प्रिय किरण आणि आमिर, थोडं बोलावसं वाटतंय तुमच्याशी
विनायक सावळे यांचा खास लेख
प्रिय किरण आणि आमिर,
आज थोडं बोलावसं वाटतंय तुमच्याशी. बोलण्याचं निमित्त तुम्ही जाणताच. आधी तर तुमचं दोघांचं मनःपूर्वक अभिनंदन..
किती सहजपणे तुम्ही तुमचा निर्णय आम्हा सगळ्यांना कळवला. खरंतर आम्ही कोण ना ! पण तरीही तुम्हाला तुमचा एक खाजगी निर्णय आम्हाला सांगावा वाटला. हे खूप भारी आहे. काय म्हणू या याला आपण…? मला वाटतं याला आपण सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव म्हणूया का? हो असंच काहीतरी..
या तुमच्या निर्णयांमध्ये मला जे काही जाणवलं ते तुम्हाला सांगावं यासाठी हा लेख प्रपंच..
किती संयत आणि सहजपणे तुम्ही नात्यातून एकमेकांना मुक्त करण्याचा निर्णय घेतला. अर्थात या निर्णयापर्यंत यायला तुम्हा दोघांनाही खूप भावनिक ताणातून जावं लागलं असेल याची कल्पना आहे. सत्यमेव जयतेच्या शोमध्ये भावनिक प्रसंगी प्रत्यक्ष रडणारा आमिर आम्ही सगळ्यांनी पाहिला आहे. आताही ते घडलं असेल. दोघांनीही खूप चर्चा केली असेल. एकमेकांवर कदाचित चिडले पण असणार तुम्ही. अबोला झाला असेल. रुसवे फुगवे झाले असतील. पुन्हा बोलले असणार. शांतपणे चर्चा केली असेल.
तुम्ही पण माणसंच. राग, लोभ असतो सगळ्यांना. तसा तुम्हाला असणारच. पण जेव्हा तुम्ही हे जाहीर केलं तेव्हा त्या निवेदनाला जराही कटुतेचा गंध नव्हता. ही बाब मला खूप महत्त्वाची वाटते.
खरं सांगू का तुम्हा दोघांना..! जेव्हा मी हा निर्णय ऐकला ना तेव्हा मलाही नाही बरं वाटलं. किरणच्या डोळ्यांतच तिची हुशारी आणि वेगळेपण लख्खपणे दिसून येत आणि आमिर तर परफेक्शनिस्ट म्हणून प्रसिद्ध. सर्वार्थाने परिपूर्ण अशीच जोडी वाटायची. पाणी फाउंडेशनच्या निमित्ताने तुम्ही महाराष्ट्र पिंजून काढला, तेव्हा तर आम्ही तुमच्यावर वेड्यासारखे फिदा झालो. कलाक्षेत्रातील इतक्या उंचीची सामाजिक जाणीव असणारं, तसेच जगणारं जोडपं दुसरं शोधायलाही बऱ्यापैकी डोकं खाजवावं लागेल.
म्हणून तुम्ही आदर्श जोडपं, परिपूर्ण जोडपं असं काहीतरी मनात यायचं. पण त्याच तथाकथित आदर्शवादाच्या कल्पना डोक्यात घेऊन आम्ही जगत असतो. तेव्हा असा निर्णय ऐकला की धक्का बसतो.
पण ऐका ना ! आम्हालाही समजून घ्या. आम्ही याच मातीतल्या भारतीय परंपरेत वाढलेलो. इथे एका जन्माची सोडा तर सात जन्माच्या लग्नगाठी बांधण्याची पद्धत आहे. तेव्हा असा निर्णय हा धक्का देणारा आम्हाला वाटणारच. तेव्हा आमची परंपराधिष्टीत मर्यादा तुम्ही समजून घ्या.
पण आज मला तुमच्या या निर्णयाकडे जरा वेगळ्या पद्धतीने पहावसं वाटतंय. त्याबद्दल तुमच्यासह सगळ्यांशी बोलावं वाटतं.
जेव्हा आम्ही थोडा शांत डोक्याने, विवेकी पद्धतीने तुमच्या निर्णयाकडे पाहतो, तेव्हा मात्र तो निर्णय समाजाला दिशा देणारा वाटतो. सामाजिक विचारशक्तीला वळण देणारा वाटतो. त्याबद्दल मला जरा सांगावं वाटतंय.
पहिली गोष्ट म्हणजे प्रेम, विवाह, घटस्फोट, ब्रेकअप, पुन्हा प्रेम, पुन्हा लग्न वगैरे या सर्व गोष्टी आपल्या प्रत्येकाच्याच जीवनाचा भाग असतात. त्या सर्व आपल्या खाजगी गोष्टी असतात. त्यात तिसऱ्या कोणीही ढवळाढवळ करायची खरे तर तोंड घालायची गरज नसते, आणि नसावी पण.
मात्र, आपल्याकडे लग्न याला सामाजिक संस्कार म्हटले गेले. मग त्याची अशी चर्चा होते. कोणाची कमी तर कोणाची अधिक. तथापि, समाजातील जेव्हा प्रत्येक नागरिक या खाजगीपणाचा आदर करायला शिकेल तो सुदिन असेल असं मला म्हणायचं आहे.
दुसरी गोष्ट तुमच्या निर्णयाच्या निमित्ताने पुढे आली ती म्हणजे ‘निर्भयता’. पूर्ण प्रयत्न करूनही आपलं जर जमतंच नसेल तर समाजाची, नातेवाईकांची, आई-वडिलांची कुठलीही भीती, तमा न बाळगता सहजपणे नात्यातून मोकळं होता येतं. हे तुम्ही दाखवून दिलंत. आमिरचा हा दुसरा घटस्फोट. त्यांना यासाठी बऱ्यापैकी हिम्मत एकवटावी लागली असेल. ही निर्भयता जर सगळ्यांनी स्वीकारली तर केवळ समाज काय म्हणेल? आई-वडील काय म्हणतील? नातेवाईक काय म्हणतील? या दबावापोटी आजही असंख्य जोडपी मनाने कधीच तुटलेली नाती या दहशतीने टिकवून ठेवत आहेत. दोघांनाही नात्यात प्रेम मिळत नाहीये आणि मोकळही होता येत नाहीये. ही निर्भयता जर आम्ही स्वीकारली तर कितीतरी आयुष्य नव्याने फुलू शकतील. एकदाच मिळणार आयुष्य पुन्हा नव्याने अनुभवू शकतील, उभारू शकतील, मोकळा श्वास घेऊ शकतील, आपल्या जगण्याला आपल्या इच्छेप्रमाणे आकार देऊ शकतील. पण या निर्भयतेअभावी या सगळ्या शक्यता बंदिस्त करून टाकल्या आहेत, समाजाच्या या दहशतीने.
यात अजून लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे ‘ सहजता’. दोन्ही बाजूने जेव्हा ‘सम्यक विचार’ करण्याची ताकद असलेल्या व्यक्ती असतात तेव्हा अशा निर्णयात सहजता येते. हे इतकं सोपं नसतं. ब्रेकअपनंतर एकमेकांची जाहीर चिखलफेक करणारे सिनेसृष्टीतील अनेक जोडपी आम्ही बघितली आहेत. त्यांचा ट्विटर युद्ध लोकांना चघळायला, मनोरंजन करायला उपयुक्त असते एवढेच. पण तुम्ही मात्र त्याबाबत ही एक आदर्श घालून दिला. दोघांचे एक संयुक्त निवेदन जारी केलं. जेवढं सांगणं तुम्हाला आवश्यक वाटलं तेवढं नेमकेपणाने सांगितलं. नात्यातून मुक्त झालो तरी आम्ही उभारलेल्या कामात सदैव सोबत राहू, आमच्या मुलाचे पालकत्व आमची संयुक्त जबाबदारी असेल, आम्ही सोबतच राहणार आहोत, हे किती छान सांगितलं. तुम्ही जिथं वर्षानुवर्षे घटस्पोटासंबंधित कोर्टकचेऱ्या खेळणारी लाखो-कोट्यवधी जोडपी दिसत आहेत, तिथे तुमचं वागणं नक्कीच या परिस्थितीत कसं वागावं? याचा वस्तुपाठच आहे. तुमच्या निर्णयात एक जबाबदारीची लख्ख जाणीव दिसून येते जी तुम्हा दोघांना एका उंचीवर नेऊन ठेवते.
अजून एका गोष्टीचा उल्लेख करायला हवा. तुम्ही तुमच्या निवेदनात म्हटलंय हा निर्णय आमचा दोघांचा आहे आणि हा निर्णय घेऊन आम्ही दोघेही आनंदी आहोत. जेव्हा एकमेकांना नात्यात राहण्यात काही कारणांनी कठीण होतं, पूर्ण प्रयत्न करूनही त्यातून मार्ग निघेनासा होतो, तेव्हा दोघांनी वेगळ होण हे अर्थातच दोघांना आनंद देणारं असतं. पण हे घडण्यासाठी विचार आणि कृती दोन्ही पातळीवरची एक परिपक्वता असावी लागते. जी तुम्ही दोघांनी कमावली आहे. आणि या परिपक्वतेची प्रचंड उणीव समाजामध्ये आपण सारेच अनुभवत आहोत.
खरं तर या अंगाने या घटस्फोटाची चर्चा व्हायला हवी होती. पण किरण, आमिर सॉरी हा.. माफ करा आम्हाला. आम्ही वरच्या सर्व गोष्टी बाजूला टाकून चर्चा करतोय आमिर आणि सना शेख यांच्या नात्याची. खरं तर हे नातं असो की नसो तो पण तुमचा खाजगी प्रश्न आहे. पण तरीही तेथे नाक खुपसायला आम्ही असणारच..
तुमच्या निर्णयातील निर्भयता, सहजता, समयकता, जबाबदारीची भावना हा विवेक पूर्ण व्यवहार कधी कळेल आम्हाला? अजून किती पिढ्या हे समजून घेण्यात खपतील आमच्या…. माहित नाही.. जाऊदे.. तो आमचा दोष आहे. कदाचित पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून आमच्या शेत शिवारात पाणी आणलं तुम्ही… उद्या विवेक फाउंडेशन लागेल आम्हाला… आमच्या मनाच्या, बुद्धीच्या गाभाऱ्यात विवेकाचा ओलावा आणण्यासाठी.
तुम्हा दोघांना माझ्याकडून खूप खूप सदिच्छा आणि प्रेम.
आणि आपल्या जगण्या वागण्यातून माणुसकी समृद्ध केल्याबद्दल मनापासून अभिनंदन.
आपला एक चाहता,
विनायक सावळे
vinayak.savale123@gmail.com
9403259226.