निसर्गाच्या अवकाळी कळा, बारमाही पावसाळा

चर्चा तर होणारच

Spread the love

कमी दाबाचे पट्टे आणि चक्रीवादळांच्या मालिकामुळे राज्यात कुठेना कुठे प्रत्येक महिन्यात पाऊस पडत असल्याने, यावर्षी सलग बारा महिन्याचा पावसाळा अनुभवास मिळाला आहे. यंदा हिवाळ्यात तापमानवाढ झाली. आणि ढगाळ वातावरणामुळे उन्हाच्या झळाही अतितिव्र झाल्या नाहीत. त्यामुळे हे दोन्ही हंगाम झाकोळून गेले. आणि केवळ पावसाळ्याचेच वर्चस्व निर्माण झाल्याची स्थिती राज्यात पहावयास मिळत आहे.

सांगोला / नाना हालंगडे
गतवर्षी सांगोला तालुक्यात दशकानंतर अतिवृष्टी झाली. तीही ऐन कोरोना काळात. त्यानंतर आताही तालुक्यात विशेषत: उन्हाळा, पावसाळा आणि आता हिवाळा पूर्णपणे झाकोळलेलाच पहावयास मिळत आहे. पण हिवाळ्यातही सांगोला तालुकावासियांनी पावसाळा अनुभवास मिळत आहे. कसलीच थंडी जाणवत नाही. यामुळे शेतकर्‍यांचे, फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसानही झाले. तर गतवर्षीही शेतीसह घरांचे, पशुंचे व महावितरणचे कोट्यवधी रूपयांचे नुकसान झाले.

तालुक्यात दशकानंतर नद्या भरून वाहिल्या. त्यावेळीही कोरोनाची गंभीर स्थिती होती. आताही कोरोनामुळे प्रदुषण कमी झाल्याने गतवर्षासारखी स्थिती आहे. त्यामुळे हा पावसाळा गतवर्षासारखाच अनुभवास मिळाला होता. माणदेशातील दुष्काळी सांगोला तालुक्याची ओळख आता जवळजवळ पुसली गेल्यातच जमा आहे. निसर्गाच्या भरभरून वरदानाबरोबरच तालुक्यातील शेतीच्या पाण्याच्या योजनाही अंतिम टप्प्यात आलेल्या आहेत. त्यामुळे बळीराजा सुखावला आहे.

कमी दाबाचे पट्टे आणि चक्रीवादळांच्या मालिकामुळे राज्यात कुठेना कुठे प्रत्येक महिन्यात पाऊस पडत असल्याने, यावर्षी सलग बारा महिन्याचा पावसाळा अनुभवास मिळाला आहे. यंदा हिवाळ्यात तापमानवाढ झाली. आणि ढगाळ वातावरणामुळे उन्हाच्या झळाही अतितिव्र झाल्या नाहीत. त्यामुळे हे दोन्ही हंगाम झाकोळून गेले. आणि केवळ पावसाळ्याचेच वर्चस्व निर्माण झाल्याची स्थिती राज्यात पहावयास मिळत आहे.

गतवर्षी 2020 मध्ये अरबी समुद्राने बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेले कमी दाबाचे पट्टे आणि चक्रिवादळामुळे आपल्या राज्यातही मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाला.  अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले. तर हातातोंडाशी आलेल्या शेतीचेही नुकसान झाले. 2020 मध्ये जानेवारीच्या सुरूवातीलाच ऐन थंडीत विदर्भात गारपिटीने पिकांचे दाणादाण उडवून दिली. तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही जोरदार पावसाने शेतीचे नुकसान केले.

फेब्रुवारीत ठिकठिकाणी पाऊस होता. जून ते सप्टेंबर या हंगामात तर हक्काचा मौसमी पाऊस होताच, पण त्यानंतरही कमी अधिक प्रमाणात पाऊस बरसतच राहिला. ऐन थंडीच्या मौसमात डिसेंबरमध्ये पाऊस होता. तो 2021 या नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कायम राहिला. त्यामुळे थंडीच्या वाटेत दक्षिणेकडून येणारे उष्ण वारे आणि कमी दाबाचे पट्टे अडथळे ठरले.

जानेवारी 2021 मध्येे सुरूवातीलाच पाऊस होवून सलग पावसाची नोंद झाली. फेब्रुवारीचे सुरूवातीचे काही दिवस कोरडे गेल्यानंतर थेट गारपीटीचे संकट राज्यावर आले. मार्चच्या सुरूवातीला उन्हाळ्याची चाहूल लागली असतानाच मध्यावर मात्र पुन्हा हवामानाने फिरकी घेतली. आणि मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात जोरदार पाऊस झाला. एप्रिलमध्ये पहिल्या आठवड्यानंतर बहुतांश भागात पावसाला सुरूवात झाली. पावसाळी स्थिती एप्रिलअखेर पर्यंत कायम राहिल्याने उन्हाच्या झळा तिव्र होवू शकल्या नाहीत. चालू मे मध्येही तीच स्थिती राहिली.

अरबी समुद्रातील कमी दाबाचे पट्टे आणि चक्रीवादळाने ढगाळ वातावरण आणि पाऊस कायम राहिल्याने उन्हाळा झाकोळून गेला. अशातच चक्रिवादळाची मालिका सुरू राहिल्याने त्यातील अल्फान, निवार, गती, निसर्ग व त्यॉक्ते या चक्रीवादळाने धुमाकूळ घातला. आपल्या राज्यापेक्षा अन्य राज्यामध्ये विदारक स्थिती पहावयास मिळाली. कोकण केरळमध्ये याचा फटका मोठा बसला.

यात त्योंक्ते चक्रीवादळामुळे मोठी हानी होण्यासह जोरदार पाऊस झाला. आता बंगालचा उपसागरात यास नावाच्या चक्रीवादळाचे संकेत आहेत. या चक्रीवादळाबरोबरच पाऊसही सक्रीय झाला असून, या पावसामुळे राज्यात यंदा हिवाळा आणि उन्हाळाही झाकोळून गेलेला आहे.

माणदेशातील दुष्काळी सांगोला तालुका मात्र या पावसाबरोबरच टेंभू, म्हैसाळ, व निरेच्या पाण्याने गारेगार झाला आहे. या सांगोला तालुक्यातही उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा काहीच जाणवला नाही. हे ही विशेषच म्हणावे लागेल. खरीप बरोबर रब्बी हंगामही वाया गेल्यात जमा आहे. थंडीही गायब झाली आहे. मागील आठ दिवसापासून हा पाऊस तालुक्यात नासाड्या ठरत आहे. पिके व फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. अशातच महावितरणने वीजबिल वसुलीची मोहीम सुरू केल्याने बळीराजा पुरता हैराण झाला आहे.

उन्हाळ्यात, हिवाळ्यातही पाऊस पडत असल्याने तालुक्यात सर्वत्र पावसाळा अनुभवास मिळत आहे. त्यामुळे बाराही महिने पावसामुळे बळीराजाचे बारा वाजले आहेत.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका