेकापच्या ताब्यात आहेत. येथून पुढच्या काळात होणार सर्व निवडणुकीत शेकाप अव्वल राहणार आहे. तालुक्यातील सर्वच गावातील जनतेवर पुन्हा एकदा आम्हाला, पक्षाला चांगली संधी दिली असून, येथून पुढच्या काळातही शेकाप आपली सेवा करण्यासाठी कठीबद्द राहणार आहे, अशी प्रतिक्रिया डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी निवडणूक निकालानंतर पत्रकारांशी बोलताना दिली.
सांगोला तालुक्यात शेकाप अव्वलस्थानी आहेत. 36 जागा जिंकून पक्षाने आपले वर्चस्व सिध्द केले आहे. दोन गावचे सरपंच पद तर दोन गावचे उपसरपंच पद शेकाप भूषविणार आहे. येथून पुढच्या काळात होणाऱ्या सर्वच निवडणुकीत शेकाप अव्वलच राहणार आहे. – डॉ. बाबासाहेब देशमुख
खरं तर ग्रामपंचायत निवडणुकीत पक्ष, पार्टी पाहिली जात नसते. सगळा स्थानिक पातळीवरील खेळ असतो. पण निवडणुकीनंतर हे सारे नाट्य घडित असते. असाच काहीसा प्रकार सांगोला तालुक्यातील पार पडलेल्या निवडणुकीत पहावयास मिळालेला आहे.
चिनके, शिवणे आणि पाचेगाव या ग्रामपंचायतीवर बापू-आबांचे वर्चस्व आहे, असे स्पष्ट दिसत आहे. तरीपण यातील दोन ठिकाणी उपसरपंच हे शेकापचे होणार आहे.62 जागांपैकी 36 जागा आमच्याच असल्याचे शेकापकडून सांगितले जात आहे.
बापू-आबांचा जलवा
सांगोला तालुक्यात सहा ग्रामपंचायतींच्या निवडणुकित राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष, माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील आणि विद्यमान आमदार शहाजीबापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उमेदवार देण्यात आले. बाळासाहेबांची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षाने जास्तीत जास्त ग्रामपंचायत सदस्य निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले. त्यात त्यांना घवघवीत यश मिळाले. तीन ग्रामपंचायतींवर या दोन्ही नेत्यांच्या पॅनलला स्पष्ट यश मिळाले. मात्र, सस्पेन्स असलेल्या बलवडी या गावातील ग्रामपंचायतीत आम्हालाच यश मिळाल्याचा दावा केला जात आहे. या गावावर शेकापनेही दावा केला आहे. त्यामुळे बलवडी नेमकी कोणाची? हा सवाल सध्यातरी अनुत्तरित आहे.
या निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष, माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील आणि विद्यमान आमदार शहाजीबापू पाटील यांची एकत्रित ताकद दिसून आली. ही ताकद आगामी काळातील सर्व निवडणुकामध्ये कायम राहणार का याचीही चर्चा सुरू आहे. ही ताकद अशीच राहिल्यास आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत याचा शेकापला जोरदार फटका बसू शकतो.
डॉ. बाबासाहेब देशमुखांनी गड लढविला
भाई गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर यंदा प्रथमच शेतकरी कामगार पक्ष हा ग्रामपंचायत निवडणुकीला सामोरे गेला. भाई गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या नेतृत्त्वाखाली या निवडणुका लढविण्यात आल्या. डॉ. देशमुख यांनी आपले नेतृत्व गुण पणाला लावून या निवडणुकीत एकूण ६२ पैकी निम्म्याहून अधिक ठिकाणी शेकापचे सदस्य निवडून आणले. राजकीय समज, आजोबांचा वैचारिक वारसा सांभाळत डॉ. देशमुख यांनी शेकापचा गड अबाधित राखला.
हेही वाचा