पत्रकाराकडे शोधक नजर असावी : अरविंद जोशी
'जागर पत्रकारितेचा' या माध्यम सप्ताहात प्रतिपादन
सोलापूर – समाजातील गुणवत्ता शोधून काढण्याचे काम शोधपत्रकारितेद्वारे व्हावे. त्यासाठी पत्रकारांकडे शोधक दृष्टी असायला हवी, असे मत ज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी यांनी व्यक्त केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सामाजिक शास्त्र संकुलातील मास कम्युनिकेशन विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘जागर पत्रकारितेचा’ या माध्यम सप्ताहात ‘शोध व सखोल बातम्यांचे वार्तांकन’ याबाबत अरविंद जोशी बोलत होते. प्रारंभी मास कम्युनिकेशन विभागाचे प्रमुख डॉ. रवींद्र चिंचोलकर यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला.
शोध पत्रकारिता करत असताना पत्रकारांनी काय काळजी घेतली पाहिजे, याची माहिती त्यांनी दिली. एखादी सखोल बातमी करायची असल्यास संबधित माहितीच्या स्त्रोताचे नाव गुपित ठेवणे, माहिती अधिकार कायद्याचा वापर कसा करायचा, याची माहिती जोशी यांनी दिली .
पुढे बोलत असताना अरविंद जोशी यांनी जागतिक स्तरावरील वॉटरगेट प्रकरणापासून भारतातील व सोलापूर जिल्ह्यातील शोध पत्रकारितेची काही उदाहरणे दिली. अमेरिकेतील वाॅटरगेट प्रकरणाचे उदाहरण देताना ते म्हणाले कच-यात टाकून दिलेल्या कागदाच्या तुकड्यावरील माहितीवरुन पत्रकारांनी हे प्रकरण बाहेर काढले, या बातमीमुळे अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पदाचा राजीनामा द्यावा लागला, याची मांडणी केली.
महाराष्ट्रातील दिवंगत माजी मुख्यमंत्री बॅ. ए.आर अंतुले यांच्या गैरव्यवहार प्रकारावर आधारित शोध पत्रकारितेची माहिती दिली. सर्वसामान्य क्षेत्रातही शोध पत्रकारिता करता येते, असे त्यांनी सांगितले.
यावेळी पत्रकारिता विभागाचे प्रमुख डॉ. रवींद्र चिंचोलकर, डॉ. अंबादास भासके, तेजस्विनी कांबळे, डॉ. बाळासाहेब मागाडे, ऋषिकेश मंडलिक या अध्यापकांसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार डॉ. बाळासाहेब मागाडे यांनी मानले.
—-
सोमवारी ‘फॅक्टशाला’ कार्यशाळा
‘जागर पत्रकारितेचा’ या माध्यम सप्ताहा अंतर्गत सोमवार, ४ रोजी मदुराई (तामिळनाडू) येथील अमेरिकन कॉलेजच्या डॉ. शौरिनी बॅनर्जी या ‘फॅक्टशाला’ या विषयावर कार्यशाळा घेणार आहेत. फेकन्यूज कशा ओळखायच्या याचे त्या प्रशिक्षण देणार आहेत.