नोटबंदीला पाच वर्षे पूर्ण

जीवघेण्या त्रासाच्या आठवणी आजही ताज्या

Spread the love

रांगेत उभे राहून सर्वसामान्यांना झालेला त्रास, लघु व मध्यम उद्योग, कंपन्या, व्यवसायांचे झालेले नुकसान हा नोटबंदीचा परिणाम होता. उद्योग क्षेत्राचा रोजचा चलनात खेळणारा पैसा हा एकाएकी रद्द झाल्याने उद्योगधंदे दिवाळखोरीत गेले. बेकारी वाढली. नोटबंदी करताना त्याचे परिणाम काय होतील, याची जबाबदारी सरकारने घेतली नाही. बँक खात्यातून स्वतःचेच पैसे परत मिळवताना ग्रामीण, निम-शहरी व आदिवासी बहुल भागातील लोकांना झालेल्या त्रासाची जबाबदारी सरकारने घेतली नाही.नोटबंदीचा निर्णय जाहीर करताना मोदींनी ‘मला फक्त ५० दिवस द्या’ असे विधान केले होते, त्या विधानाचे पुढे काय झाले हा प्रश्न ५ वर्षांनीही अनुत्तरितच आहे.

थिंक टँक न्यूज नेटवर्क : डॉ. नाना हालंगडे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी घोषीत केलेल्या नोटबंदीच्या ऐतिहासिक घटनेला आज पाच वर्षे पूर्ण होत आहेत. पाच वर्षांनंतरही नोटबंदीच्या काळात झालेल्या यातना अद्याप ताज्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी रात्री आठ वाजता जनतेला संबोधित करताना जाहीर केलं की दुसऱ्या दिवशीपासून तेव्हा अस्तित्वात असणाऱ्या 500 आणि 1000च्या नोटा चलनातून रद्द होतील. याला नोटबंदी असे संबोधण्यात आले असले तरी नोट निश्चलनीकरण हा शब्द योग्य असल्याचे अनेकांचे मत आहे.

रातोरात उडाली झोप
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटबंदीची घोषणा केली. रातोरात सगळ्यांची झोप उडाली. ज्यांच्याकडे काळा पैसा होता असे लोक अडकित्त्यात सापडल्यासारखे झाले. गृहिणींनी डब्यात भरून ठेवलेले पैसे बाहेर काढले. बँक कर्मचाऱ्यांच्या डबल शिफ्ट लागल्या. नोटा बदलवून घेण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्या.

नोटबंदीचे कारण
पाच वर्षापूर्वी नोटबंदी का झाली, याचे कारण समजून घेतले पाहिजे. अनेकांनी वेगवेगळ्या पद्धतीने याची मांडणी केली आहे.२०१५-१६ ला जे काही कागदी चलन भारतात होते, त्यातील ९५ टक्के चलन हे उच्च मूल्याच्या नोटांच्या रुपात होते. (१००० च्या नोटा ३८ टक्के, ५०० च्या नोटा ४५ टक्के आणि १०० च्या नोटा १० टक्के) याचा अर्थ ३० टक्के नागरिक दारिद्य्र रेषेखाली जीवन जगत असताना एकूण चलनाचे ९५ टक्के मूल्य अशा तीन मोठ्या नोटांत होते. त्यामुळे पैसा फिरत नव्हता आणि त्याचे एक दुष्टचक्र तयार झाले होते. एका आजारातून दुसरा, दुसऱ्यातून तिसरा व्हावा, असे हे दुष्टचक्र काम करत होते.

अर्थव्यवस्थेत क्रेडीट तयार होत नव्हते
याचा अर्थ मोठ्या नोटांच्या अधिक प्रमाणामुळे बॅंकिंग करण्याची गरजच पडत नव्हती, बॅंकिंग न केल्याने अर्थव्यवस्थेत क्रेडीट तयार होत नव्हते. ते होत नसल्याने भांडवल निर्मितीचा वेग मंदावला होता आणि त्यामुळे ते महाग होते म्हणजे व्याजदर जास्त होते. ते जास्त असल्याने शेती, व्यवसाय आणि उद्योगांना कर्ज घेणे इतके महाग पडत होते म्हणजे ते ज्या वस्तू निर्माण करत होते, त्या देशात महाग विकाव्या लागत होत्या, तर जागतिक बाजारपेठेत त्यांना स्पर्धा करता येत नव्हती.

डिजिटल व्यवहारांना चालना
बॅंकिंगच कमी केल्यामुळे करवसुली चांगली होण्याचा संबंधच राहिला नव्हता. त्यामुळे प्रचंड संपत्ती निर्माण करणारा देश ७० वर्षे प्रचंड आर्थिक तुटीचा आणि अतिशय कमी दर्जाच्या सार्वजनिक सेवांचा सामना करत होता. आता नोटबंदीने हे दुष्टचक्र लगेच म्हणजे गेल्या पाच वर्षांत भेदले गेले, असे अजिबात म्हणता येणार नाही. पण चार वर्षांत डिजिटल व्यवहारांना चालना दिली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत ५० टक्क्यांनी वाढले आहे. काळाबाजार रोखण्यासाठी खरेदी केलेल्या वस्तूंची बिले घेण्याचे प्रमाणात गतवर्षीच्या तुलनेत वाढ होताना दिसत आहे.

असे असले तरीही पान टपरी, भाजीपाला, किरकोळ बाजारात फोन पे, गुगल पे, भीम ॲप्लिकेशन आदीवरून व्यवहार होताना दिसत आहेत. डिजिटल व्यवहाराच्या सवयी लोकांना लागत आहेत. थोडेफार सकारात्मक परिणाम घडले असले तरी नोटबंदीने अनेक व्यवसाय बंद झाले, अनेकांचे रोजगार गेले, नोट बदलण्यासाठी रांगेत उभा राहिलेल्या अनेक लोकांचे जीव गेले हा कलंक मात्र तसाच राहील.
संदर्भ : इंटरनेट

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका