पुरोगामी युवक संघटना पुरोगामी विचारांची पोकळी भरून काढेल : डॉ. बाबासाहेब देशमुख
राज्य अध्यक्ष निवडीनिमित्त घेतलेली प्रकट मुलाखत
थिंक टँक न्यूज नेटवर्क : डॉ. नाना हालंगडे
शेतकरी कामगार पक्ष हा गोरगरीब, कष्टकरी जनतेचा पक्ष आहे. या पक्षाचे युवक संघटन असलेल्या पुरोगामी युवक संघटनेच्या राज्य अध्यक्ष पदाची जबाबदारी माझ्यावर देण्यात आल्याने काम करण्याची मोठी संधी मिळाली आहे. या संधीचे मी सोने करेनच. फुले, शाहू, आंबेडकरांच्या या महाराष्ट्रात युत्या, आघाड्यांच्या राजकारणात पुरोगामी विचार क्षीण होत आहे. पुरोगामी विचारांची ही पोकळी पुरोगामी युवक संघटना भरून काढेल. जनतेच्या बाजूने जनतेच्या प्रश्नांवर प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलनही करू, असा ठाम विश्वास डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी व्यक्त केला.
पुरोगामी युवक संघटनेच्या राज्य अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आपली पहिली प्रतिक्रिया काय?
डॉ. बाबासाहेब देशमुख : खरं तर भाई स्व. गणपतराव देशमुख तथा आबासाहेब यांच्या विचारांवर काम करीत असताना हे विचार व्यापक पातळीवर नेण्याच्या हेतूने शेकापने राज्य अध्यक्षपदी माझी निवड केली आहे असे मी मानतो. ही माझ्यासाठी मोठी आनंदाची बाब आहे. या पदाची जबाबदारी काय आहे याचीही मला जाणीव आहे. हे अध्यक्ष पद माझ्या एकट्याचे नाही. संघटनेतील प्रत्येक सदस्य, पदाधिकारी अध्यक्ष समजून काम करेल.
पक्ष बांधणीबाबत काय नियोजन आहे?
डॉ. बाबासाहेब देशमुख : पुरोगामी युवक संघटना अनेक वर्षांपासून राज्यात काम करीत आहे. आबासाहेबांनी सांगोला तालुक्यात या संघटनेची मोठ्या प्रमाणात रुजवात केली आहे. या संघटनेला तालुक्यात मोठा इतिहास आहे. शेकापला सत्तास्थानी बसवण्यात या संघटनेचे मोठे योगदान आहे. माझ्यावर राज्याच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. सांगोला तालुक्यासह राज्यभर या संघटनेच्या गाव तेथे शाखा असतील. युवक व युवतींच्या स्वतंत्र विंग असतील. जेणेकरून जास्तीत जास्त युवक व युवतींना यामध्ये काम करण्याची संधी मिळेल. युवकांचे हे संघटन पक्षाच्या सर्व बुजुर्ग पदाधिकारी, नेतेमंडळींच्या मार्गदर्शनानुसार चालेल.
सध्या सांगोला तालुक्यासह राज्यात महावितरणकडून विजबिल वसुलीपोटी कनेक्शन तोडण्याची प्रक्रिया सुरू आहे. यावर आपली काय भूमिका असेल?
डॉ. बाबासाहेब देशमुख : तालुका पातळीवरील महावितरण अधिकारी, कर्मचारी हे राज्य पातळीवरील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कारवाई करत असतात. वातानुकूलित केबिनमध्ये बसून असे जुलमी आदेश देणाऱ्या महावितरण अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या स्थितीची, वस्तुस्थितीची जाणीव नसल्याचे दिसते. त्यांच्या या जुलमी वागण्याचा त्रास लाखो लोकांना होताना दिसतो. मुळात थकबाकीवरून वीज तोडली जात असताना या थकबाकीची करणे काय आहेत याचाही अभ्यास व्हावा. जेवढे कनेक्शनधारक प्रामाणिकपणे बिल भारत असतात तेवढीच छुप्या मार्गाने वीजचोरी करणारेही बडी धेंड राजरोसपणे हे कृत्य करतात. महावितरण त्यांच्या वाटेला जात नाही. त्यांना सहिसलामत सोडून अल्प उत्पन्न असलेल्या गरीब शेतकऱ्याची वीज तोडली जात आहे.
हा अन्याय आहे. महावितरणला कर्जात ढकलून त्याचेही खासगीकरण करण्याचा हा डाव असल्याचा संशय येतो. जाणूनबुजून शेतकरी अथवा वंचित घटकातील लोकांची वीज तोडली जात बसेल तर हा अन्याय सहन केला जाणार नाही. आम्ही या संघटनेच्या माध्यमातून प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलनही करू. वीजचोरी रोखण्यासाठी महावितरणने ठोस उपाययोजना करावी.
