तुटवड्याची ‘ती’ अफवा; ऑक्सिजनचा साठा पुरेसा

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकरांची माहिती

Spread the love

सोलापूर (विशेष प्रतिनिधी) : सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील कोविडबाधित रुग्णांवर उपचारासाठी पुरेसा ऑक्सिजनचा साठा उपलब्ध आहे, असे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज येथे सांगितले. त्यामुळे
ऑक्सिजनचा तुटवडा असल्याची बातमी ही अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

जिल्हाधिकारी शंभरकर यांनी शहर आणि जिल्ह्यातील डेडीकेटेड कोविड सेंटर आणि हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी नियुक्त समितीच्या सदस्य, ऑक्सिजन उत्पादक, हॉस्पिटलचे संचालक यांची बैठक घेतली. त्या बैठकीनंतर त्यांनी ही माहिती दिली. बैठक जिल्हाधिकारी निवासस्थानातील दालनात झाली. बैठकीला सोलापूर महापालिका उपायुक्त धनराज पांडे, उद्योजकता विकासचे महाव्यवस्थापक बी. टी. यशवंते, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मोहन शेगर, सह अधिष्ठाता डॉ. पुष्पा अगरवाल, औषध प्रशासन निरीक्षक एन. एस. भालेराव आदी उपस्थित होते.

श्री. शंभरकर यांनी सांगितले की, शहरात इतर जिल्ह्यातील रुग्ण उपचारासाठी येत आहेत. त्यामुळे ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. मात्र सर्व हॉस्पिटलमध्ये पुरेसा ऑक्सिजन पुरवठा होईल, यासाठी नियोजन केले आहे.

जिल्ह्यात सध्या एल.आर. इंडस्ट्रीज आणि आर्निकेम इंडस्ट्रीज येथे ऑक्सिजनचे उत्पादन घेतले जाते. या दोन्ही प्रकल्पातून दररोज सुमारे आठशे ते एक हजार जम्बो सिलिंडर उत्पादन होते. या दोन्ही प्रकल्पांची क्षमता वाढवली जाणार आहे. त्याचबरोबर टेंभुर्णी येथील एस. एस. बैग्ज अँड फिल्टर्स प्रकल्पातून आणखी पाचशे सिलिंडर उत्पादन वाढेल.
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर

सोलापुरातील ऑक्सिजनची मागणी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन बेल्लारी जिल्ह्यातील उत्पादकांशी संपर्क साधला आहे. यासाठी बेल्लारी जिल्हा प्रशासनाशी संपर्क करण्यात येईल. नागरिकांनी ऑक्सिजन पुरवठ्याबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी केले.

बैठकीला मार्केंडय हॉस्पिटलचे चेअरमन डॉ. माणिक गुर्रम, आर्निकेमचे राहुल आराध्ये, एल आर इंडस्ट्रीजचे शेषगिरी देशपांडे, प्रभाकर भिमनपल्ली, परेश मनलोर, मल्लिकार्जुन होनमाने आदी उपस्थित होते.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका