प्रस्थापित व्यवस्थेला टक्कर देणारा “जय भीम”
मुकुल निकाळजे यांचं खणखणीत विश्लेषण
जयललिता मुख्यमंत्री बनल्यांनतर तामिळनाडूमधील उच्चजातीय अत्याचाऱ्यांचा उन्माद वाढायचा. पोलिस प्रशासनातील उच्चजातीय अधिकारी कर्मचारी देखील दलित, आदिवासी यांच्या विरुद्ध अत्याचार करायचे. तमिळनाडूमधील पोलिसांनी केलेल्या हत्याकांडांच्या अनेक घटना आहेत, ज्यावर सध्या तेथील चित्रपट सृष्टीत एक एक करून चित्रपट तयार होणं सुरू आहे.
1993 साली पोलिस कोठडीत पोलिसांकडून झालेल्या इरोला या आदिवासी जमातीच्या व्यक्तीची हत्या आणि महिलेच्या बलात्काराच्या घटनेवर आधारित आहे “जयभीम” हा सिनेमा. सत्य घटनेवर आधारित असूनही हा सिनेमा प्रेक्षकांना गुंतवून ठेवणारा, गूढ वाढवणारा सस्पेन्स थ्रिलर आहे. आदिवासी पाड्यातील व ग्रामीण जीवनाचं चित्रण अतिशय उत्तम प्रकारे करण्यात आलेलं आहे. त्यात कुठेही कसल्याही प्रकारची अतिशयोक्ती नाही, पूर्णपणे वास्तवदर्शी आहे.
आदिवासी पाड्यातील जनजीवन, आदिवासी कुटूंबातील प्रेम, जिव्हाळा, त्यांच्या मनात खोलवर रुजलेले मानवी मूल्य आणि संस्कार, त्यांच्यातील भूतदया. तसेच दुसरीकडे गावातील सवर्णांची ते मनोभावे सेवा करत असून, त्यांना संकटांपासून, सापांपासून, उंदिरांपासून वाचवत असूनही त्यांचा या आदिवास्यांबद्दलचा तुच्छता आणि द्वेषपूर्ण व्यवहार.
असे असूनही त्या द्वेषाचा जराही विचार न करता त्यांची सेवा करत राहणे हा त्या आदिवास्यांमधील गुणधर्म. परंतू सरपंचाच्या घरात साप पकडायला, त्यांचा जीव वाचवायला गेलेल्याला त्याने ज्या पैशांकडे आणि दागिन्यांकडे पाहिलेलंही नाही त्याला चोरीच्या खोट्या आरोपात अडकवून त्याच्या परिवारावर आणि नातलगांवर पोलिसांकडून, तसेच गावकऱ्यांकडून अत्याचार करण्यात येतात. पोलिस कोठडीत त्या आदिवासी व्यक्तीवर त्याने न केलेला गुन्हा कबूल करण्यासाठी अत्यंत क्रूरपणे आणि अमानवीपणे मारहाण होते. नंतर हा आरोप ठेवण्यात आलेला व्यक्ती व त्याच्यासोबत असलेले त्याचे नातलग अचानक गायब होतात. पोलिसांनी खोटे साक्षी पुरावे तयार करून ते कोठडीतून पळून गेल्याचा बनाव रचलेला असतो.
त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी या सिनेमातील आणि खऱ्या आयुष्यातील दलित, आदिवासी, कामगार यांच्या जीवनातील नायक चंद्रू (या सिनेमात त्यांची भूमिका सुपरस्टार सूर्या साकारत आहे) सरसावतात. चंद्रू चेन्नई उच्च न्यायालयात हेबियस कॉर्पस याचिका दाखल करतात. त्यात प्रस्थापित व्यवस्था आणि पोलिस यंत्रणेने रचलेल्या प्रत्येक डावपेचाला न्यायालयात आपल्या बुद्धीचातूर्य व स्वतः मेहनत घेऊन सत्य शोधून काढत हणून पाडतात. शेवटी सत्याचा विजय होतो. न्याय मिळतो. पण त्यासाठी वकील चंद्रू, कोर्टाने नियुक्त केलेले तपास अधिकारी पेरुमल स्वामी (प्रकाश राज) आणि पीडिताची पत्नी आणि इतर नातलग यांनी प्रचंड संघर्ष करावा लागतो, सातत्य ठेवावे लागते.
या सिनेमात प्रतिकांचा अत्यंत प्रभावी वापर केला आहे, तसेच त्याद्वारे आपला परखड संदेशही देण्यात आला आहे. एका शाळेतील विद्यार्थ्यांच्या महापुरुषांच्या वेशभूषा साकारण्याच्या स्पर्धेत ‘बाकी राष्ट्रीय नेते आहेत, आंबेडकर का नाही?’ असा आयोजकांना सवाल करून प्रस्थापित व्यवस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आजवर अनुल्लेखाने टाळण्याच्या मानसिकतेला प्रश्न केला आहे. तसेच वकील चंद्रू यांच्या घरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पेरियार आणि मार्क्स यांचे फोटो, बुद्धांची अन्न त्याग केलेल्या अवस्थेतील मूर्ती इत्यादी दाखवून चंद्रू यांचे आदर्श आणि त्यांची वैचारिक पार्श्वभूमी दर्शवली आहे.
– मुकुल निकाळजे