मोठमोठ्या उद्योग धंद्याचे लाखो रुपयांचे वीजबिल थकीत असते. त्यांना पूर्वसूचना ना देता त्यांच्या उद्योगाची वीज तोडण्याचे धाडस सरकार किंवा महावितरण प्रशासन करत नाही. मात्र दुसरीकडे जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याचे वीज कनेक्शन बेमुर्वतपणे तोडले जाते. हा अन्याय आहे. ७० टक्के संख्येने असलेला शेतकरी ग्रामीण भागात राहतो. त्यांची वीज तोडल्यानंतर तो काम कसे करणार? शेती व्यवसायावर ग्रामीण अर्थकारण अवलंबून असते. वीज नसेल तर हा गावगाडा कसा चालणार. सरकारने याचा संवेदनशीलपणे विचार करायला हवा.
या संघटनेचा प्रत्यक्ष सत्ता संपादनासाठी कसा उपयोग होईल?
डॉ. बाबासाहेब देशमुख : शेकापच्या राज्य पातळीवरील अलिबाग येथे झालेल्या मेळाव्यात शेकापचे सरचिटणीस भाई जयंत पाटील यांनी अगदी स्पष्टपणे आगामी काळात तरुणांना पक्षात मोठी संधी देणार असल्याचे घोषीत केले आहे. पुरोगामी युवक संघटना ही युवक आणि युवतींची संघटना आहे. ही संघटना आगामी काळात शेकापला सत्तास्थानी बसवण्यात मोठे बळ देईल. सांगोला तालुक्यातील पक्ष बांधणीवर माझे अधिकचे लक्ष असेलच. शिवाय महाराष्ट्रातही पुरोगामी युवक संघटनेच्या मजबूत बांधणीसाठी मी प्रयत्न करणार आहे.
बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याबाबत कोणता कृती कार्यक्रम असेल?
डॉ. बाबासाहेब देशमुख : खरं तर शिक्षण घेतलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यास नोकरी मिळेल अशी परिस्थिती नाही. एकूण विद्यार्थ्यापैकी २० टक्के विद्यार्थ्यांना नोकरी मिळते. बाकीचे बेरोजगार होतात अशी स्थिती आहे. नोकरी मिळत नाही म्हणून बेरोजगार राहण्यापेक्षा मार्केट मधील संधी शोधून आपण उद्यमशील बनले पाहिजे. यासाठी आम्ही शेती, उद्योग आदी विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींना सोबत घेऊन जास्तीत जास्त युवक हे उद्योग धंद्याकडे वळावेत यासाठी मार्गदर्शन शिबिरे आयोजित करणार आहोत. जेणेकरून आपल्याच भागात युवकांच्या हाताला काम मिळेल. अनेकजण उद्योजक बनतील. त्यासाठी प्रशिक्षण, कर्जे, मार्गदर्शन आदी बाबत मार्गदर्शन करू.
सांगोला तालुक्यात निराधार योजनेचा लाभ अनेकांना मिळत नाही. याबाबत काय उपाययोजना कराव्यात असे वाटते?
डॉ. बाबासाहेब देशमुख : ठराविक टप्प्यानंतर संजय गांधी निराधार योजनेचा लाभ बंद होतो. ज्यांना हा लाभ घेणे बंद झाले आहे अशा निराधार महिलांना पुन्हा नव्याने श्रावणबाळ योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची तसदी देवू नये. त्यांना या योजनेचा थेट लाभ घेण्यासाठी पात्र धरावे. जेणेकरून पिचलेल्या निराधार महिलांना होणारा त्रास वाचेल. यासाठी आम्ही पुरोगामी युवक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना कृती कार्यक्रम देणार आहोत. त्या त्या गावात हे प्रश्न प्राधान्याने सोडवले जातील.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत आपली काय भूमिका असेल?
डॉ. बाबासाहेब देशमुख : स्थानिक स्वराज्य संस्थांची विकासामध्ये महत्वाची भूमिका असते. यामध्ये चांगली माणसे जावीत ही शेकापची अगोदरपासून भूमिका राहिली आहे. तिकीट वाटपाबाबत शेकापची मुख्य कमिटी निर्णय घेत असते. आबासाहेब यांच्या निधनानंतर प्रथमच शेकाप या निवडणुकांना सामोरे जात आहे. आबासाहेब यांच्या विचारांनुसार, त्यांच्या शिकवणीनुसार आम्ही पूर्ण ताकदीनिशी या निवडणुकांना सामोरे जाऊ.
शेकापने पाणी प्रश्नावर यापूर्वी मोठी आंदोलने केली आहेत. हा आंदोलनाचा वारसा पुढे कसा नेणार आहात?
डॉ. बाबासाहेब देशमुख : भाई स्व. गणपतराव देशमुख यांच्या प्रेरणेतून याही पुढील काळात शेकाप व पुरोगामी युवक संघटना पाणी प्रश्नावर काम करेल. कोरोना काळात पाणी परिषदा ऑनलाईन स्वरूपात झाल्या. पुढील काळात पाणी प्रश्नावर आम्ही आंदोलनात्मक भूमिका घेऊ. दुष्काळी भागात अनेक ठिकाणी पाणी आले असले तरी अजूनही मोठा भाग पाण्यापासून वंचित आहे. अशा वंचित शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पाणी पोहोचवण्याचे काम आम्हाला करावे लागणार आहे.