दसरा मेळाव्यात शहाजीबापूंची तोफ धडाडणार
थिंक टँक / डॉ. नाना हालंगडे
“काय झाडी… काय डोंगार” या डायलॉगमुळे राज्यभर प्रसिद्ध असलेले सांगोल्याचे आमदार ॲड. शहाजीबापू पाटील यांची तोफ उद्या मुंबईत होणाऱ्या शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात धडाडणार आहे. आ.शहाजीबापू पाटील यांचा फोटो असलेले पोस्टर शिंदे गटाकडून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले आहे. त्यामुळे आ.शहाजीबापू पाटील हेच या मेळाव्याचे आकर्षण असतील, असा कयास बांधला जात आहे.
सांगोला तालुक्यातील युवा हृदयसम्राट डॉ.अनिकेत (भैय्या) चंद्रकांत देशमुख
१९९५ मध्ये शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई गणपतराव देशमुख यांना पराभूत करून आ.शहाजीबापू पाटील हे प्रथमच विधानसभेत गेले. ते काँग्रेसकडून निवडून आले होते. मात्र त्याच वर्षी काँग्रेसची सत्ता गेली आणि शिवसेना – भाजप युतीचे सरकार आले. मात्र अशाही परिस्थितीत आ.शहाजीबापू पाटील यांनी पाण्याच्या योजनेसाठी निधी खेचून आणला. त्याची ते आजही चर्चा करताना दिसतात.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करून वेगळा गट स्थापन केला आणि ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. या सर्व वाटचालीत अचानक आ.शहाजीबापू पाटील हे आपल्या रांगड्या डायलॉगमुळे चांगलेच चर्चेत आले. आता तर ते शिंदे गटाच्या प्रत्येक सभेत स्टार लीडर म्हणून पुढे असतात. त्यांच्या खुमासदार भाषणामुळे उपस्थित जनता खळखळून हसते. त्यांची वाढती लोकप्रियता बघून त्यांना प्रत्येक सभेत आमंत्रित केले जाते.
त्यांच्या सांगोला मतदार संघासह राज्यभरात त्यांना सभेसाठी मोठी मागणी आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांचा “काय झाडी.. काय डोंगार..” हा डायलॉग. आ.शहाजीबापू पाटील हे आपल्या प्रत्येक भाषणात हा डायलॉग आवर्जून म्हणतात. हा डायलॉग ऐकून उपस्थितांचे कान तृप्त होतात की काय अशी स्थिती आहे.
दसरा मेळाव्यात धडाडणार तोफ
आ.शहाजीबापू पाटील यांना मुंबईत उद्या शुक्रवारी होत असलेल्या दसरा मेळाव्यात आमंत्रित करण्यात आले आहे. त्यांचा फोटो असलेले पोस्टर व्हायरल केले जात आहे.
मागील काही दिवसांपासून आ.शहाजीबापू पाटील यांचे प्रत्येक स्टेटमेंट प्रसार माध्यमांकडून मोठ्या प्रमाणात प्रसारित केले जात असल्याचे दिसून येत आहे. आ.शहाजीबापू पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतर नेत्यांवर कडाडून हल्ला चढविताना दिसून येत आहेत. त्यामुळे मुंबईत उद्या होत असलेल्या दसरा मेळाव्यात आ.शहाजीबापू पाटील हे कोणावर तोफ डागणार याची उत्सुकता आहे.
सांगोला तालुक्यात ओन्ली शहाजीबापू
शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई गणपतराव देशमुख यांनी तब्बल अकरा पंचवार्षिक निवडणुका जिंकून या तालुक्याचे प्रतिनिधित्व विधानसभेत केले. सांगोला म्हटले की भाई गणपतराव देशमुख यांचेच नाव पुढे येत होते. मात्र सध्याच्या गरमागरम राजकीय वातावरणात सांगोला तालुक्यात आ.शहाजीबापू पाटील हेच सातत्याने चर्चेत असल्याचे दिसून येत आहेत.
सांगोला तालुक्यातील इतर राजकीय पक्षाचे नेते माध्यमांतील चर्चेत खूपच मागे पडले असल्याचे दिसून येत आहेत. उद्घाटन, मेळावे, सभा, लग्न तसेच इतर कार्यांमध्ये आ.शहाजीबापू पाटील यांचाच बोलबाला दिसून येत आहे. लोकांचा वाढता प्रतिसाद पाहून आ.शहाजीबापू पाटील हेसुद्धा पुढील पंधरा वर्षे हे सरकार टिकेल आणि मीही पुढील पंधरा वर्षे या तालुक्याचा आमदार असेन असाच काहीसा संदेश आपल्या भाषणातून देताना दिसत आहेत.
आगामी निवडणुकीत कसे असेल चित्र
आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्यादृष्टीने सांगोला तालुक्यातील इतर राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. मात्र आ.शहाजीबापू पाटील यांनी अजूनही आपली राजकीय व्यूहरचना स्पष्ट केली नाही. ऐनवेळी ते मुत्सद्दी खेळी करून इतर राजकीय पक्षांना चांगलाच धक्का देवू शकतात, असे दिसते.
पाहा खास व्हिडिओ