बनावट शपथपत्राने कोट्यवधीची जमीन हडपली
१३ जणांवर गुन्हा, तलाठी, सर्कलही अडकले

सांगोला/नाना हालंगडे
रत्नागिरी- नागपूर महामार्गलगत काळूबाळूवाडी गावच्या हद्दीत असलेली कोट्यवधी रुपये किंमतीची शेतजमीन बनावट शपथपत्राच्या माध्यमातून स्वतःच्या नावावर केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मुख्य संशयित आरोपी राहुल कुमार सुगाणावर (रा. ब्राह्मणपुरी, मिरज) याच्यासह त्याची आई, दोन बहिणी विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.

या प्रकारामध्ये संबंधित गावचे तलाठी, सर्कल आणि याकामी राहुल सुगाणावर यास मदत करणाऱ्या नऊ नातेवाईकांचा संशयित म्हणून समावेश आहे. याबाबत मिरजेतील नामवंत वैद्यकीय तज्ञ डॉ. सचिनकुमार सुगाणावर यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.
सदर प्रकरणात चोरीचाही गुन्हा दाखल झाला असून, या शेतजमिनीवर असलेले सुमारे ६० लाख रुपये किंमतीचे लोखंडी अंगल ,पत्रे आणि इतर साहित्य चोरीस गेल्याचे डॉ.सुगाणावर यांनी म्हटले आहे. बनावट शपथपत्राच्या आधारावर फसवणूक करून सदरची शेत जमीन नावावर करुन घेतली. त्यानंतर ती विक्रीस काढल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे.
यामध्ये संशयित म्हणून काळूबाळूवाडी (तालुका सांगोला) येथील तलाठी साईनाथ रामोड, सर्कल गजानन व्हनकडे आणि मुख्य संशयीत राहुल सुगाणावर, त्यांची आई शोभा कुमार सुगाणावर, बहिण अश्वीनी पंकज देवमोरे, दुसरी बहीण स्नेहा सुशांत निटवे,याशिवाय त्याचे नातेवाईक शीतल महावीर सुगाणावर, अनिकेत अनिल सुगाणावर,संजय राजगोंडा सुगाणावर , महावीर परिसा सुगाणावर,अनिल पारीसा सुगाणावर ,अशोक पारिसा सुगाणावर आणि राजगोंडा पारीसा सुगाणावर यांचा समावेश आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, काळूबाळूवाडी (तालुका सांगोला) हद्दीत रत्नागिरी- नागपूर हायवेलगत सुकुमार परिसा सुगाणावर यांच्या नावे शेतजमीन होती.
त्यांच्या मृत्यूप्रशात संशयित आरोपी राहुल सुगाणावर याने सदरची शेत जमीन आपले वडील कुमार पारिसा सुगाणावर यांची असल्याचे खोटे शपथपत्र सादर करून, स्वतः बरोबर आपले आई आणि दोन बहिणीच्या नावावर करून घेतली. यासाठी त्यांना काळूबाळूवाडी गांवचे तलाठी आणि सर्कल यांनी मदत केली असल्याचा संशय फिर्यादीत व्यक्त करण्यात आला आहे.
सदर जमीन नावावर झाल्यानंतर त्यावरील लोखंडी अँगल, पत्रे, जाळीचे कंपाऊंड असा 60 लाख रुपयेचा मुद्देमाल विक्री केला. त्यानंतर सदरची जमीन विक्रीसाठी काढल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत कोठेही तक्रार करु नये म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली जात असल्याचे फिर्यादित म्हटले आहे.
आज रविवारी याबाबत सांगोला पोलिसात फसवणुकीसह दोन बनावट शपथपत्र केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी 13 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याने सांगोला तालुक्यात खळबळ उडाली आहे.
संशयीताकडून सारवासारव
संशयीत आरोपींनी संगणमत करुन आर्थिक लोभापोटी हा प्रकार केला. त्यासाठी दोन बोगस शपथपत्रे करीत शासनाची फसवणूकही केली आहे. गुन्हा उघडकीस येताच सारवासारव सुरु केली आहे. तलाठी यांनी तर प्रकरण अंगलट येत असल्याचे दिसून येताच नावातील साधर्म्यामुळे असे घडल्याचे सांगून नामानिराळे राहण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे.