पंढरीची कार्तिकीही लालपरीअभावी सुनिसुनी
सांगोला आगारालाच ११ लाख रुपयाचा फटका बसणार
थिंक टँक न्यूज नेटवर्क : डॉ. नाना हालंगडे
तब्बल दोन वर्षानंतर पंढरीची कार्तिकी वारी भरत आहे. परंतु, ही वारी लालपरीअभावी सुनिसुनी अशीच होणार आहे. याचा मोठा फटका सांगोला आगारालाही बसत असून ११ लाख रूपयाचे बुडणार आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या विलगीकरणाच्या मागणीसाठी राज्यव्यापी संप सद्या राज्यभर सुरू आहे. सांगोला आगारानेही मागील आठ दिवसांपासून या संपात सहभागी नोंदविला आहे. आगारातील २५३ कर्मचारी संपात सहभागी आहेत. एसटी ही सेवा बंद असल्याने सर्वांचेच हाल होत आहे. आत्ता १५ नोव्हेंबर रोजी कार्तिकी यात्रा सोहळा होणार आहे गेली दोन वर्षापासून कोरोना महामारीमुळे यात्रा बंदच होत्या आत्ता कुठे सर्व काही सुरळीत सुरू असताना एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे ही वारी भाविकाअभावी होणार नाही. दरवर्षी कार्तिकी वारीचे सांगोला आगाराला ११ लाख रुपयाचे उत्पन्न मिळते. हे आगार मध्यवर्ती असून ग्रामीण भागासह पंढरपूर, सांगली ,मिरज, सोलापूर, जत आधिसह अन्य मार्गावर या गाड्या धावतात.
उद्या वारीला जाण्यासाठी महत्त्वाचा दिवस आहे. १५ नोव्हेंबर रोजी कार्तिकी वारी सोहळा आहे. रेल्वेची सेवा सुरू आहे. पण ग्रामीण भागातील लोकांना रेल्वे स्टेशनपर्यंत ज्याण्यासाठीही सुविधा नाहीत. सांगोला आगाराला कोरोनामुळे मोठा फटका बसलेला आहे याच आगाराचे दैनंदिन उत्पन्नही ५ ते ६ लाख रूपये इतके आहे.
आत्ता एसटी बंद असल्यामुळे ग्रामीण भागातील लोकांचे व अन्य प्रवाशी वर्गांचे मोठ्या हाल सुरू आहेत. आता तर वारी सुरू झाली पण एसटी बंद असल्यामुळे वारीही सुनिसुनी होणार आहे.