पठ्ठे बापूराव : तमाशाला सुवर्णकाळ दाखवणारा अस्सल कलाकार
जन्मदिनानिमित्त विशेष लेख
थिंक टँक न्यूज नेटवर्क : डॉ. नाना हालंगडे
महाराष्ट्राच्या लोककलांचे खरे वैभव म्हणजे तमाशा. बहुजनांच्या उद्बोधन आणि रंजनाचे काम करणारा तमाशा अठराव्या शतकात रुजला असला, तरी एकोणिसाव्या शतकापासून विसाव्या शतकाच्या मध्यकालापर्यंत तमाशा बहरला. हा कालखंड म्हणजे तमाशाचा सुवर्णकाळ. आणि या सुवर्णकाळाचे शिल्पकार होते शाहीर पठ्ठे बापूराव.
त्यांचा जन्म ११ नोव्हेंबर १८८६ रोजी रेठरे हरणाक्ष ता. वाळवा, जि. सांगली येथे झाला. पठ्ठे बापूरावांचे खरे नांव श्रीधर कृष्ण कुलकर्णी. ग्रामीण भागात गायल्या जाणाऱ्या जात्यावरच्या ओव्यां ऐकूनऐकून पठ्ठे बापूराव यांनी त्यात नवे बदल केले. त्यांनाही ‘श्रीधरची गाणी’ लोकप्रियता मिळाली. त्याचा परिणाम औंधच्या राजांनी दखल घेऊन पठ्ठे बापूराव यांना आपल्याकडे बोलवून घेतले.
तमाशातला प्रवेश
पठ्ठे बापूराव यांचे पुढील शिक्षण औंध येथे झाले. गावी घरासमोर असलेल्या वाड्यातच तमाशाचा फड चालायचा. ब्राह्मण आणि कुलकर्णीपद. त्यामुळे रात्री पटकन उठून तमाशाला जाऊन बसायचे धाडस त्यांना होईना. मनातली तळमळही त्यांना गप्प बसू देईना. बापू चोरुन तमाशाला जाऊ लागले. तमासगीरांना त्यांनी अनेक लावण्या लिहून दिल्या. तमाशात बापूरावाच्या लावण्या आणि कवने गायली जाऊ लागली. ‘श्रेष्ठवर्ण मी ब्राह्मण असूनी ! सोवळे ठेवले घालूनी घडी !! मशाल धरली हाती तमाशाची लाज लावली देशोधडी !’ ह्या जिद्दीने ‘कुबेराला लाजवील असे वैभव तमाशाच्या जोरावर पायाशी लोळवीन’ हा संकल्प करुनच बापूराव घराबाहेर पडले. गावोगावी तमाशाचा फड उभे राहू लागे. त्यातून श्रीधरची वाहवा मिळता मिळता ‘पठ्ठेबापूराव’ म्हणून ते प्रसिद्धीला आले.
पवळा भेटली
नंतर हे शाहीर, मुंबईत आले, बटाट्याच्या चाळीत राहू लागले. तिथेही तमाशाच्या फडात जाऊन त्यांना लावण्या रचून देण्याचे काम त्यांनी काही दिवस केले. याच काळात त्यांना नामा धुळवडकरांच्या फडातील पवळा, नामचंद पवळा भेटली. तिला काहीजण ‘मस्तानी’ ची उपमा द्यायचे.
छ.शाहू महाराजांसमोर सादर केला वग
बापूरावांची काव्य प्रतिभा पवळाच्या सान्निध्यात बहरली. बापूरावांचे काव्य अन पवळा बाईच्या गोड गळ्याने व ठसकेबाज नृत्याने ती रसिकांच्यासमोर सादर केली. बापूराव आणि पवळा यांची कीर्ती महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात पसरली. १९०८-०९ साली छ.शाहू महाराजांसमोर त्यांनी ‘मिठाराणी’ चा वग पठ्ठे बापूरावनी सादर केला. पुढे त्या दोघांवर सर्वांनी बहिष्कार टाकला. तमाशाचा फड बंद पडला. आर्थिक कोंडी झाली. त्यामुळे बापूराव व पवळा या जोडीने स्वत:ला ९०० रुपयांचा करार करून स्वत:चा लिलाव केला. मुंबईच्या अबू शेठनी लिलाव घेतला.
मुंबईच्या एल्फिस्टन थिएटरवर पवळा पठ्ठे बापूराव यांना पाहण्यासाठी तिकीट लावले. पण पुढे पवळा बेबनावामुळे पठ्ठे बापूरावांचा फड सोडून निघून गेली. पठ्ठे बापूरावांनी दुसर्या स्त्रीला घेऊन त्यांनी तमाशाचा फड चालू ठेवण्याचा प्रयत्न केला. पण त्यात त्यांना यश आले नाही.
पठ्ठे बापूरावांचा गाता गळा
अभिजनांच्या अंगणातल्या वेदपठणाचा पठ्ठे बापूरावांचा गाता गळा बहुजनांच्या प्रांगणात गौळणी, लावण्या रचू लागला, गाऊ लागला. ‘श्रेष्ठ वर्ण मी ब्राह्मण असुनि सोवळे ठेवले घालुन घडी। हाती घेतली मशाल तमाशाची लाज लावली देशोधडी’ असे आपले वर्णन मोठ्या अभिमानाने त्यांनी स्वतःच केले आहे.
श्रीधर कृष्णाजीपंत कुळकर्णी ऊर्फ पठ्ठे बापूराव हे सांगली जिल्ह्यातील हरणाक्ष रेठरे येथील. पठ्ठे बापूरावांनी लाखभर लावण्या लिहिल्या असे अतिशयोक्तीने म्हटले जात असले, तरी या प्रतिभावंत कवीला साक्षात् सरस्वती आणि जंगलीमहाराज हे सिद्ध प्रसन्न होते असेच म्हणावे लागेल. मराठी, इंग्रजी आणि संस्कृत अशा भाषांवर पठ्ठे बापूरावांचे प्रभुत्व होते.
औंध आणि बडोद्याच्या संस्थानांमध्ये पठ्ठे बापूरावांनी शिक्षण घेतले. बडोद्याच्या संस्थानात असताना त्यांना तमाशा पाहण्याचा छंद लागला. हरणाक्ष रेठऱ्याला आल्यावर ते महारवाड्यात जाऊन तमाशे पाहू लागले. पुढे तमाशाचा नादच त्यांना लागला. या नादातच त्यांनी गण, गौळणी, लावण्या अशा रचना करण्यास सुरुवात केली.
तमाशात ‘रंगबाजी’ प्रकार आणला
१८९० ते १९०० या काळात पठ्ठे बापूराव प्रत्यक्ष तमाशाच्या फडात उभे राहिले, पठ्ठेबापूरावांनी तमाशात ‘रंगबाजी’ नावाचा स्वतंत्र प्रकार आणला. त्या काळातील नाटकांच्या प्रभावातूनच पठ्ठे बापूरावांनी ‘रंगबाजी’चे लेखन केले. १९१४ ते १९१८च्या काळात महायुद्ध आणि तापसरी, मंदीच्या लाटेत नाट्यसृष्टी हेलकावत होती, त्याच काळात अनेक तमासगीर महाराष्ट्राच्या खेडोपाडी जत्रा, यात्रांमधून तमाशा सादर करून तग धरून होते.
किस्से तमासगीरांच्या लढतीचे
पठ्ठे बापूरावांनी याच काळात आपली लोकप्रियता कायम ठेवली. त्या काळात तमासगीर आपल्या जातीपातींचा मोठ्या गौरवाने उल्लेख करीत. तमाशा क्षेत्र तर नांदत्या गोकुळासारखं अथवा खटल्याच्या घरासारखं असे. जातीय अस्मितेचा तुरा आपल्या डोक्यावर मिरवणारे तमासगीर कलगी-तुऱ्याच्या लढती खुल्या दिलाने करीत. हार-जीत होई – हारणारा आपली ‘हार’ मोठ्या मनाने स्वीकारी. पठ्ठे बापूराव यांच्या दगडूबाबा साळी शिरोलीकर, अर्जुना वाघोलीकर, भाऊ फक्कड यांच्याशी लढती झाल्याचा इतिहास आहे. या लढतींमध्ये पठ्ठे बापूराव हरले होते. त्यांना वर्षभर बांगड्या भरून राहावे लागले होते. पठ्ठे बापूरावांचे शिष्य आणि तमाशातील लोकप्रिय नाचे दादू तुळापूरकर यांच्याकडून पठ्ठे बापूरावांच्या काळातले अनेक किस्से ऐकण्याचा योग आला – अर्थात हे किस्से तमासगीरांच्या लढतीचेच होते. पठ्ठे बापूरावांच्या तमाशात पवळा आणि चंद्राबाई या दोन कलावंत स्त्रियांनी कामे केली.
जंगी सामना
पठ्ठे बापूराव आणि अर्जुना वाघोलीकर यांचा जंगी सामना एकदा आळंदीत झाला. या सामन्यात अर्जुना वाघोलीकर यांनी ब्रह्म्याची फोड केली. पठ्ठे बापूरावांचा राग अनावर झाला. ते म्हणाले, ‘तू माझ्या ब्रह्म्याची फोड केली. भगेंद्र होऊन मरशील.’ अर्जुना वाघोलीकरदेखील संतापले. ते पठ्ठे बापूरावांना म्हणाले, ‘तुझ्या अंत्ययात्रेला वर्गणी काढावी लागेल.’ आणि खरोखरच दोघांच्याही जीवनात तेच घडले.
‘शुभ मंगल चरणी गण नाचला’ हा गण पठ्ठेबापूरावांनी रचला. त्यात ‘गणपती नाचून गेल्यावरती शेंदूर ठेवला कोणा प्रती’ असा सवाल पठ्ठे बापूरावांनी भाऊ फक्कड यांना केला. भाऊ फक्कड यांनी पठ्ठेबापूरावांच्या गणाला उत्तर देताना म्हटले- ‘गणपती नाचून गेल्यावरती शेंदूर वाहू यक्षिणी प्रती.’ गणपती ही यक्षकुलातील देवता असल्याचे भाऊ फक्कड यांना ज्ञात होते.