ताजे अपडेटथिंक टँक स्पेशलशेतीवाडी
Trending

नरक चतुर्दशी : अकाली मृत्यूची भीती संपविणारा सण

Deewali दिवाळी

Spread the love

या दिवशी सकाळी अभ्यंग स्नान करून यमराजाची पूजा केली जाते. मान्यतेनुसार, असे केल्याने व्यक्तीची सर्व पापांपासून मुक्ती होत त्याला स्वर्गप्राप्ती होते. संध्याकाळी यमाची पूजा करत दिवा लावण्याची प्रथा आहे. असे केल्याने अकाली मृत्यूची भीती नाहीशी होते.

थिंक टँक / नाना हालंगडे
हिंदू मान्यतेनुसार, दिवाळी पर्वात साजरा होणाऱ्या नरक चतुर्दशीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी तर्पण आणि दीपदान करण्याची प्रथा आहे. या दिवशी सकाळी अभ्यंग स्नान करून यमराजाची पूजा केली जाते. मान्यतेनुसार, असे केल्याने व्यक्तीची सर्व पापांपासून मुक्ती होत त्याला स्वर्गप्राप्ती होते. संध्याकाळी यमाची पूजा करत दिवा लावण्याची प्रथा आहे. असे केल्याने अकाली मृत्यूची भीती नाहीशी होते.

पौराणिक कथेनुसार, या दिवसी भगवान श्रीकृष्णाने पत्नी सत्यभामाच्या मदतीने नरकासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. या राक्षसाने देवता आणि ऋषींना त्रास तसेच 16 हजार महिलांनाही ओलीस ठेवले होते. त्यामुळे नरकासुराला एका स्त्रीच्या हातून मरण्याचा शाप मिळाला होता. नरकासुराचा वध झाला त्या दिवशी अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी होती. नरकासुराच्या तावडीतून सुटका झालेल्या या 16 हजार महिला पुढे श्रीकृष्णाच्या पाट राणी म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या.

नरक चतुर्दशीच्या दिवशी विधिवत पूजन करत काही उपाय केले जातात. त्यानुसार जीवनातील समस्या दूर करण्यासाठी तसेच सौंदर्य प्राप्तीसाठी नरक चतुर्दशीला सूर्योदयापूर्वी उठून उटण्याने स्नान केले जाते. त्यानंतर सूर्यदेवाला अर्ध्य अर्पण केले जाते. यासह दक्षिणेकडे तोंड करून हात जोडून यमराजाची प्रार्थना करण्याची प्रथा आहे.

कालिका देवीची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात.
घरातील सुख-समृद्धीसाठी या दिवशी घरामध्ये पूर्व दिशेला चारमुखी दिवा लावला जातो.

जीवनातील संकटे दूर करण्यासाठी नरक चतुर्दशीला हत्तीला गोड पदार्थ किंवा ऊस खाऊ घालावे, असे मानले जाते.

‘श्रीमद्भागवतपुराणात अशी एक कथा आहे – पूर्वी प्राग्ज्योतिषपूर येथे भौमासुर किंवा नरकासुर या नावाचा एक बलाढ्य असुर राज्य करत होता. देव आणि मानव यांना तो फार पीडा देऊ लागला. हा दुष्ट दैत्य स्त्रियांना पीडा देऊ लागला. त्याने जिंकून आणलेल्या सोळा सहस्र उपवर राजकन्यांना कारागृहात कोंडून ठेवले आणि त्यांच्याशी विवाह करण्याचा बेत केला. त्यामुळे जिकडेतिकडे हाहाःकार उडाला. श्रीकृष्णाला हे वृत्त समजताच सत्यभामेसह त्याने नरकासुरावर आक्रमण केले आणि त्याला ठार करून सर्व राजकन्यांना मुक्त केले.

मरतांना नरकासुराने कृष्णाकडे वर मागितला, ‘आजच्या तिथीला जो मंगलस्नान करील, त्याला नरकाची पीडा होऊ नये.’ कृष्णाने तसा वर त्याला दिला. त्यामुळे आश्विन वद्य चतुर्दशी ही ‘नरक चतुर्दशी’ मानली जाऊ लागली आणि लोक त्या दिवशी सूर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान करू लागले. चतुर्दशीच्या पहाटे नरकासुरास ठार करून त्याच्या रक्ताचा टिळा कपाळास लावून श्रीकृष्ण घरी येताच मातांनी त्याला आलिंगन दिले. स्त्रियांनी दिवे ओवाळून आनंद व्यक्त केला.

आश्विन कृष्ण चतुर्दशीस नरक चतुर्दशी असे म्हणतात. दिवाळीच्या दिवसांतील हा एक सण आहे. या सणाशी संबंधित एक आख्यायिका प्रचलित आहे. नरकासुर नावाच्या एका राजाने तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले व कुणाकडूनही वध होणार नाही – असा वर मागून घेतला. त्या वराच्या योगाने त्याने अनेक राजांना हरवून त्यांच्या कन्या व त्या राज्यांतील स्त्रियांचे अपहरण केले.

नरकासुराने अश्या एकूण १६,१०० स्त्रियांना पळवून नेले व मणिपर्वतावर एक नगर वसवून त्यात त्यांना बंदी बनवून ठेवले. त्याने अगणित संपत्ती लुटली व अश्याच हावेपोटी त्याने देवमाता अदितीची कुंडले व वरुणाचे विशाल छ्त्रही बळकावले. त्याला मिळालेल्या वरामुळे तो देव, गंधर्व व मानवांना तापदायक झाला होता. अनेक गिरिदुर्गांनी वेढलेले प्राग्ज्योतिषपूर हे नगर त्याची राजधानी होती. ही राजधानी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या खंदकांनी अग्नी, पाणी इत्यादींनी वेढलेली होती. या दुर्जय राजधानीवर कृष्णाने गरुडावर स्वार होऊन चाल केली.

कृष्णाने नरकासुराच्या देहाचे दोन तुकडे करत त्याचा वध केला. नरकासुरवधाने देवादिकांना, तसेच प्रजेला आनंद झाला. नरकासुराच्या बंदिवासातील कुमारिकांना त्यांचे स्वजन स्वीकारणार नाहीत, हे जाणून कृष्णाने या १६,१०० कन्यांसोबत विवाह केला व त्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून दिली. कृष्णाच्या पराक्रमाचे स्मरण म्हणून नरक चतुर्दशी साजरी करतात.

महत्त्व
आदल्या रात्री १२ वाजल्यापासूनच वातावरण दूषित लहरींनी युक्त असे बनू लागते; कारण या तिथीला ब्रह्मांडातील चंद्रनाडीचे सूर्यनाडीमध्ये स्थित्यंतर घडून येते. या स्थित्यंतराचा अपेक्षित असा लाभ पाताळातील वाईट शक्तींकडून उठवला जातो. पाताळातून प्रक्षेपित होणार्‍या नादयुक्त कंपन लहरी वातावरणात त्रासदायक अशा ध्वनीची निर्मिती करतात.

या ध्वनीची निर्मिती लहरींतील रज-तमात्मक कणांच्या हालचालींतून उत्पन्न झालेल्या ऊर्जेतून केली जाते. या लहरी विस्फुटित लहरींशी संबंधित असतात. या लहरींतील ध्वनीकंपनांना आवर घालण्यासाठी पहाटेच्या वेळी अभ्यंगस्नान करून तुपाचे दिवे लावून दीपाची मनोभावे पूजा करतात. यामुळे दीपातून प्रक्षेपित होणार्‍या तेजतत्त्वात्मक लहरींच्या माध्यमातून वातावरणातील त्रासदायक लहरींतील रज-तम कणांचे विघटन केले जाते.

या विघटनात्मक प्रक्रियेमुळे अनेक सूक्ष्म शक्तींच्या कोषांतील रज-तम कणही विरघळले जातात आणि वाईट शक्तींच्या भोवती असलेले संरक्षककवच नष्ट होण्यास साहाय्य होते. यालाच ‘आसुरी शक्तींचा वातावरणात दिपाच्या साहाय्याने झालेला संहार’ असे म्हणतात; म्हणून या दिवशी वाईट शक्तींचे निर्दालन करून पुढच्या शुभकार्याला दिपावलीच्या इतर दिवसांच्या माध्यमातून जिवाने आरंभ करावयाचा असतो. असुरांच्या संहाराचा दिवस, म्हणजेच एकप्रकारे नरकातील पृथ्वीवर अवतीर्ण झालेल्या वाईट लहरींच्या विघटनाचा दिवस म्हणून नरकचतुर्दशीला विशेष महत्त्व आहे.

सण साजरा करण्याची पद्धत
अ. आकाशात तारे असतांना ब्राह्ममुहूर्तावर अभ्यंगस्नान करतात. आघाडा या वनस्पतीच्या फांदीने डोक्यापासून पायापर्यंत आणि पुन्हा डोक्यापर्यंत पाणी प्रोक्षण करतात. यासाठी मूळ असलेली आघाड्याची वनस्पती वापरतात.

नरकचतुर्दशीच्या दिवशी अलक्ष्मीचे पहाटे मर्दन करून आपल्यातील नरकरूपी पापवासनांचा नायनाट व अहंकाराचे उच्चाटन करायचे आहे. तेव्हाच आत्म्यावरील अहंचा पडदा दूर होऊन आत्मज्योत प्रकाशित होईल.

(सूचना : या लेखात दिलेली माहिती ही इतर उपलब्ध माहितीवर आधारित आहे. www. thinktanklive.in याचे समर्थन करत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांशी संपर्क साधा. काल्पनिक कथा, अवैज्ञानिक कृत्ये, कर्मकांड यांचे आम्ही समर्थन करत नाही.)

हेही वाचा

लक्ष्मीपूजन : एक आनंददायी पूजा

दीपावली सणाचा अन्वयार्थ

धनत्रयोदशी का साजरी केली जाते?

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका