“पवार आणि ठाकरेंना ‘खंजीर’ चिन्ह द्या”
आ. गोपीचंद पडळकरांचा घणाघात
थिंक टँक / नाना हालंगडे
बारामतीच्या जाणत्या राजाने शिवसेनेच्याही पाठीत खंजीर खुपसला आहे. सध्याची शिवसेनेची स्थिती केवळ त्या जाणत्या राजामुळेच झाली आहे. पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात ठाकरे यांनी शिवसेना पक्षाचे विलीनीकरण करावे. या दोघांना एकत्रित “खंजीर” हे चिन्ह द्यावे, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करणार असल्याची घोषणा भाजपचे आ. गोपीचंद पडळकर यांनी केली.
आमदार गोपीचंद पडळकर यांनी खुद्द बारामतीत जाऊन पत्रकार परिषद घेऊन ही जहरी टीका केली आहे. ते पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना बोलत होते.
आमदार गोपीचंद पडळकर पुढे म्हणाले की, ‘एक आटपाट नगर होतं. त्या नगरातला राजा जिथे हात लावील त्या वस्तूचे सोने व्हायचे’ अशी कथा आपण बालपणी ऐकली होती. मात्र इकडे बारामतीचा जाणता राजा जिथे हात लावील त्याची राख होताना दिसत आहे. राजकीय पक्ष किंवा कार्यकर्त्यांच्या बाबतही तसेच घडते.
या जाणत्या राजाचे शिवसेनेला भाजपपासून तोडण्याचे मनसुबे लपून राहिलेले नाहीत. ते त्यांच्या वक्तव्यातून आणि राजकीय डावपेचातून अनेकदा दिसून आले. सध्याच्या शिवसेनेच्या स्थितीला तेही कारणीभूत आहेत.
खंजीर चिन्ह द्यावे
खांजिरतून उदयास आलेल्या पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात ठाकरे यांनी शिवसेना पक्षाचे विलीनीकरण करावे. या दोघांना एकत्रित “खंजीर” हे चिन्ह द्यावे. मशाल हे चिन्ह लोकांमध्ये पोहोचण्यास वेळ लागेल. त्याऐवजी खंजीर चिन्ह दिल्यास ते सहज लोकांच्या लक्षात येईल, असा सल्ला आ. पडळकर यांनी दिला.
निवडणूक आयोगाने लिहून घ्यावे
निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गटास खंजीर चिन्ह द्यावे. हा खंजीर पुन्हा एकमेकांच्या पाठीत खुपसणार नाही हे लिहून घ्यावे, अशी मागणी आ. पडळकर यांनी केली.
राष्ट्रवादीच्या जवळ जो जो जातो त्याची राख होते अशीही जहरी टीका पडळकर यांनी केली.
अजितदादांचे दुखणे वेगळे
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र येवून सरकार स्थापन केल्याने अनेकांची पोटदुखी वाढली आहे. अजिदादांनी बंडखोरी करून दीड दिवसांचे सरकार स्थापन केले तेव्हा साधे दोनही आमदार त्यांच्या पाठीमागे नव्हते. हे त्यांचे मूळ दुखणे असल्याने ते सतत टीका करत असतात. एकनाथ शिंदे यांच्या सारख्या सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनविण्याची किमया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
माझ्याकडून दुसरं काही शिकू नका, फक्त धाडस शिका : आ. शहाजीबापू पाटील
पाहा खास व्हिडिओ