पत्रकारांनो फालतू प्रश्न मला विचारू नका! : ना. अजित पवार
पुण्यात अजिदादांनी पत्रकारांवर काढला राग
पुणे : जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्यासंदर्भात सातत्याने होणाऱ्या आरोपांना कंटाळून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सविस्तपणे पत्रकार परिषद घेतली. राज्यात मी एकट्यानेच साखर कारखाना विकत घेतलेला नाहीतर अशा 64 सहकारी साखर कारखान्यांचा लिलाव झाला आहे. जरंडेश्वर साखर कारखान्याची विक्री तर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे झाली आहे. त्यामुळे यात बेईमानी काहीच झालेली नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले. काही प्रश्नांवर मात्र ते वैतागलेले दिसले. पत्रकारांनो असले फालतू प्रश्न मला विचारू नका असे म्हणत पुण्यात अजिदादांनी पत्रकारांवर राग काढला.
अजित पवार यांच्यासह त्यांच्या नातेवाईकांवर प्राप्तिकर खात्याने नुकतीच छापे मारून कारवाई केली. त्याबद्दल विचारले असता त्यांनी या संस्थांनी जरूर ती चौकशी करावी. यातून खरे तेच बाहेर येईल. `तुम्ही पहाटे भाजपसोबत जाऊन सरकार स्थापन केले आणि त्यानंतर भाजपची साथ सोडली. त्यामुळे तुमच्यावर छापे पडत आहेत का, या प्रश्नावर त्यांनी त्रागा व्यक्त करत असले फाल्तू प्रश्न विचारू नका, असे सांगितले. मी कोणाबरोबर जायचे किंवा नाही, हा माझा निर्णय आहे. हा निर्णय घ्यायचा अधिकार मला आहे. हे तरी तुम्हाला मान्य आहे का, असा प्रतिप्रश्न त्यांनी केला.
तुम्ही पत्रकार मंडळी हा काय म्हणतो त्यावर मला विचारता आणि मी काय म्हणतो त्यावर दुसऱ्याला विचारता. तुम्हाला दुसरे काय काम आहे, असे म्हणत इतर कारखान्यांच्या विक्रीबाबत तुम्ही कधी इतरांना प्रश्न केले का, अशा प्रतिसवाल केला. मी ही माहिती मुंबईतील पत्रकारांना देऊ शकत होतो. पण पुण्यातील पत्रकारांना द्यावी म्हणून येथे माहिती देतोय, असेही त्यांनी मिश्किलपणे सांगितले.