दिसलं लेकरू की पकड दंड!
सांगोला तालुक्यात 20 हजार बालकांना लस
सांगोला / नाना हालंगडे
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर 1 ते 15 वयोगटातील बालकांसाठी जापनीज मेंदूज्वराचे तर 15 ते 18 वयोगटासाठी कोविड लसीकरण सुरू केले आहे. त्याअनुषंगाने सांगोला तालुक्यात 3 जानेवारी पासून सुरुवात झाली आहे. काल 7 जानेवारीपर्यंत 20 हजार 217 लसींची टोचणी करण्यात आलेले आहे.
सांगोला तालुक्यात कोरोना लसीकरणाची मोहीम मोठ्या प्रमाणात सुरू असून,18 वर्षांवरील लसीकरणही 75 टक्केच्या पुढे आहे. अशातच आत्ता तिसरी लाटही सुरू झालेली आहे. केंद्र सरकारने 15 वर्षांवरील युवकासाठी तर 1 ते 15 वर्षांवरील बालकांसाठी मेंदूज्वराची लस टोचणी सुरू केली आहे. यातील बालकांची संख्या 89 हजार 792 तर 15 ते 18 वर्षांवरील युवकांची संख्या 56 हजार 145 इतकी आहे. या सर्वांसाठी ही मोहीम सुरू केली आहे.
सांगोला तालुक्यात ही मोहीम 3 जानेवारी पासून सुरू झाली असून, अजून तीन आठवडे ही चालणार आहे.
सांगोला तालुक्यात 1ते 15 वयोगटातील सुमारे 89 हजार 792 बालकांना जापनीज मेंदूज्वर प्रतिबंधात्मक लस देण्यात येणार आहे. ही मोहीम शहरासह संपूर्ण तालुकाभर राबविली गेली आहे.
यामध्ये सर्व शाळा,हायस्कूल,अंगणवाडी केंद्रे,निमशासकीय शाळा आदीमध्ये हे लसीकरण सुरू आहे. यासाठी तालुक्यात 6 आरोग्यवर्धीनी केंद्रासह 39 उपकेंद्रातील सर्वच कर्मचारी यामध्ये सहभागी झाले असून,102 गावांमध्ये ही मोहीम सुरू आहे. यात 1 ते 5 वयोगट, 5 ते 10 वयोगट व 10 ते 15 वयोगट असे टप्पे केले आहेत. काल शुक्रवारी तालुक्यातील अनेक जिल्हा परिषदेच्या शाळा व खाजगी शाळांमध्ये हे लसीकरण पार पडले. शाळांमध्ये एकच गोंधळ, मुलांची रडारड पहावयास मिळत होती.
अनेक ठिकाणी मुले या लसीकरणामुळे आजारीही पडली. पण तालुक्यात 15 वर्षांवरील मुलांसाठी मात्र कोविड ची लस मिळू शकली नाही. डासांपासून होणाऱ्या जापनीज मेंदू जवरापासून भविष्यात बालकांचे मुर्तू होऊ नयेत,यासाठी जापनीज एन्सेफलेटीस प्रतिबंधात्मक लसीकरण केले जात आहे. जापनीज मेंदूज्वरामुळे मुलांच्या मेंदूवर विपरीत परिणाम होतो.
हे प्रतिबंधात्मक लसीकरण पुढच्या पिढीसाठी कवच कुंडल आहे. तीन जानेवारीपासून सुरू झालेल्या लसीकरण मोहिमेत 1 ते 15 वर्षे वयोगटातील बालकांचे लसीकरण करून घेणे महत्त्वाचे आहे. महाराष्ट्रातील चार जिल्ह्यात हा आजार आढळल्याने सोलापूर जिल्ह्याचा देखील यामध्ये समावेश करण्यात आला आहे. आता सध्या हे लसीकरण शाळांमध्ये सुरू आहे ,त्यानंतर पुढच्या आठोवड्यात शाळेत न जाणाऱ्या मुलांचे लसीकरण केले जाणार आहे.
शाळा असुरक्षित
सांगोला तालुक्यातील ग्रामीण भागात विदारक चित्र पाहावयास मिळत आहे. शिक्षकच काय पण मुलांच्या तोंडावर देखील मास्क पहावयास मिळत नाही. पिण्याच्या पाण्याची सुविधा ही तशीच आहे. मुले एकत्र बसूनच दंगामस्ती, शिक्षण घेत आहेत. याबाबत वरिष्ठ अधिकारी, वा शाळा व्यवथापनचे अध्यक्ष,पालकवर्ग लक्ष देत नाहीत. येथे हा कोरोना संसर्ग वाढून,तिसरी लाट मोठ्या प्रमाणात फोफवणार आहे.