
विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अशोका विजयादशमीला अर्थात १४ ऑक्टोबर १९५६ रोजी ब्रह्मदेशाचे पूज्य महास्थवीर चंद्रमणी यांच्या हस्ते नागपूरला सकाळी ९.३० वाजता धम्मदीक्षा घेतली. धम्मदीक्षा घेतल्यावर बाबासाहेबांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. बाबा म्हणाले , ‘माझा नवा जन्म होत आहे…’ तो सुवर्णक्षण मोठा मार्मिक होता … अवर्णनीय होता … तद्नंतर देवप्रिय वली सिन्हा , भिक्खू परमशांती, पञ्ञानंद महाथेरो, भदन्त सद्धातिस्स महाथेरो, एच. संघरत्न महास्थवीर, भिक्खू प्रज्ञानंद आणि भिक्खू सुमेध यांनी बाबासाहेब आणि माईसाहेब आंबेडकर यांच्यावर आशीर्वादाचा वर्षाव केला. लाखो भीमानुयायी या नेत्रदीपक सोहळ्याचे साक्षीदार ठरले. त्या मंगलदिनी जीवनाचे सार्थक झाल्याची प्रचिती त्यांनी अनुभवली. आयुष्यभर ‘जयभीम ‘ ज्यांचा जीव की प्राण ठरला, अशा निवडक शिलेदारांचा परिचय आजच्या तरुणपिढीला दीपस्तंभासारखा मार्गदर्शक असाच आहे.
१. इंदुमती वराळे – धम्मदीक्षा सोहळ्याची सुरुवात गानकोकिळा कु. इंदुमती वराळे हिच्या सुमधूर स्वागतगीताने झाली. इंदुमती ही बाबासाहेबांचे निकटचे सहकारी निपाणी – बेळगावचे बळवंतराव वराळे आणि राधाबाई वराळे यांची लाडकी कन्या होय.
तिच्या गीताचे सादरीकरण इतके प्रभावी आणि अंतःकरणाला स्पर्श करणारे होते की, बाबासाहेबांसारख्या धीर गंभीर महापुरुषाचे डोळे आनंदाने पाणावले. हृदय सद्गदित झाले. यावेळी उपस्थितांच्या मुखातून उत्स्फूर्तपणे एकच घोषणा निनादली. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर करे पुकार, बौद्ध धर्म का करो स्वीकार.’
२. महास्थवीर चंद्रमणी – डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे धम्म दीक्षागुरू. ब्रह्मदेशात १९५४ साली सहावी बौद्ध संगिती भरली होती. त्या संगितीत महास्थवीर चंद्रमणी आणि डॉ. बाबासाहेब या दोन महापुरुषांची भेट झाली. चंद्रमणींच्या मधुर धम्मवाणीने बाबासाहेब भारावले. ‘बौद्धधम्म दीक्षागुरू’ म्हणून निवड करण्याचे निश्चित केले. १९५६ साली बाबासाहेबांना दीक्षा दिल्यानंतर चंद्रमणी यांनी ‘बाबासाहेब या युगातील बुद्ध आहेत’ अशा शब्दात गौरव केला. धम्मदीक्षेनंतर भन्तेजींनी पुनश्च १९५७ साली नागपूरला भेट देऊन बाबासाहेबांच्या महान प्रेरणेला वंदन केले.
मनमाडला २६ जानेवारी १९६० रोजी बाबासाहेबांच्या अर्धकृती पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी चंद्रमणी म्हणाले , ‘मी बाबासाहेबांचा गुरू खरा परंतु माझा शिष्य माझ्यापेक्षाही मोठा होता याचा मला अभिमान वाटतो.
३. दादासाहेब गायकवाड – बाबासाहेब आणि दादासाहेब यांच्यात अतूट प्रेमाचे नाते होते. या गुरू – शिष्य जोडीने अवघा महाराष्ट्रच नव्हे तर भारतभर मानवमुक्ती लढ्याला एक वेगळे वळण दिले. बाबासाहेबांची कर्मभूमी असलेल्या नाशिकच्या पवित्र भूमीत दादासाहेब जन्माला आले. याच नाशिक शहरात काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह, मुखेड सत्याग्रह दादासाहेबांनी जीवाची बाजी लावून यशस्वी केला. बाबासाहेबांचे दादांवर विलक्षण प्रेम होते. बाबासाहेब जेव्हा जेव्हा नाशिकला येत तेव्हा ते दादासाहेबांच्या घरीच उतरत. धम्मदीक्षाप्रसंगी दादासाहेब शांताबाई दाणीसोबत दीक्षाभूमीवर आवर्जून उपस्थित होते. कालांतराने दादासाहेब दीक्षाभूमीवरील स्मारक समितीचे अध्यक्ष बनले.
४. वामनराव गोडबोले- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे निष्ठावान सारथी वामनराव धम्मदीक्षा समारंभाचे सचिव होते. ते केवळ धम्मदीक्षेचे साक्षीदार नव्हे तर बुद्धधम्माची, बाबासाहेबांच्या विचारांची बाग फुलविणारे कुशल कारागीर होते. बाबासाहेबांना पत्राद्वारे धम्मदीक्षेकरिता नागपूर शहराचे नाव वामनरावांनी सुचविले होते.
२३ जुलै १९५६ रोजी लिहिलेल्या पत्रात बाबासाहेबांनी नमूद केले की, ‘दीक्षा समारंभ नागपूरलाच होईल.’ वामनराव शिष्टमंडळासह बाबासाहेबांची भेट घेण्याकरिता दिल्ली निवासस्थानी दाखल झाले. ‘भारतीय बौद्धजन समिती’ मार्फत माता कचेरीजवळील जागा निश्चित केल्याचे सांगितले. दीक्षा समारंभाच्या देखभालीची व इतर व्यवस्था वामनराव पाहात होते. वामनरावांवर बाबासाहेबांचा किती लोभ होता, हे या निमित्ताने पाहायला मिळाले. अखेरच्या श्वासापर्यंत वामनरावांनी ‘भीमज्योती’चा प्रकाश आलोकित केला.
५. पुंडलिकराव मूल : बाबासाहेबांचे एकनिष्ठ अनुयायी. पुंडलिकरावांचा नागपुरात ‘रमापती डेकोरेशन’ नावाने व्यवसाय होता. १४ ऑक्टोबर १९५६ च्या धम्मदीक्षा सोहळ्याची संपूर्ण व्यवस्था त्यांनी सांभाळली होती. १४ एकर जागेत त्यांनी तीन मंडप उभारले. मध्यभागी ४० बाय २० फुटाचा बुद्धकालीन स्मृती दर्शविणारा स्तूप उभारला. याच मध्यवर्ती मंडपात बाबासाहेबांनी धम्मदीक्षा घेतली. सभामंचावर लावण्यात आलेले बाबासाहेबांचे सुंदर छायाचित्र अमरावतीचे चित्रकार गुलाबराव नागदिवे यांनी चितारले होते. पुंडलिकराव हे प्रख्यात पाली भाषेच्या विद्वान, लेखिका सुशीलामूल जाधव यांचे वडील होते. मूल परिवाराचे सत्कार्य दीक्षाभूमीच्या कार्यक्रमाला लाभले.
६. रेवाराम कवाडे- धम्मदीक्षा सोहळ्याचे स्वागत अध्यक्ष होते. नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीची जागा निवडण्याचे श्रेय रेवारामजींना आहे. अत्यंत परिश्रम घेऊन धम्मचक्र प्रवर्तनाचा अपूर्व सोहळा यशस्वी केला. आयुष्यात कधीही पदलालसा , प्रसिद्धीचा हव्यास केला नाही. समाजाच्या उत्कर्षासाठी आपले आयुष्य वेचले. अभ्यासूवृत्ती, निःस्वार्थ समाजसेवा, कार्याविषयी तळमळ, कष्ट सोसण्याची तयारी, खंबीर नेतृत्व, स्नेहभाव आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सर्वकर्ष विचारप्रणालीशी एकनिष्ठता या सद्गुणामुळे कवाडे गुरुजी ‘पंडित’ म्हणून आदरास पात्र ठरले. बाबासाहेबांनी (१९५५) स्वतः ‘भारतीय बौद्ध महासभा’ नागपूरचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड केली होती.
७. प्रल्हाद मेंढे गुरुजी- कर्नलबाग नागपूर निवासी समता सैनिक दलाचे ते शूर शिपाई होते. धम्मचक्र प्रवर्तन दिनी बाबासाहेबांच्या संरक्षणासाठी निवडक सैनिकांचे खास अंगरक्षक पथक तयार करण्यात आले होते. त्याचे नेतृत्व गुरुजींकडे होते. बाबासाहेबांनी त्यांच्याकडे काठीची मागणी केली होती. तेव्हा गुरुजींनी डझनभर काठ्या आणून बाबासाहेबांच्या पुढ्यात ठेवल्या.
त्यातून आर्य अष्टांगिक मार्गाचे प्रतीक म्हणून बाबासाहेबांनी आठ गाठी असलेली काठी आधारासाठी निवडली. परतीच्या प्रवासात बाबासाहेबांनी सोनेगाव विमानतळावर ती काठी गुरुजींना दिली. आयुष्यभर गुरुजींनी बाबासाहेबांची काठी आपल्या निवासस्थानी जिवापाड जतन केली.
८. शामराव जाधव – कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातील सांगवडे गावचे रहिवासी. जाधव केवळ निकटवर्तीच नव्हे तर बाबासाहेबांचा आणि त्यांच्या परिवाराचा प्रत्यक्ष सहवास लाभलेले एक अत्यंत विश्वासू सेवक होते, जाधव म्हणतात , “नागपूर रेल्वे स्टेशनवर बाबांच्या स्वागतासाठी त्या दिवशी हजारो लोक उपस्थित होते. विशेष म्हणजे अ . भा . बुद्धिस्ट महासभा , कलकत्याचे जनरल सेक्रेटरी वलीसिन्हा बुद्धाची मूर्ती बाबासाहेबांना भेट देण्यासाठी उपस्थित होते. बाबासाहेबांच्या बतीने ती बुद्धमूर्ती मी स्वीकारली. धम्मदीक्षा सोहळ्याप्रसंगी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान केलेले बाबासाहेब तेज : पुंज दिसत होते. ते दृश्य पाहून अर्धा तास टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. धर्मांतर ही जगातील या शतकातील एक अभूतपूर्व घटना होती.”
९. बाबू हरिदासजी आवळे – झुंजार रिपब्लिकन नेते बाबू आवळे यांनी धम्मदीक्षा घेतल्यानंतर नागपुरात अनेक सभा संमेलने गाजवून चळवळीचा रथ पुढे नेला. त्यामुळे ते ‘ कर्मवीर ‘ या पदवीला शोभून दिसतात. नागपुर हायकोर्टाने ‘धम्मदीक्षा सोहळा’ अवैध ठरविला. त्यावेळी बाबूजींनी प्राणाची पर्वा न करता धम्मदीक्षेचे महत्त्व जनतेला पटवून दिले. आमदार असताना दीक्षाभूमीवर १३ एप्रिल १९५७ या रात्री सहकाऱ्यांच्या मदतीने स्तंभाची उभारणी करून बुद्धमूर्ती बसविली. बाबासाहेबांचा अर्धकृती पुतळा बसविला. एकदा बाबूजी बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर कळवळून म्हणाले होते, ‘बाबा मी तुमच्या हातून बौद्ध धम्माची दीक्षा घेतल्यापासून कधी दारू प्यालो नाही. व्यभिचार केला नाही. मोहाला व भीतीला बळी पडून कोणतेही खोटे कर्म केले नाही.’
१०. आचार्य मो. वा. दोंदे – डॉ . बाबासाहेब आंबेडकरांच्या अनेक प्रामाणिक सहकाऱ्यांपैकी आचार्य दोंदे एक होते. ‘ पीपल्स एज्युकेशन सोसायटी’चे विश्वस्त होते. वेळोवेळी बाबासाहेबांवर स्तुती सुमनांचा वर्षाव केला. बाबासाहेबांच्या राजगृही २५००० ग्रंथाची सूची तयार करण्यास अविश्रांत परिश्रम घेतले.
नागपुरात बाबासाहेबांच्या हस्ते धम्मदीक्षा घेतली. बाबासाहेबांना अभिनंदनपर पत्र लिहिले,’ परमपूज्य डॉक्टर साहेब सादर प्रणाम. आपण पुन्हा इतिहास घडविला. आपण केलेला बुद्ध धर्माचा स्वीकार ही माझ्या मते जागतिक महत्त्वाची घटना आहे.’
११. म. भि. चिटणीस- औरंगाबादच्या मिलिंद महाविद्यालयात मराठी भाषेचे प्राध्यापक होते. मराठी वाङ्मयीन साहित्याचे गाढे अभ्यासक आणि संशोधक म्हणून त्यांची ख्याती होती. अशा अभ्यासू , ज्ञानवंताने दीक्षाभूमीवर बाबासाहेबांच्या हस्ते बुद्धधम्माची दीक्षा घेतली सुरुवातीपासूनच चिटणीसांचा बौद्ध धर्माकडे ओढा फार … जणू ते निस्सीम बुद्ध उपासक … बौद्ध धम्माची शिकवण तसेच वेरूळ व अजंठा येथील शिल्पकलेने ते कमालीचे भारावले होते. ‘युगयात्रा’ त्यांची अजरामर कलाकृती. या नाटकाचा प्रयोग बाबासाहेबांच्या उपस्थितीत १९५५ साली मिलिंद महाविद्यालयात झाला. तीच ‘युगयात्रा’ १५ ऑक्टोबर १९५६ रोजी दीक्षाभूमीवर लाखो जनसमुदायांनी प्रत्यक्ष डोळयांनी पाहिली. चिटणीसांनी आपली जीवनधारा आंबेडकरमय करून शेवटपर्यंत मोलाची साथ दिली. ते ‘आंबेडकरी तत्त्वज्ञानाचे महान भाष्यकार ‘ म्हणून ओळखले जातात.
१२. भय्यासाहेब आंबेडकर – यशवंतराव उर्फ भय्यासाहेब आंबेडकर हे बाबासाहेबांचे सुपुत्र होते. आपल्या थोर पित्याचे कार्य शिरावर घेऊन भय्यासाहेबांनी सार्वजनिक कार्यास (१९४२) सुरुवात केली . ‘जनता’ , ‘प्रबुद्ध भारत’ या पत्रकातून दीन – दलितांवर होणाऱ्या अन्याय – अत्याचारांना वाचा फोडली.
भारतीय बौद्ध महासभेचे ते अध्यक्ष होते. देशभर दौरे करून जन्मदात्याच्या विचारांचा निष्ठेने प्रचार – प्रसार केला. दीक्षा समारंभ, धम्म परिषदांचे आयोजन करून धम्मचळवळ गतिमान केली. स्वतः पंडित कश्यप यांच्या हस्ते श्रामणेराची दीक्षा घेतली. पित्याच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त महू ते मुंबई अशी दोन – अडीच हजार मैलांची ‘ भीमज्योत ‘ काढली. मिळालेल्या धम्मदानातून मुंबईच्या चैत्यभूमीचे बांधकाम केले. त्यामुळे त्यांना ‘चैत्यभूमीचे प्रणेते’ आणि ‘सूर्यपुत्र’ म्हटले जाते.
१३. नानकचंद रत्तू – बाबासाहेबांचे खासगी सचिव म्हणून सोळा वर्षे सेवा केली. रत्तू यांनी नागपुरात (११ / १० / १९५६ ते १८ / १० / १९५६) बाबासाहेबांची सावलीप्रमाणे सोबत केली. बाबासाहेबांची प्रकृती बरी नव्हती तेव्हा रत्तू यांनी खांदा देऊन बाबासाहेबांना हळुवारपणे स्टेजवर आणले होते. त्यांनी अनेक ग्रंथाचे लेखन केले. डॉ . बाबासाहेब आंबेडकर अनुभव आणि आठवणी हा ग्रंथ संग्रही ठेवण्याजोगा आहे.
बाबासाहेबांच्या दैनंदिन वापरातील जवळपास ४०० वस्तू रत्तू यांनी वामनराव गोडबोले यांच्या चिचोली शांतीवन प्रकल्पाला उदार अंत : करणाने दान दिल्या, आज त्या जागेवर भव्य दिव्य ‘ डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल म्युझियम अॅण्ड सेमिनरी ‘ दिमाखाने उभी आहे .
१४. ससाळेकर – बादशहा साळवी – बाबासाहेबांचे अत्यंत विश्वासू अंगरक्षक होते. बाबासाहेबांचा त्यांना तब्बल २८ वर्षे सहवास लाभला. अनेकदा बाबासाहेबांवर दगडफेक आणि हल्ल्याचे प्रसंग ओढवले. तेव्हा खऱ्या अर्थाने ससाळेकर – साळवी कसोटीला उतरले. समता सैनिक दलाची घटना व ध्वज तयार करण्याचे श्रेय ससाळेकर यांनाच जाते. त्यांनी स्वतंत्र मजूर पक्षाशी मिळताजुळता ७६ झेंड्यांचा एक ध्वज एका चित्रकाराकडून तयार करून बाबासाहेबांना अर्पण केला होता. ध्वजावर बाबासाहेबांची स्वाक्षरी आहे.
बादशहा साळवी फाउंटन एरियातील ‘ दादा ‘ होते. धम्मचक्र प्रवर्तन सोहळ्यात दोघांचाही उपस्थिती होती. धम्मदीक्षेनंतर तब्बल ३१ वर्षानंतर पुनश्चः ते नागपुरात आले होते. आंबेडकरी समाजाची झालेली वाताहात पाहून त्यांचे डोळे पाणावले होते. नागपुरातील ही त्यांची धम्मदीक्षेनंतरची पहिली आणि शेवटचीच भेट ठरली.
– मिलिंद मानकर, नागपूर मो . ८०८०३३५०९६
हेही वाचा
पाहा खास व्हिडिओ