वाढदिवस विशेष लेख/ नाना हालंगडे
आजही लोकशाहीप्रधान देशात सामान्य जनता आपल्या नेत्यावर प्रत्येकवेळी विश्वास ठेवते. अर्थात हा विश्वास काही नेते सार्थ ठरवतात, तर काही नेते व्यर्थ ठरवतात. लोकांच्या विश्वासास सदैव जागणारा, आणि सामान्य जनतेसाठी प्रसंगी कशाचेही मोल देण्याची तयारी असणारा राजकीय नेता म्हणून ज्यांनी केवळ सोलापूर जिल्हाच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रात नावलौकिक मिळवला अशाच शब्दाला जागणाऱ्या व सामान्य जनतेचा विश्वास सार्थ ठरवणार्या राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष मा.आम. दिपकआबा साळुंखे पाटील या लोकनेत्याचा आज वाढदिवस.
वाढदिवसानिमित्त आबांच्या व्यक्तिमत्वातील काही निवडक पैलूवर प्रकाश टाकण्याचा केलेला छोटासा प्रयत्न..
कार्यतपस्वी आमदार स्वर्गीय काकासाहेब साळुंखे पाटील व ह.भ.प. शारदादेवी साळुंखे-पाटील यांच्या पोटी जन्म घेतलेल्या दिपकआबा साळुंखे-पाटील यांना वडिलांचा सहवास फार काळ लाभला नाही. अवघ्या 9 वर्षांचे असताना वडील आमदार काकासाहेब साळुंखे-पाटील यांचे अकाली निधन झाले.1972 रोजी काकासाहेबांच्या निधनानंतर कुटुंबातील एकही व्यक्ती राजकारणात सक्रिय नसताना आपले शिक्षण पूर्ण करून दिपकआबा साळुंखे-पाटील यांनी वडिलांच्या निधनानंतर तब्बल पंधरा वर्षांनी राजकारणात प्रवेश केला.
यावेळी एका विराट सभेला सामोरे जाताना ह.भ.प. शारदादेवी साळुंखे-पाटील यांनी जनतेला संबोधित करताना आजपर्यंत मी मायेच्या पदराआड जपून ठेवलेला दिपक आजपासून तुम्हाला बहाल करीत आहे असे जाहीर केले. त्या दिवसापासून आजअखेर राजकारणात शरदचंद्र पवार हेच आयडॉल म्हणून त्यांच्या विचारावर दिपकआबा साळुंखे-पाटील यांनी काम सुरू केले. तेव्हापासून ते आजपर्यंत दिपकआबांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.
साखर कारखान्याचे चेअरमन
सांगोला सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, विधान परिषदेचे आमदार, पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या लोकसभा निवडणुकीचे प्रचार प्रमुख, दरम्यानच्याच काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष पद, बहिण जयमालाताई गायकवाड यांना सोलापूर जिल्हा परिषदचे अध्यक्षपद व सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्याचे उपाध्यक्ष यासारखी अनेक महत्त्वाची पदे आपल्या कर्तृत्वाने मिळवून दीपक जिल्ह्याच्या राजकारणात आपली वेगळीच ओळख निर्माण केली. जिल्ह्याच्या राजकारणात एवढी उंची गाठूनही आबांनी कधीच आपल्या डोक्यात सत्तेची, पदाची हवा जाऊ दिली नाही हे विशेष.
नेहमी जमिनीवर पाय आणि तोंडात साखर ठेवून समोर येईल त्या व्यक्तीच्या कामाला प्राधान्य देऊन सामान्य लोकांच्या अडचणी सोडविण्यासाठी नेहमीच आबांनी तत्परता दाखवली आहे. सांगोला तालुक्यात तर दिपकआबा ठरवतील तोच आमदार म्हणून निवडून येतो हे स्वतः आबांनी जाहीर व्यासपीठावर सांगून ते सिद्ध करून दाखवलं आहे. काम करण्याची विशिष्ट कार्यशैली, अलौकिक कर्तत्व, आणि राजकारणातील सकारात्मक दृष्टिकोन यामुळेच जिल्ह्याच्या राजकारणात आबांनी नेता म्हणून आपले वेगळेपण सिद्ध केले आहेच, शिवाय एक संवेदनशील माणूस म्हणूनही आबा नेहमीच ग्रेट राहिले आहेत.
राजकारणापलीकडचा माणूस
प्रसिद्धीच्या झोतापासून नेहमी दूर राहत कोण कुठल्या जातीचा, धर्माचा, पक्षाचा, विचारांचा, नेत्याचा समर्थक किंवा विरोधक आहे. हे न पाहता नेहमीच समोर येईल त्या व्यक्तीला आपल्या परीने शक्य होईल ती मदत करण्यात आबांनी कधीच काटकसर केली नाही.
कित्येकवेळा आबांच्या जवळील कार्यकर्ते आबांना तो आपल्या पार्टीचा नाही, तो तुमचा विरोधक आहे असे सांगताना मी अनेकवेळा जवळून किंवा समोरून पाहिले आहे. तरीही आबांनी कधीच चांगुलपणा सोडला नाही. उलट आपल्याच कार्यकर्त्यांना राजकारण म्हणजे सगळं काही नसतं राजकारणापलीकडे आपण एक माणूस आहोत आणि माणूस म्हणून आपण सामाजिक बांधिलकी सदैव जपली पाहिजे असे सांगून आपले कार्य निरंतर सुरू ठेवले आहे.
उदार अंत:करण
अनेकांना वेळोवेळी दवाखान्यासाठी, मुलीच्या लग्नासाठी, सणासुदीसाठी, मुलाच्या शिक्षणासाठी, व्यवसायासाठी यासह इतर गोष्टीत आबांनी भरल्या हातांनी मदत करतांना आपण नेहमी पाहतो.
अगदी निवडणुकीच्या धामधुमीत मुलगा मला सांभाळत नाही. अशी आपल्या मुलांची तक्रार आबांकडे घेऊन आलेल्या मातेसमान वृद्ध मातेला तुम्ही काळजी करु नका, मला माझी आई आणि तुम्ही काही वेगळे नाही. तुमच्या मुलाने तुम्हाला यापुढे नाही सांभाळले तर माझ्याकडे हक्काने या आणि माझ्या वाड्यात (घरात) आईप्रमाणे रहा अशा शब्दात आधार देणारा दिपकआबांशिवाय दुसरा नेता असूच शकत नाही.
आणखी एका प्रसंगात जी महिला आबांना ओळखतही नाही पण आपली व्यथा जिला आबांसमोर मांडायची आहे त्या वृद्ध महिलेला आबांनी चटकन ओळखत जवळ बोलावून सांगितलं घाबरू नका, मी तुम्हाला ओळखतोय, तुम्ही माझ्या सहकार्याची बहीण आहात, माझे सहकार्यांसोबत नाते परिवाराप्रमाणे आहे. तुमची अडचण ही आमच्या परिवाराची अडचण आहे. तुमच्या अडी-अडचणीच्या प्रसंगात संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि साळुंखे-पाटील कुटुंबीय तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील असा ठाम विश्वास देऊन आलेल्या वृद्ध महिलेस आधार दिला.
आपल्या वडिलांसोबत काम केलेला व मृत्यूशय्येवर असलेल्या नाभिक समाजातील एक पापामियां नामक वृद्ध व्यक्तीला त्यांच्या वस्तीवर जाऊन आबांनी त्यांची विचारपूस केली व त्यांना राजकारणापलीकडे नेहमीच तुम्ही साळुंखे-पाटील कुटुंबीयांसोबत काम केले आहे. म्हणून त्या कुटुंबाचा एक सदस्य या नात्याने नेहमीच आम्ही सुखदुःखात तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहू असा विश्वास दिला.
आबांच्या या भूमिकेमुळे आणि मायेच्या या अनोख्या ओलाव्यामुळे अनेक दिवसांपासून बोलू न शकणार्या पापामियांच्या तोंडातून आपोआप शब्द फुटू लागले. आणि डोळ्याला अश्रूच्या धारा लागल्या. ज्यांनी हा प्रसंग जवळून पाहिला, किंवा अनुभवला, त्यांनाही यावेळी अश्रू आवरता आले नाहीत. यावरूनच दिपकआबा साळुंखे पाटील माणूस म्हणूनही किती ग्रेट आहेत याची प्रचिती येऊ शकते.
कर्तृत्त्वशील नेता
सध्याच्या भ्रष्टाचाराने आणि किळसवाण्या आरोप-प्रत्यारोपांनी बरबटलेल्या राजकारणात अभावानेच आढळणार्या दिपकआबा साळुंखे-पाटील यांच्यासारख्या कृतिशील आणि संवेदनशील लोकनेत्यासोबत काम करण्याची संधी मिळाली अनेक कार्यकर्त्यांना मिळाली. लोकांच्या हितार्थ दिपकआबा साळुंखे पाटील यांना असेच कार्य निरंतर करण्यासाठी उदंड आयुष्य लाभो ही प्रार्थना करतो.
माजी आ. कै. काकासाहेब साळुंखे-पाटील यांचा समृद्ध वारसा लाभलेला, जनसेवेचा अखंड वसा घेऊन आपले संपूर्ण जीवनच समाजसेवेसाठी अर्पण केलेला, व खर्या अर्थाने शरदचंद्रजी पवार यांच्या क्रांतिकारी विचाराने प्रज्वलित झालेले लोकप्रिय नेते दीपकआबांना वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा…!