नारायणराव दाभाडकरांचा मृत्यू, नेमकं सत्य काय?
पत्रकार विजय चोरमारे यांचा सणसणीत लेख
दाभाडकरांच्या मृत्यूच्या बातमीचे उदात्तीकरण करताना जो तपशील देण्यात आला तो साधारणपणे असा आहेः नागपुरात राहणाऱ्या ८५ वर्षीय नारायण दाभाडकर यांना काही दिवसांपूर्वी कोरोना संसर्ग झाला होता. त्यांची ऑक्सिजन लेव्हल साठपर्यंत पोहोचली होती. मुलगी आणि जावयाने त्यांना इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयात दाखल केलं. बऱ्याच वेळानंतर त्यांना बेड मिळाला. त्याचवेळी एक महिला आपल्या चाळीस वर्षीय पतीला वाचवण्यासाठी बेड शोधत असल्याचे त्यांना समजले. मात्र बेडअभावी रुग्णालयाने त्यांना दाखल करण्यास असमर्थता दर्शवली. रडणाऱ्या महिलेला पाहून दाभाडकरांना पाझर फुटला. “मी ८५ वर्षांचा झालोय, आयुष्याचा भरभरुन उपभोग घेतला आहे. जर त्या महिलेच्या पतीचे निधन झाले, तर तिची मुले अनाथ होतील. त्यामुळे त्या व्यक्तीचे प्राण वाचवणे हे माझे कर्तव्य आहे” अशा भावना दाभाडकरांनी व्यक्त केल्या. मी माझा बेड स्वेच्छेने सोडत असल्याचे पत्र त्यांनी रुग्णालय प्रशासनाला दिले. दाभाडकर घरी परतले, मात्र तीनच दिवसात राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली.
बेड मिळवण्यासाठी देशभर जो काही आकांत सुरू आहे, त्या पार्श्वभूमीवर एका ज्येष्ठ नागरिकाने अशा प्रकारचा त्याग करण्याची घटना कुणाच्याही काळजाला भिडल्याशिवाय राहात नाही. एरव्ही कुणी त्रयस्थ व्यक्ती असती तर त्याची फारशी चर्चा झाली नसती. परंतु योगायोगाने दाभाडकर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असल्याचे पुढे आले. त्यापाठोपाठ संघपरिवारातून त्यांच्या त्यागाच्या कहाण्या रचून त्या सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आल्या. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी, नारायणराव दाभाडकर यांनी दुसऱ्या रुग्णासाठी बेड नाकारला अन् मृत्यूला कवटाळलं अशी माहिती ट्विट करून दिली. “दुसऱ्या व्यक्तिचा जीव वाचवताना नारायणजी तीन दिवसांमध्ये जग सोडून गेले. समाज आणि राष्ट्राचे खरे सेवक असाच त्याग करतात. आपल्या सेवेला सलाम!, तुम्ही समाजासाठी प्रेरणादायी आहात”. अशा भावना शिवराजमामांनी व्यक्त केल्या. त्यानंतर सोशल मीडियावर दाभाडकर यांचा फोटो शेअर करत त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरू झाला. राष्ट्रीय पातळीवरील अनेक माध्यमांनी शिवराजसिंह चौहान यांच्या ट्विटच्या आधारे दाभाडकरांच्या त्यागाच्या बातम्या प्रसिद्ध केल्या.
डिजिटल माध्यमांची विश्वासार्हता नाही. टीव्हीची विश्वासार्हता नाही. किमान वृत्तपत्रे नेमकी वस्तुस्थिती समोर आणतील, अशी अपेक्षा असते. परंतु नागपूरच्या वृत्तपत्रांनीही अशाच आशयाची बातमी छापल्यामुळे संभ्रम निर्माण झाला. संभ्रम अशा अर्थाने की, ज्या रुग्णाची ऑक्सिजन लेव्हल साठपर्यंत खाली गेली आहे, त्या रुग्णाला बाहेर काय चालले आहे, कुठल्या महिलेचा आकांत सुरू आहे, कुणाला बेडची गरज आहे वगैरे गोष्टी कशा कळू शकतील? अंधभक्तांनी मेंदू मोदींच्या लॉकरमध्ये ठेवल्यामुळे आणि तो लॉकर सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्टच्या पायात गाडल्यामुळे त्यांच्याकडून असा काही प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता नाही. कारण त्यांना फक्त दिलेली मोहीम पुढे न्यायची असते. काही मंडळींनी सत्यशोधन सुरू केले. सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात सक्रीय असलेले पुण्यातील एक तरुण कार्यकर्ते शिवराम ठवरे यांनी थेट नागपूरच्या इंदिरा गांधी हॉस्पिटलचे अधीक्षक अजय प्रसाद यांनाच फोन लावला. परंतु त्यांनी, सकाळपासून आमच्याकडे यासंदर्भातील अनेक फोन येताहेत परंतु अशा नावाचा कुणी रुग्ण आमच्याकडे दाखल झालेला नव्हता, आणि अशी काही घटना आमच्या हॉस्पिटलमध्ये घडलेली नाही, अशी माहिती दिली. त्यावरून दाभाडकर प्रकरण संपूर्ण बोगस असल्याची चर्चा जोरात सुरू झाली. त्यावरून सोशल मीडियावर अनेक विनोद व्हायरल होऊ लागले.
एकूण वस्तुस्थिती काय आहे?
नागपूरमध्ये इंदिरा गांधींच्या नावाने दोन हॉस्पिटल आहेत.
इंदिरा गांधी गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल हे सरकारी हॉस्पिटल.
आणि दुसरे नागपूर महापालिकेचे इंदिरा गांधी रुग्णालय.
(संघाच्या भूमीत इंदिरा गांधींच्या नावाने दोन हॉस्पिटल हे आश्चर्यकारक म्हणावे लागेल. आणि संघस्वयंसेवक दाभाडकर यांना इंदिरा गांधी हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले होते हे दुसरे आश्चर्य. ज्याप्रमाणे इंदिरा गांधींच्या नावाच्या शाळेत शिकणार नाही असा निर्धार बालदेवेंद्र फडणवीस यांनी शाळकरी वयात केला होता. तशा पद्धतीने दाभाडकरांनी इंदिरा हॉस्पिटल सोडल्याचे सध्यातरी रेकॉर्डवर आलेले नाही. कदाचित भविष्यात तसेही रेकॉर्डवर आणले जाईल. म्हणजे दाभाडकरांच्या स्टोरीला आणखी वजन येईल.)
शिवराम ठवरे यांनी इंदिरा गांधी हॉस्पिटलला फोन केला होता. आणि दाभाडकर दाखल होते, ते महापालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयात. नागपूरच्या काही पत्रकार मित्रांशी बोलल्यानंतर असे कळले की, महापालिकेचे जे इंदिरा गांधी रुग्णालय ते साधे कोविड सेंटर आहे. तिथे ऑक्सिजनची सोय केली आहे एवढेच. ते काही सुसज्ज हॉस्पिटल वगैरे नाही.
तर या रुग्णालयातून नारायण दाभाडकर यांनी डिस्चार्ज घेतला आणि घरी गेले. त्यानंतर तीन दिवसांनी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर कुटुंबीयांनी त्यांच्या त्यागाबद्दल बोलणे समजू शकते. ज्याचे जवळचे कुणी जाते तेव्हाच जवळच्या माणसाच्या जाण्याची तीव्रता जाणवत असते. आणि कुणालाही आपले जवळचे माणूस गेल्यानंतर त्याच्या मृत्यूआधीच्या कृतीत काहीतरी अर्थ दिसत असतो. त्याग दिसत असतो. त्यामुळे त्यांनी माध्यमांशी बोलताना दिलेल्या प्रतिक्रिया स्वाभाविक म्हणता येईल. परंतु महापालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयाचे कोविड प्रभारी अजय हरदास यांच्या प्रतिक्रियेमुळे थोडी गफलत झालेली दिसते. तेही नागपूरचे असल्यामुळे आणि दाभाडकर स्वयंसेवक असल्यामुळे त्यांनाही भावना आवरता आल्या नसाव्यात. त्यांच्या प्रतिक्रियेचा दाभाडकरांच्या त्यागाच्या स्टोरीला आधार मिळाला. `नारायणरावांना बेड मिळाला, उपचारही सुरू झाले होते. मात्र त्यांना दिसलेल्या विदारक स्थितीत स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता त्यांनी बेड सोडला, ही या काळातील सर्वात औदार्याची वृत्ती आम्ही मानतो.` अशी त्यांची प्रतिक्रिया आहे.
इंदिरा गांधी रुग्णालयातून डिस्चार्ज घेऊन नारायणराव दाभाडकर घरी गेले, ही वस्तुस्थिती आहे. घरी गेल्यानंतर तीन दिवसांनी त्यांचे निधन झाले, हीसुद्धा वस्तुस्थिती आहे. कदाचित असे झाले असावे, की इंदिरा गांधी रुग्णालयातील एकूण सुविधांची स्थिती पाहून, इथल्यापेक्षा घरी राहून लवकर बरे होऊ, असे दाभाडकरांना वाटले असेल. कुटुंबीयांशी युक्तिवाद करताना, आपले जगून झाले आहे, आपला बेड एखाद्या तरुण रुग्णाला उपयोगी येईल, असे ते म्हणालेही असू शकतील. परंतु दरम्यानच्या काळात ५५-६० ऑक्सिजन लेव्हल, पतीला बेड मिळण्यासाठी चाललेला महिलेचा आकांत वगैरे गोष्टींची भर घालून करोनाकाळावर स्वयंसेवकाचा त्याग नोंद करण्याची ऐतिहासिक संधी म्हणून कुणीतरी या घटनेकडे पाहिले. म्हणजे करोनाकाळाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा कोविड योद्ध्यांच्या त्यागापेक्षा संघ स्वयंसेवकांवरच जास्ती पाने असू शकतील. त्यात राणे कंपनीकडून लिहून घेतलेला धारावीचा एपिसोड असेल. फडणवीस, दरेकरांची रेमडेसिवीरची लढाई असेल.
दाभाडकरांच्या मृत्यूनंतर एकीकडे उदात्तीकरण आणि दुसरीकडे टिंगलटवाळी असे परस्परविरोधी चित्र पाहायला मिळाले.
नारायणराव दाभाडकर यांचे निधन झाले आहे, ही वस्तुस्थिती. त्यांना भावपूर्ण आदरांजली. त्यांच्या कुटुंबीयांना दुःख सहन करण्याचे बळ मिळो, ही प्रार्थना!
– विजय चोरमारे (ज्येष्ठ पत्रकार, मुंबई)