‘द वल्ड बिफोर हर’ : स्त्रीवादी रसग्रण, आकलन आणि चिकित्सा

कुणाल रामटेके यांचा अभ्यासपूर्ण लेख

Spread the love

भारतीय सामाजिक परिप्रेक्ष्याची जडण-घडण हीच मुळी ब्राम्हण्यवादी पितृसत्ता विरुद्ध विवेकवाद अशी आहे. हा महान सांस्कृतिक संघर्ष अगदी भारतीय स्वातंत्र्य आणि घटनानिर्मिती अथवा उपयोजनांच्या नंतरच्या काळातही प्रकर्षाने जाणवतो. किंबहुना याच मुद्द्यांवर आपल्या कथित राष्ट्रवादाची उभारणी करण्याचा प्रयत्न उपरोक्त विचारधारा मानणारे वर्ग समूह सातत्याने करीत असतात. अर्थात, ‘स्त्री’ हा दोन्ही विचारधारांचा वाहक वर्ग असल्याने त्यांच्यावरील कथित संस्कारांवर कटाक्ष असतो. मुळात, समकालात हा संघर्ष अधिक प्रगाढ होत असतांनाच त्याचे केंद्र ‘स्त्री’ वर्ग आहे. विषयाचा हाच धागा घेऊन अनुभवजन्य (empirical) उदाहरणांच्या सहाय्याने सुप्रसिद्ध कॅनेडियन लेखिका आणि माहितीपटकार निशा पहुजा यांनी आपल्या ‘द वल्ड बिफोर हर’ या ‘डॉक्युमेंटरी’च्या माध्यमातून मांडणी केली आहे.

सन २०१२ मध्ये रिलीज झालेल्या अत्यंत महत्त्वाच्या या डॉक्युमेंट्रीची चिकित्सा, आकलन आणि रसग्रहण भारतीय ब्राम्हण्यवादी पितृसत्ता आणि संकुचित राष्ट्रवादाच्या संदर्भात करणे महत्त्वाचे ठरते. सामाजिक विकास आणि वाटचालीत माध्यमांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. मात्र, अलीकडच्या भारतासारख्या शोषणग्रस्थ देशात प्रस्थापित माध्यमे नेहमीच सत्ता आणि व्यवस्थेच्या बाजूने भूमिका घेत असल्याचे दिसून येते. या माध्यमात प्रतिगामी विचार आणि त्यांच्या प्रतिक्रांतीवादी क्रियाकल्पांविषयीचे चित्रण अत्यंत दुर्मिळ असते. अगदी उदाहरणच घ्यायचे झाले तर आजही ‘दुर्गा वाहिनी’सारख्या विश्व हिंदू परिषद किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या संघटनांच्या मुशीतून जन्मास आलेल्या संघटनांविषयी अत्यंत कमी माहिती मिळते. त्याचे कारण अशा संघटनांची कार्यपद्धती आहे. अत्यंत बंदिस्त स्वरूपाच्या वातावरणात या संघटना कार्यरत असतात. त्यांच्या छावण्या, शिबिरे यांमध्ये सामान्य माणसाला किंवा मीडियाला प्रवेश नसतो. आणि अर्थातच हे सारे चित्रित करणे ही सुद्धा एक मोठी रिस्क असते. असो.

‘द वर्ल्ड बिफोर हर’ या माहितीपटाच्या माध्यमातून असाच प्रयत्न करण्यात आला आहे. माहितीपटाच्या दिग्दर्शक निशा पाहूजा यांनी यासाठी प्रचंड मोठे धाडस केले आहे. अगदी दुर्गा वाहिनीच्या एका छावणीमध्ये जाऊन तरुण मुलींचे केले जाणारे ‘ब्रेन वॉशिंग’ त्यांनी पडद्यावर चितारले आहे. सन २०११ साली करण्यात आलेले हे शूटिंग भारतातील आधुनिक आणि मुक्त होऊ बघणारी स्त्री आणि सातत्याने बंदिस्तीकरणासाठी कथित ‘सेवा-सुरक्षा-संस्कार’चे बाळकडू पाजून ‘ब्रेनवॉश’ केली जाणारी स्त्री यांच्यातील विरोधाभासाची उदाहरणे, त्यांची जडण-घडण हे सारे आपल्यापुढे मांडत जाते.

भारतातील बाबरी मशीद विध्वंस आणि राम मंदिर निर्मितीच्या पार्श्वभूमीवर उदयास आलेल्या नव हिदुत्वाच्या लाटेत स्त्रियांची भूमिका सुनिश्चित करण्यासाठी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघात महिलांना कोणत्याही प्रकारे सहभाग नसल्याने ती उणीव भरून काढण्यासाठी बजरंग दलाच्या धर्तीवर एखाद्या नागरी लढाऊ संघटनेची गरज प्रतीगाम्यांना वाटायला लागली. त्यातूनच १९९१ साली साध्वी ऋतुंभरा यांच्या पुढाकारातून ‘दुर्गा वाहिनी’ ही संघटना जन्मास आली. उपरोक्त म्हटल्याप्रमाणे ‘सेवा-सुरक्षा-संस्कार’ हे या संघटनेचे ब्रीद आहे.


माहितीपटात दाखाविल्याप्रमाणे जी केवळ आपल्या धर्मासाठी कुणाचाही खून करायलाही या मुली मागेपुढे बघणार नाहीत अशी कट्टरतेची शिकवण या शिबिरांमधून दिली जाते. मुळात, अवघ्या दहा दिवसात ‘जीन्स घालणारी’ त्यांच्या शिकवणुकीला प्रतिवाद आणि प्रतिरोध करणारी मुलगी सुद्धा मरण्या-मारण्याची भाषा बोलायला लागते. आणि यातूनच या संघटना नेमके कोणत्या ‘राष्ट्रउभारणी’चे काम करीत आहेत हे आपल्या लक्षात येयील. अर्थात माहितीपट कोणत्याही मुद्द्यांवर ‘स्वयंभाष्य’ करीत नसला तरीही दोन्ही क्षेत्रे आणि विचारांमधील पराकोटीची तफावत आपल्या नजरेत आल्यावाचून राहत नाही. मात्र काहीही झाले तरी माहितीपटात दर्शवल्याप्रमाणे ‘प्राची’सारख्या अनेक मुली केवळ ‘ब्रेनवॉश’च्या शिकार आहेत. त्यांना कुणाचा ‘खून’ करण्याची मनातून इच्छा आहेच असेही नाही. एका संकुचित अजेंड्याच्या त्या बळी आहेत. आणि सुरुवातीच्या काळापासूनच स्त्रिया या व्यवस्थेच्या ‘वाहक’ म्हणून अशाच बळी ठरत आल्या आहेत. ज्यावेळी प्राचीला दुर्गा वाहिनीची ती ‘छावणी आतंकी छावणी आहे का ?’ असे विचारले जाते त्यावळी “आमच्याकडे ‘एके-४७’ कुठाय ?” असा प्रतिप्रश्न ती करते. मुळात, ज्या व्यवस्थेसाठी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे आपण काम करीत असतो त्या व्यवस्थेद्वारे होणार आपल्याच शोषणाविषयीची अनभिज्ञता मात्र अत्यंत घातक असते हे निश्चितपणे मान्य करावे लागेल. खरे तर, ती किंवा तिचे वडील या व्यवस्थेचे असेच बळी ठरलेले ‘वाहक’ आहेत. विवेकवाद आणि सामाजिकरणाच्या प्रक्रियेतूनच त्यांना बाहेर काढता येणे शक्य आहे. त्यासाठी आपल्यातली ब्राम्हण्यवादी पुरुषसत्ताक मानसिकता बदलवण्याची तयारी आपणास ठेवावी लागेल.

माहितीपटाच्या दुसरीकडचे जग मात्र उपरोक्त दुर्गा वाहिनीच्या छावणीपेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. अर्थात कितीही कथित स्वातंत्र असले तरीही पुरुषसत्ता आपले अस्तित्व या ना त्या रुपात राखण्याचा प्रयत्न करत असतेच. मग ‘फॅशन’चे जग त्यालां अपवाद असणार तरी कसे. मुळात, कोणत्याही क्षेत्रात स्त्रिया आणि उपेक्षितांचे शोषण हे होणारच. मात्र या शोषणाचे फॉर्म्स बदलत असतात. या माहितीपटाच्या माध्यमातून ‘फॅशन’चे क्षेत्र आणि त्यातील महिलांच्या जीवनावरही प्रकाश टाकण्याचा प्रयत्न निशा पहुजा यांनी केला आहे. मुळात उपरोक्त दोन्ही विषय परस्पर भिन्न असले तरीही स्त्रीयांसमोरील आव्हाने, त्यांचे होणारे शोषण यात एकसूत्रता असल्याचे जाणवते. वेगवेगळ्या वर्ग आणि कौटुंबिक पार्श्वभूमीतून आलेल्या महिलांचा स्वतःच्या अस्तित्वासाठी चाललेला संघर्ष यात चितारण्याचा प्रयत्न यात झाला आहे.

– कुणाल रामटेके
(संपादक – थिंक टँक लाईव्ह)
ramtekekunal91@gmail.com

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका