देवराईवरील हल्ल्याचा छडा लावणार : डॉ. बाबासाहेब देशमुख
घटनास्थळी दिली भेट; शेकाप पूर्ण पाठीशी
भाई गणपतराव देशमुख यांनी तालुक्याला विकासाची दिशा दिली. त्यांच्या आठवणी चिरंतन राहाव्यात यासाठी नानासाहेबांनी स्वतःची दोन एकर जमीन देवून, वृक्ष लागवड केली. हे फार मोठे काम आहे. पण काही विघ्नसंतोषी लोक मुद्दामहून त्रास देत आहेत. पण याची शेकाप गांभीर्याने दखल घेत आहे. याचा छडा हा शेकापचे बहाद्दर कार्यकर्तेच लावणार. नानासाहेबांच्या पाठीशी राज्यभरातील कार्यकर्त्यांचा लवाजमा आहे. अशा भ्याड हल्ल्याला आम्ही भीक घालत नाही, असा विश्वास डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी दिला.
सांगोला / संदीप करांडे
राज्य सरकार वृक्ष लागवड आणि योजनांसाठी कोट्यवधी रूपये खर्च करते. सध्या “माझी वसुंधरा” हे अभियानही सुरूच आहे. पण डिकसळ गावामध्ये वसुंधरेचे रक्षक करण्याऐवजी काहीजण मुद्दामहून भक्षक बनत आहेत. यांनी भाईंच्या देवराईचे व वनपरिक्षेत्राचेही बॅनर फाडले आहेत. ही अतिशय निंदनीय घटना आहे. या घटनेचा छडा शेकाप लावल्याशिवाय गप्प बसणार नसल्याचे पुरोगामी युवक संघटनेचे राज्य अध्यक्ष भाई डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी सांगितले.
सांगोला तालुक्यातील डिकसळ येथील भाईंच्या देवराईमधील बॅनर फाडल्याने, तालुकाभरातून निषेध व्यक्त केला जात होता. ही घटना बुधवारी मध्यरात्रीच्या दरम्यान घडली होती. यावेळी तालुक्यातील अनेक मान्यवरांनी भेट देत या घटनेचा निषेध नोंदविला.
आज स्वर्गीय आ. भाई गणपतराव देशमुख यांचे नातू भाई डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी भेट दिली आणि निषेध व्यक्त केला. ते पुढे म्हणाले की, स्व. आबासाहेब यांनी इतिहास घडविला. त्यांचा आठवणी अजरामर राहाव्यात म्हणून नानासाहेबांनी स्वतःची दोन एकर जमीन देवून, वृक्ष लागवड केली. हे फार मोठे काम आहे. पण काही विघ्नसंतोषी लोक मुद्दामहून त्रास देत आहेत. पण याची शेकाप गांभीर्याने दखल घेत आहे. याचा छडा हा शेकापचे बहाद्दर कार्यकर्तेच लावणार. नानासाहेबांच्या पाठीशी राज्यभरातील कार्यकर्त्यांचा लवाजमा आहे. अशा भ्याड हल्ल्याला आम्ही भीक घालत नाही.
बुधवारी झाला होता हल्ला
बुधवारी रात्री काही समाजकंटकानी बॅनर फाडले. तेथे विष्ठा टाकली. हा निंदनीय प्रकार उघडकीस येताच तालुक्यात खळबळ उडाली. पोलिसांनी तातडीने दखल घेत घटनास्थळी भेट दिली होती.
राज्यातील आदर्शवत प्रकल्प
भाईंची देवराई हा राज्यातील एकमेव आदर्शवत प्रकल्प आहे. या प्रकल्पात शेकडो दुर्मिळ वनौषधी आहेत. ही सर्व झाडे जोमाने डोलू लागली आहेत. असे असताना असा हल्ला करणे अत्यंत चुकीचे आहे.
यावेळी बंडू वाघमोडे, मधुकर गोरड, प्रा. राणोबा करांडे, तुकाराम गोरड, काकासाहेब करांडे, अप्पा भूसनर, सोपान करांडे, चेअरमन प्रकाश भूसनर, रावसाहेब निळे, दिनेश भूसनर, डॉ. खरात, रोहित करताडे, बाबा उजनीकर, अण्णासो गेजगे, हरी गेजगे यांच्यासह युवकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.