…तरंच सावित्री-जिजाऊंचा जन्मोत्सव करूया

युवा समीक्षक प्रतीक महेंद्र कदम यांचा विशेष लेख

Spread the love

लेखक प्रतीक महेंद्र कदम हे युवा समीक्षक आहेत. सोशल मीडियावरुन ते सातत्याने साहित्य व वर्तमान घडामोडींवर अभ्यासूपणे भाष्य करीत असतात. त्यांच्या लेखनाचा मोठा चाहतावर्ग महाराष्ट्रात आहे. वर्तमानपत्रांतूनही त्यांचे लेख प्रसिद्ध झाले आहेत. नव्या दमाचे, अभ्यासू समीक्षक म्हणून एेन उमेदीच्या काळात त्यांना वाचकांकडून मिळत असलेला प्रतिसाद कौतुकास्पद आहे. आज माँ जिजाऊंच्या जयंतीदिनी हा विशेष लेख ‘थिंक टँक लाईव्ह’च्या वाचकांसाठी देत आहोत.
– संपादक

———————————————————————————-

नवाश्मयुगीन विकसित संस्कृतीमध्ये टायग्रीस नदीवरील संस्कृती, नाईल नदीकाठी उदयास आलेली, हुयांग हो नदीकाठी वसलेली संस्कृती आणि सिंधू नदीच्या खोऱ्यात वसलेली संस्कृती यांचा समावेश होतो. या जगातील प्राचीन आणि विकसित चार संस्कृतींमध्ये भारतातील संस्कृतीचा समावेश आहे. याचे पुरावे आजही हडप्पा, मोहेंजोदडो संस्कृतीच्या रूपाने मेहेरगाढ, लोथल, राखीगढी अशा अनेक ठिकाणी देशभर सापडत आहेत. आपल्या संस्कृतीचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्या संस्कृतीत पहिल्यापासून स्त्रीचा सन्मान केला गेला आहे. आपल्या देशाची पहिली स्त्रीसत्ताक राणी निऋर्ती हिने भारतीय उपखंडात शेतीची सुरुवात केली. भाताची लागवड सर्वप्रथम केली. (म्हणून आजसुद्धा लग्नात तांदूळ वापरतात.) नवरात्रात नऊ दिवसाचे घट घालून रोप कसे करायचे, त्याची लागण करून शेती कशी करायची हे सांगितले. ही तिने सुरू केलेली परंपरा आजसुद्धा चालू आहे. ही आपल्या देशाची खरी संस्कृती, मातृसत्ताक परंपरा आपल्याला लोकसाहित्यातून अभ्यासायला मिळते.

आपणा सर्वांना चिमणी-कावळ्याची गोष्ट माहीत असेलच. त्यात कावळा म्हणत असतो, “चिऊताई, चिऊताई दार उघड.” कारण स्त्री घराची प्रमुख होती. तो “चिमणाभाऊ दार उघड” असे नाही म्हणत. यावरून आपणाला या संस्कृतीचा प्रत्यय येईल. एवढेच काय तर सर्वात आधी म्हणजे ज्यावेळी नातेसंबंध अस्तित्वात नव्हते त्यावेळी कोणाचेही कोणासोबत लग्न होत. ही परंपरा मोडीत काढून यमाने त्याच्या बहिणीसोबत लग्न करण्यास नकार दिला आणि एक स्वयंवर ठेवला. त्यानुसार जो यमाला युद्धात हरवेल त्याला तो आपली बहीण देणार. त्या बदल्यात हरवणा-याने यमाला अर्धे राज्य द्यायचे. हीच प्रथा म्हणजे आजची कानपिळणी आणि हुंडा होय. हुंद्याला बऱ्याच ठिकाणी विरोध आहे. पण मुद्दा हा की स्वयंवर हे नेहमी स्त्रीचे झाले. कारण त्यांचा तो मान त्यावेळी लोकांनी मान्य केला होता. यानंतर भारतात या संस्कृतीचे जतन झालेलं दिसत नाही. उलट हळूहळू भारत पुरुषी व्यवस्थेकडे झुकत गेला होता. स्त्रीचे महत्त्व कमी होत गेले. त्यांना अनेक ठिकाणी जाण्यासाठी बंदी देखील घातली.

