तलवारधारी डॅशिंग पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते

सोशल मीडियावर व्हायरल झाला नवदुर्गेच्या रुपातील फोटो

Spread the love

या शूटबाबतचा अनुभव विचारला असता एसपी तेजस्वी सातपुते म्हणाल्या, ‘माझ्या लग्नातही असा मेकअप अन् शूट करता आला नव्हता. आयुष्यात पहिल्यांदाच तो या निमित्तानं पूर्ण करता आला.’

सांगोला/डॉ. नाना हालंगडे
आयपीएस ऑफिसर तथा सोलापूरच्या डॅशिंग एसपी तेजस्वी सातपुते हे नेहमी दरारा निर्माण करणारं नाव. त्यांच्या धडाकेबाज कामगिरीचे रूप आपण नेहमी पाहतो. आज मात्र आपण त्यांचं आणखी एक करारीबाणा जपणारं, बेधडक रूप पाहणार आहोत.

एसपी तेजस्वी सातपुते यांचा तलवारधारी नवदुर्गेच्या रुपातील फोटो.

प्रत्येक अधिकारी हे पदाने मोठे असले तरी त्यांच्यात एक हळवे माणूसपण दडलेले असते. असाच एक प्रत्यय एसपी तेजस्वी सातपुते यांच्याबाबतीत माध्यमांना आला. एरव्ही खाकी वर्दीत दिसणाऱ्या एसपी तेजस्वी सातपुते यांचा तलवारधारी नवदुर्गेच्या रुपातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमागचे रहस्य आम्ही आपल्या समोर मांडत आहोत.

एसपी तेजस्वी सातपुते

अस्सल मराठी मातीतल्या खानदानी अन् पारंपरिक नऊवारी पेहरावात. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी त्यांचं नवं रूप सादर करण्याचं ठरलं. एसपी तेजस्वी सातपुते यांनाही ही वेगळी कल्पना आवडली.

मग काय.. टीम कामाला लागली. साडी त्यांनीच पसंत केली. मात्र त्याला मॅचिंग ब्लाऊज नव्हता. शोधाशोध करुन तो सोलापुरातल्या एका लेडीज टेलरकडून शिवून घेतला. नाकात नथ, गळ्यात पांढऱ्या मोत्यांची माळ अन् कपाळावर ठसठशीत चंद्रकोर. पायातली चप्पलही कोल्हापुरी.

एसपी तेजस्वी सातपुते यांचा तलवारधारी नवदुर्गेच्या रुपातील फोटो.

नेहमी ‘खाकी’त दिसणाऱ्या कडक एसपी उर्फ लेडी सिंघम या रुपात पार बदलून गेल्या. अन् हो.. रणरागिणीच्या हातात तलवारही शोभून दिसली. करारी नजरेनं ती तलवार जणू अधिकच धारदार बनली.

या अनोख्या वेशभुषेला मॅच होणारं परफेक्ट बॅक ग्राऊंड सोलापूरच्या भुईकोट किल्ल्यात वाट पहात होतं. लोकेशन ठरलं. परवानगीही घेतली. मेकअपसाठी दीड-दोन तास. शूटसाठी दोन तास. कधी ऊन जास्त तर कधी पक्ष्यांचा डिस्टर्बन्स अधिक. अखेर शेवटी हा जबरदस्त लूक मिळालाच.

या शूटबाबतचा अनुभव विचारला असता एसपी तेजस्वी सातपुते म्हणाल्या, ‘माझ्या लग्नातही असा मेकअप अन् शूट करता आला नव्हता. आयुष्यात पहिल्यांदाच तो या निमित्तानं पूर्ण करता आला.’

एसपी तेजस्वी सातपुते यांची “परिवर्तन” मोहिम
परिवर्तन हा निसर्गाचा नियम असतो. तोच नियम माणसालाही लागू पडतो. समाजात अनेक लोक जसे चांगल्या मार्गाने पैसे कमवत असतात त्याच पद्धतीने अनेक लोक उपजीविकेसाठी वाममार्गालाही लागतात. सोलापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी बेकायदा हातभट्टीद्वारे दारू निर्माण केली जाते व ती विकली जाते. हातभट्टी दारूमुळे शेकडो कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत. तरुणांमध्ये व्यसनाधिनतेचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढीस लागते. हा दोष मुळापासून उखडून टाकण्यासाठी एसपी तेजस्वी सातपुते यांनी अभिनव अशी “परिवर्तन” मोहीम पोलिस दलात सुरू केली आहे. त्यानुसार त्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात येत असलेल्या सर्व पोलिस ठाण्यांतर्गत अवैधपणे सुरू असलेल्या हातभट्टी चालकांचे परिवर्तन करण्याचे ठरविले आणि त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. आता हातभट्टीद्वारे दारूचे गाळप करणारे लोक चांगल्या मार्गाने पैसा कमावताना दिसत आहेत. परिवर्तन मोहिमे द्वारे त्यांना या अवैध धंद्यातून बाहेर काढून व्यवसाय व छोटे-मोठे उद्योग सुरू करण्यासाठी पोलिस दलातर्फे मदत केली जात आहे. अनेक हातभट्टी चालक कोणी दुकानदार बनले, तर कोणी रिक्षाचालक. या सर्व मोहिमेचे श्रेय एसपी तेजस्वी सातपुते यांना जाते.


टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका