प्रेम म्हणजे प्रेम असते

कवी मंगेश पाडगावकर स्मृतिदिन लेख

Spread the love

थिंक टँक न्यूज नेटवर्क/ नाना हालंगडे
कवी मंगेश पाडगावकर यांचा जन्म १० मार्च १९२९ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथे झाला. शाळेत असल्यापासूनच मराठीवर त्यांचं प्रेम जडलं आणि वयाच्या १४ व्या वर्षापासूनच ते कविता करू लागले. कविवर्य वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज आणि बा. भ. बोरकर यांचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता. परंतु, पाडगावकर एका साच्यात कधीच अडकले नाहीत.

त्यांनी स्वतःची शैली निर्माण करून मराठी साहित्यात आणि रसिकांच्या मनात वेगळं स्थान मिळवलं. स्वतः प्रेमळ व्यक्ती, प्रेमळ प्राध्यापक असल्यानं प्रेम कवितेवर त्यांचं विशेष प्रेम होतं. पण, भावगीतं, बालकविता, निसर्गकविता, चिंतनशील कविताही त्यांनी तितक्याच प्रभावीपणे केल्या होत्या. त्या सादर करण्याची त्यांची पद्धत तर अफलातून होती.

पाडगावकर, विंदा करंदीकर आणि वसंत बापट या त्रयीनं ठिकठिकाणी काव्यवाचनाचे कार्यक्रम करून राज्याच्या कानाकोपऱ्यातील वाचकांना कवितेची गोडी लावली. सहज सोप्या शब्दांतून व्यक्त होणारे बोल आणि ओठांवर सहज रुळणाऱ्या कविता पाडगावकरांनी दिल्या.

मंगेश पाडगांवकरांची कविता-गीतं म्हणजे मोगऱ्याची टपोरी फुलं. नियतीने पाडगांवकरांच्या प्रतिभेला कधीही धोका दिला नाही. त्यांचा हात सतत लिहिता ठेवला. आपल्या कवितेतली, गीतांतली आशयघनता सातत्याने टिकवलेला हा श्रेष्ठ कवी. त्यातल्या अनेक कवितांची गाणी झाल्यानं साहित्यासोबतच संगीत क्षेत्रातील पाडगावकरांचं योगदानही मोठं आहे.

पाडगावकरांनी “या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे” असं म्हणत मराठी रसिकांना प्रेम करायला शिकवले. जगण्याचं बळ देणारे “अशी पाखरे येती, आणिक स्मृति ठेवुनी जाती” अशा सहजसोप्या शब्दांत जीवनाचं सार त्यांनी सांगीतले.

ते आपल्या कवीतांनी तरुणाईला प्रेमात पाडत असत. “प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं” असं म्हणणारे ‘पाडगावकर आजोबा’ कॉलेज मधल्या मुला-मुलींचे मित्रच होऊन जायचे.

भावकविता, भावगीते, बालगीते, संगीतीका, नाट्य काव्य, गझल, वात्रटिका, सामाजिक उपरोधपर कविता, बोलगाणी आणि विडंबन अशा विविध साहित्य प्रकारातून पाडगावकरांनी वाचकांना समृध्द केले.

पाडगांवकर यांनी “कधी बहर, कधी शिशिर, परंतु दोन्ही एक बहाणे” या त्यांच्या गीताच्या ध्वनिमुद्रणाची सांगीतलेली आठवण.

सुधीर फडक्यांनी केलेले शब्दांचे उच्चार ही एक थरारून टाकणारी गोष्ट होती. शब्द माझेच होते. त्यामुळे मला तरी त्या शब्दांचं नावीन्य नव्हतं. पण सुधीर फडक्यांच्या आवाजात ते ऐकताना माझेच शब्द आता मला नव्याने भेटत होते. ‘बहर धुंद वेलीवत यावा’ या ओळीतील ‘बहर’ आणि ‘धुंद’ या शब्दांतून व्यक्त होणारी तारुण्यातल्या फुलण्याची धुंदी.. ‘हळूच लाजरा पक्षी गावा’ या ओळीतील पक्ष्याच्या गाण्यातून व्यक्त होणारं कोणाचंतरी ते कोवळं लाजरेपण आणि “अचानक गळून पडावी विखरून सगळी पानं” या ओळीतील निराशा आणि आधीच्या दोन ओळींतील विरोधाचं नातं हे सारं सुधीर फडके इतक्या विलक्षण उत्कटतेनं प्रकट करत होते, की त्यांच्या गायनातून माझी कविता नव्याने जन्म घेत आहे असं मला वाटलं.

मंगेश पाडगावकरांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. ‘सलाम’ या काव्यसंग्रहासाठी त्यांना १९८० मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. महाराष्ट्रातील दर्दी रसिकांच्या मनात स्थान मिळवलेल्या पाडगावकरांना २००८ मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर, २०१३ मध्ये पद्मभूषण पुरस्कारानं त्यांचा गौरव करण्यात आला होता. २०१० मध्ये दुबईत झालेल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. महाराष्ट्र टाइम्सनंही पाडगावकरांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कारानं गौरवलं होतं.

मंगेश पाडगावकर यांचे ३० डिसेंबर २०१५ रोजी निधन झालं.

कवी मंगेश पाडगावकर यांना आदरांजली !

संदर्भ : इंटरनेट

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका