पंढरपुरातील आंदोलनात शेकडो वारकरी, कार्यकर्ते दाखल
प्रकाश आंबेडकर थोड्याच वेळात दाखल होणार
पंढरपूर : विठ्ठल मंदिर दर्शनासाठी सुरु करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी व विश्व वारकरी सेनेने सोमवारी आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनात प्रमुख महाराज मंडळींसह शेकडो वारकरी व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते दाखल झाले आहेत.
वंचितच्या कार्यकर्त्यांनी सकाळी आठ वाजल्यापासून शिवाजी चौकात भजन आंदोलन सुरु केले आहे. आठ वाजल्यापासून आंदोलक जमण्यास सुरुवात झाली. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस अधीक्षक मनोज पाटील पंढरपूरमध्ये दाखल झाले आहेत. अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलिस अधिकारी डाॅ. सागर कवडे पो. नि. अरुण पवार हे शिवाजी चौक, मंदिर परिसरातील प्रत्येक घडामोडीवर लक्ष ठेवून आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडु नये यासाठी ड्रोन कॅमेराद्वारे चित्रीकरण केले जात आहे.