बदनाम लावणीला सुरेखा पुणेकरांनी प्रतिष्ठा मिळवून दिली
लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांचा वाढदिवस विशेष लेख
थिंक टँक न्यूज नेटवर्क : डॉ. नाना हालंगडे
“तमाशाने समाज बिघडत नसतो आणि कीर्तनाने घडत नसतो” असे म्हटले जाते. हे खरं असलं तरी तमाशा बघणं हे वाह्यातपणाचं लक्षण मानलं जात असल्याच्या वातावरणात याच तमाशातील लावणीला प्रतिष्ठा मिळवून देत लावणी घराघरात पोहोचवण्याचं काम लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी केलं. आज त्यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त हा विशेष लेख.
कलेची हरवलेली प्रतिष्ठा पुन्हा कमावली आणि पांढरपेशा रसिकांसमोर घायाळ करणारी लावणी मोठ्या दिमाखात पेश केली ती सुरेखा पुणेकर यांच्या पिढीतल्या कलावतींनी. ‘नुसत्या भुवया उंचावून अन् बोटं हवेत फिरवून अंगभर नऊवारीतही लावणीतली मादकता पेश करता येते. त्यासाठी उघडी पाठ दाखविण्याची गरजही नाही’ हे पुणेकर यांनी सिद्ध केलं. चांगल्या घरची मंडळी कुटुंबासहित ‘लावणी शो’ पहायला नाट्यगृहात धडकू लागली आणि सारा माहोलच बदलला.
सुरेखा पुणेकर यांची शिक्षण घेऊन चांगले करिअर करण्याची मनात इच्छा होती. मात्र, वडील कोंडिबा टाकळीकर यांचा तमाशाचा फड होता. वडिलांकडील कुणीही नातेवाईक तमाशात काम करत नव्हते. मात्र आई, आजी, मावशी, मावसबहीण आदी नातेवाइकांना तमाशात थिरकताना त्यांनी पाहिलेले होते. शाळेत जाण्याची इच्छा होती, मात्र वडिलांनी तमाशाच्या फडातच खरी शाळा असल्याचे सांगितले होते. त्यामुळे १९८६ पासून आपण लावणी सादर करण्यास सुरुवात केली. ज्या गावी मुक्काम असायचा त्या गावात हॉटेल नसल्यामुळे ग्रामस्थांकडून ‘माधुकरी’ मागून जेवण आणले जात होते. घरातील गृहिणींचा मात्र जेवण देण्यास सक्त विरोध असायचा.
१९९८ पर्यंत ‘नटरंगी नार’ बदनामच होती. त्यामुळे महिलांच्या मनातील लावणीविषयी असलेली अश्लीलता काढण्याचा सुरेखा पुणेकर यांनी निश्चय केला. त्याचाच एक भाग म्हणून जून १९९८ मध्ये तमाशाच्या फडातून लावणी बाहेर काढून पहिल्यांदा मुंबईच्या थिएटरमध्ये त्यांनी आणली.
यशवंतराव चव्हाण नाट्यगृहातील सादरीकरणानंतर हळूहळू पुण्याच्या ‘बालगंधर्व नाट्यगृहात’ ढोलकीची थाप अन् लावणीचे स्वर गुंजले. त्यानंतर महिलांसाठी पहिल्यांदा ‘नटरंगी नार’ अभिजनवर्गाच्या पुण्यातील ‘बालगंधर्व’ मध्येच सादर केली. त्या वेळी १५ हजार रुपयांचे बुकिंग झाले होते.
सुरेखा पुणेकर यांनी नटरंगी नार या कार्यक्रमाचे आजपर्यंत साडेसात हजार प्रयोग केले आहेत. त्यापैकी शाळांच्या आर्थिक मदतीसाठी १५०० प्रयोग केले आहेत. मंदिराच्या जीर्णोधारासाठी त्यांनी हजार प्रयोग केले आहेत. ग्रामीण भागात आरोग्याच्या सुविधा मिळाव्या म्हणून जवळपास हजार प्रयोग केले आहेत. त्यातून अंध-अपंगांना मदत तर झालीच, शिवाय रुग्णवाहिकाही रस्त्यावर धावत आहेत. फक्त महिलांसाठी म्हणून त्यांनी ६०० प्रयोग केले आहेत.
सुरेखा पुणेकर यांनी अमेरिकेच्या मॅडिसन चौकातही लावणी सादर केली आहे.
सुरेखा पुणेकर यांची पिकल्या पानाचा देठ कसा हिरवा, या रावजी बसा भावजी, कारभारी दमान ही गाणी खूप गाजली आहेत.
“नारायणगाव ते शिवाजी मंदिर ते अमेरिका हा माझ्या कलेचा प्रवास मोठा खडतर होता, पण तो सुकर झाला केवळ प्रेक्षकांमुळे व कलेवरच्या प्रेमामुळे” असे सुरेखा पुणेकर या एका मुलाखतीत म्हणतात.