प्रकाश आंबेडकरांसह अकराशे ते बाराशे आंदोलकांवर गुन्हा
पंढरपुरातील आंदोलनानंतर पोलिसांची कारवाई
सोलापूर (विशेष प्रतिनिधी) पंढरपूर येथे सोमवारी विठ्ठल मंदिर प्रवेश आंदोलनाप्रकरणी बेकायदा जमाव जमवून सोशल डिस्टंन्सिंगचे पालन न केल्याप्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्यासह सुमारे अकराशे ते बाराशे लोकांवर पंढरपुरात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, वंचित बहुजन आघाडी व विश्व वारकरी सेनेच्या वतीने सोमवारी पंढरपुरात विठ्ठल मंदिर प्रवेश आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात शेकडो लोक सहभागी होते. पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. कोरोना महामारीच्या अनुषंगाने लाॅकडाऊन व इतर उपाययोजनांचे आदेश असताना जमाव जमवला, मास्क घातला नाही, सोशल डिस्टंन्सिंगचे पालन केले नाही, घोषणाबाजी केली असे गृहित धरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
अॅड. प्रकाश आंबेडकर, हभप अरुण बुरघाटे महाराज, धनंजय वंजारी, आनंद चंदनशिवे, अशोक सोनावे, रेखाताई ठाकूर, नाम महाराज आदी सुमारे अकराशे ते बाराशे लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस हेडकॉन्स्टेबल परशुराम माने यांनी फिर्याद दिली असून सपोनि गायकवाड तपास करीत आहेत.