ही सगळी नवीन सुरू झालेली परंपरा मोडीत काढत पुन्हा मूळ संस्कृतीची सुरुवात भारतात सोळाव्या शतकात भोसले घराण्याने सुरू केली आणि इतिहास रचला. जे स्वराज्याचे स्वप्न शहाजीराजांनी पाहिले, ते जिजाऊ मातांनी प्रत्यक्षात आणले. स्वराज्याचे संस्थापक जरी छत्रपती शिवाजी महाराज असले तरी पाया मात्र जिजाऊंनी रचला. म्हणूनच त्यांचे छत्रपती शिवराय आणि नातू संभाजीराजे यांनी त्यांना सती जाण्यापासून परावृत्त केले. स्त्रियांना अधिक चांगला सन्मान शिवरायांच्या स्वराज्यातच मिळालेला दिसून येतो. हे जिजाऊंच्या कार्याचे सगळ्यात मोठे योगदान आहे. याही पुढे जाऊन संभाजी महाराजांनी महाराणी येसूबाईच्या नावाने स्वतंत्र राजमुद्रा काढली. “श्री सखी राज्ञी जयती.” आणि सर्व राज्यकारभाराची आर्थिक जबाबदारी येसूबाईंना दिली. अशी कामगिरी करणारे ते जगातील पहिले राजे आहेत. महत्त्वाचं म्हणजे ही संस्कृती जपणारे हे अखेरचे घराणे आहे. या संस्कृतीची समाजाला जाणीव करून देत, ही संस्कृती किती महत्त्वाची आहे हे दाखवून दिले. याच काळात आणि यानंतरच्या काळात अनेक स्त्रिया पुढे आल्या आणि त्या राज्यासाठी लढल्या. जिजाऊ माता, महाराणी येसूबाई, महाराणी ताराबाई, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, राणी लक्ष्मीबाई या महाराण्यांनी देशाचे जतन केले आणि यांना आधार देणाऱ्या पुरुषांनी देशाला या संस्कृतीचे महत्त्व दाखवून दिले.

नंतरच्या काळात महात्मा फुलेंनी पुन्हा एकदा या संस्कृतीचा नवा अध्याय सुरू केला. सावित्रीबाईंना शिकवून दोघांनी मिळून देशातील पहिली मुलींची शाळा सुरू केली. फक्त शाळाच सुरू नाही केली तर सावित्रीबाईंनी सत्याग्रह चळवळ महात्मा फुलेंच्या निधनानंतर देखील सुरू ठेवली. प्रचंड विरोध असणाऱ्या व्यवस्थेत, स्त्रियांचा स्तर घसरत चाललेल्या व्यवस्थेत त्यांनी स्त्रियांसाठी रचलेला इतिहास खूप काही शिकवून जातो. पुन्हा एकदा महात्मा फुले-सावित्रीबाई यांच्या रूपाने आपल्या स्रीसत्ताक परंपरेचा प्रत्यय दिसून येतो.

आता जग खूपच वेगाने बदलत चालले आहे. जगातील कोणत्याही कोपऱ्यातील बातमी काही सेकंदात आपल्याला कळते. एवढे जग वेगवान झाले आहे. पण भारत प्रगत होऊनसुद्धा आहे तिथेच आहे. याच कारण म्हणजे विसरत चाललेला संस्कृतीचा वसा. नुकतेच अमेरिकेचे इलेक्शन झाले. भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांची Vice-President म्हणून निवड झाली. भारतासाठी ती अभिमानाची गोष्ट आहे. पण लोक काय म्हणताहेत, अमेरिकेत भारतीय झेंडा फडकला. पण त्यांचं राष्ट्रीयत्व, त्यांचा जन्म सगळं तिकडेच; पण तरीही आपण त्यांचा जयजयकार केला. 30-40 वर्षांपासून त्या तिकडे राहतात तरीही अमेरिकेच्या भारतीय वंशाच्या उपराष्ट्रपती म्हणून त्यांचा जयघोष केला.

आता त्याच भारतात सोनिया गांधींना भारतीय समजत नाहीत. त्यांचा जन्म इटलीतील असेल; पण त्या भारतीय आहेत. त्यांचे उभे आयुष्य भारतात गेले. एवढेच काय त्या 2007 ते 2014 या काळात जगातील Powerful Women च्या लिस्ट मध्येदेखील होत्या. पण तरीही त्यांचे राष्ट्रीयत्व आपणाला मान्य नाही. त्या गेली 30-40 वर्षे भारतात राहत आहेत. त्यांच्या नवऱ्याला म्हणजे राजीव गांधी यांना मारले गेले. त्यांच्या सासूबाई इंदिरा गांधी यांना मारले गेले. तरीही त्या आज त्याविरुद्ध एकही शब्द न बोलता, उलट ते मान्य करून देशाच्या सेवेसाठी हजर आहेत. साधं आपल्याला कोणी उलटं बोललं तरी आपली सटकते. त्यांचं तर पूर्ण आयुष्य एका क्षणात आपण हिसकावून घेतलं. तरीही त्यांना आपण अजूनसुद्धा मान्य केले नाही. पण कमला हॅरिस आपणाला मान्य आहेत ज्या आपल्या देशाच्या नागरिकसुद्धा नाहीत. त्यांना विरोध नाही त्यांनी देखील इतिहास रचला. पण शेवटी त्या जे करणार ते अमेरिकेला फायद्याचे. अशा लाखो कर्तबगार स्त्रिया आपल्या अवतीभोवती आहेत. त्यांचा सन्मान करायला आणि त्यांना अधिक स्वातंत्र्य देण्याचा विचार आपण करायला हवा. त्यासाठी सुरुवात घरापासून करायला हवी. घरातल्या प्रत्येक स्त्रीचा सन्मान जसा करायला हवा, तसाच बाहेरच्या स्त्रीचा सन्मान करायला शिकले पाहिजे.

मातृसत्ताक परंपरा असलेल्या भारतात वंचित व मागासवर्गीय स्त्रियांवर बलात्कार होतात. दिवसाढवळ्या मंदिरांमध्ये महाराज म्हणून घेणारे लोक बलात्कार करत आहेत. हे चित्र भीषण आहे. तारुण्य, प्रेम महत्त्वाचे आहेच; पण म्हणून तरुण पिढीने आणि पुरुषाने घराबाहरेच्या स्त्रीकडे भोगाची वस्तू म्हणून पाहू नये. तरच सावित्री-जिजाऊच्या जन्मोत्सवाला महत्त्व आहे. कोणताही सिनेमा घेतला तरी प्रत्येक सिनेमातील हिरो स्त्रीला संकटातून वाचवत असतो. हे पुरुषी अहंकाराचे एक विकृत रूप आहे. असली विकृत रूपे आजच्या तरुणांनी आपल्या डोळ्यांत साठवू नयेत आणि स्त्रीच्या स्वातंत्र्याच्या आदर करावा.

नुकतीच सवित्रीबाईंची जयंती झाली आणि आज जिजाऊंनी जयंती. त्यांना अभिवादन करत त्यांनी जोपासलेल्या स्रीसत्ताक परंपरेला आपण जपू.

– प्रतीक महेंद्र कदम
बी.ई. मेकॅनिकल (इंजिनिअर)
टेंभुर्णी, ता. माढा, जि. सोलापूर
(संपर्क – 77748 31081)

 

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका